राष्ट्रीयत्वाचे पुरस्कर्ते : द्विजेंद्रनाथ टागोर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2021   
Total Views |

tagore_1  H x W


द्विजेंद्रनाथांच्या मते, पाश्चिमात्य संस्कृती, विचारसरणी किंवा रचना अंगीकारल्याने भारत आधुनिक होईल, हा भाबडा समज आहे. तसेच भारतीय समाजाला आधुनिक करण्यासाठी तर तो मुळीच परिणामकारक ठरणार नाही. कारण, आंग्ल सवयी अनुसरल्याने ब्रिटिश वसाहतवादात भारताची गुलामी अजून मजबूत होईल. भारताच्या सांस्कृतिक एकतेला बाधा न आणता, ब्रिटिशांचे लाचार आणि गुलाम न होता भारताने परिवर्तन करावे, असे त्यांचे स्पष्ट मत होते. आधुनिकतेची कास न सोडता, राष्ट्रीय हित आणि संस्कृतीच्या विरोधी न जाता हिंदूहित आणि विकास हे त्यांचे ध्येय होते. राष्ट्रीय ऐक्य भंग होऊ न देता राष्ट्राने परिवर्तन, प्रगती आणि विकास साधायला हवा. ते म्हणत, “स्वतःमध्ये आतून बदल कसा करावा हे शिकण्यासाठी पाश्चात्त्य अनुभवातील प्रकाशात स्वतःच्या संस्कृतीचे अध्ययन करणे आवश्यक आहे.”

द्विजेंद्रनाथ टागोर (१८४० ते १९२६ ) हे कवी, गणितज्ञ, चित्रकार, बंगाली लघुलिपी नि स्वरलिपीचे जनक, संगीतकार, तत्वज्ञ आणि प्रखर राष्ट्रवादी देशभक्त असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. प्रसिद्ध टागोर घराण्यात त्यांचा जन्म झाला. ते महर्षी देवेंद्रनाथ टागोरांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि रवींद्रनाथ टागोरांचे ज्येष्ठ बंधू.‘हिंदू मेळा’च्या संस्थापकांपैकी ते एक होते आणि १८७० ते १८७३ ते ‘हिंदू मेळा’चे सचिव होते. ‘हिंदू मेळा’साठी त्यांनी ‘मलिन मुखचंद्रमा भारत तोमारी’ (हे भारत, तुझा चेहरा निस्तेज झालाय) हे प्रसिद्ध देशभक्तीपर गीत रचले होते. तसेच त्यांनीच रचलेले ‘करो तन्र नाम गान, जातो दिन रहे देहे प्राण’ (देहात जीव असेपर्यंत त्याच्या स्तुतीपर गात रहा) हे गीतही ‘हिंदू मेळ्या’त पौष सप्तमीला प्रार्थनेसोबत गायले जात असे. ‘नॅशनल सोसायटी’, ‘आदी ब्राह्मो समाज’, ‘बंगाल थिऑसॉफिकल सोसायटी’, ‘बंगीय साहित्य परिषद’, ‘बंग साहित्य संमेलन’, ‘भारतवर्षीय बिजंन सभा’, ‘सारस्वत समाज’ इ. अनेक संस्थांशी त्यांचा संबंध होता. ‘साप्ताहिक हितबदी’चे (Hitabadi) संस्थापक आणि ‘भारती’ या नियतकालिकाचे १८८७ पासून सात वर्षे आणि ‘तत्त्वबोधिनी पत्रिका’ या वृत्तपत्राचे १८८४ पासून २५ वर्षे संपादक होते.द्विजेंद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ टागोरांनी १८६५ ला नवगोपाळ मित्रांच्या संपादकत्वाखाली सुरू केलेल्या ‘नॅशनल पेपर’मधून द्विजेंद्रनाथांनी आपले राष्ट्रीयत्वावरील विचार मांडण्यास सुरुवात केली. ‘आदी ब्राह्मो समाज’, राष्ट्रीयत्व, राष्ट्रीय संस्कृती इत्यादींची बाजू घेऊन सडतोड लेख लिहून बंगालमधील पाश्चिमात्य शिक्षित समाजात द्विजेंद्रनाथांनी राष्ट्रवादाचा प्रसार करण्यास सुरुवात केली. वैश्विकता की राष्ट्रीयता, यातील एकाची निवड करताना द्विजेंद्रनाथांचे बंधू रवींद्रनाथ टागोर हे एका भूमिकेवर ठाम दिसत नाहीत. पण, द्विजेंद्रनाथ मात्र ‘राष्ट्रीयता’ या भूमिकेवर ठाम दिसतात, गांधींच्या असहकार चळवळीच्या पाठिंब्यावरूनही रवींद्रनाथ आणि द्विजेंद्रनाथ या टागोर बंधूंमध्ये वैश्विकता की राष्ट्रीयता, याच अनुषंगाने वादविवाद-चर्चा झाली होती.


द्विजेंद्रनाथ हे केशवचंद्रांचे सर्वात मोठे वैचारिक विरोधक होते. केशवचंद्र सेनांना ‘वैश्विकता’ (Univeraslism) या पायावर तरुणांचे संघटन करायचे होते आणि त्यासाठी ते प्रेरणास्रोत म्हणून युरोपकडे पाहत होते, तर द्विजेंद्रनाथांना ‘आदी ब्राह्मो समाज’ हा ‘राष्ट्रीयत्वा’च्या पायावर हिंदू समाजाचा पाठिंबा मिळवून टिकू शकतो, यावर ठाम विश्वास होता.दि. २५  सप्टेंबर, १८६७ च्या ‘युरोपियन मॉडेल’ या लेखात द्विजेंद्रनाथ दिशाहीन पुरोगाम्यांना उद्देशून म्हणतात की, “त्यांची पुरोगामी संस्कृती संदर्भात दिशाभूल झाली आहे. जणू काही इंग्रजी संस्कृती हीच जगातील एकमेव संस्कृती असल्याप्रमाणे काही लोकांनी स्वतःला विदेशी संस्कृतीला विकून टाकले आहे. ज्या देशाच्या रीती, रूढी आणि सवयींमध्ये खरेपणा आणि राष्ट्रीयता आहे, अशामध्ये काम करणे हा शहाणपणा आहे. इंग्रजी संस्कृती आमच्या आदरास पात्र आहे, कारण ती इतर जनतेच्या नव्हे तर इंग्रजी राष्ट्राच्या चैतन्याचा नैसर्गिक आविष्कार आहे.” आमची संस्कृतीच जगात महान आहे आणि तीच जगाची तारणहार आहे, अशी दर्पोक्ती त्यांनी कधी मिरवली नाही. प्रत्येक राष्ट्राने आपापली पारंपरिक संस्कृती जतन करून इतर संस्कृतीचाही आदर करावा, असे त्यांना म्हणायचे होते. त्यांनी पाश्चिमात्य किंवा इंग्रजी संस्कृतीचा कधीही द्वेष केला नाही आणि ते आधुनिकतेच्याही विरोधी नव्हते. त्यांचे म्हणणे इतकेच होते की, “प्रत्येक राष्ट्राला स्वतःची अशी एक वेगळी राष्ट्रीय ओळख असते आणि ‘सुसंस्कृत राष्ट्र’ ही संज्ञा प्राप्त होण्यासाठी ती जतन करायला हवी. पण, आपले देशबांधव इंग्रजी संस्कृतीचे अनुकरण म्हणजे प्रगतीच्या समानार्थी समजून त्यामागे वेड्यासारखे जातात आणि आपल्या सर्व प्रगतीचा पाया राष्ट्रीय संस्था करण्याऐवजी सर्व प्रकारच्या सुधारणेमध्ये परदेशी मत आयात करतात.” २ ऑक्टोबरच्या लेखात ते या समस्येचा वेध घेताना असे सांगतात की, “या वादामुळे चांगल्या हेतूने केलेली परदेशी आयात एखाद्या विशिष्ट परिस्थितीत आंतरिक चेतना आणि राष्ट्रीय चारित्र्याचा प्रामाणिकपणा नष्ट करू शकते.” पाश्चात्त्यांचे अनुकरण म्हणजे परिवर्तन वा प्रगती नव्हे, यावर त्यांचा भर होता. आजही भारतीयांच्या युरोपकडे वा अमेरिकेकडे प्रेरणास्रोत म्हणून पाहण्याच्या वृत्तीत फारसा फरक पडला नसल्याचे जाणवते, त्यामुळे द्विजेंद्रनाथांचे हे विचार आजच्या पिढीलाही लागू होतात.


राष्ट्रीय प्रगती ही एक सतत प्रवाही क्रिया आहे. या प्रवाहात जुन्याला टाळून किंवा सोडून पुढे जाण्यापेक्षा त्याला आपल्यासोबत घेऊन नवीन उपयुक्त गोष्टींना स्वीकारून, जुन्या-नव्याचा संगम करून मार्गक्रमण करावे म्हणजे राष्ट्राची सर्वांगीण प्रगती साध्य होईल. हीच गोष्ट द्विजेंद्रनाथ ’Hinduism is not hostile to Brahmoism’ (हिंदू धर्म ब्राह्मवादाच्या विरोधी नाही.) या लेखात मांडताना म्हणतात, “पूर्वीच्या आणि आताच्या सांस्कृतिक आदर्शांचे एकत्रीकरण म्हणजे सुसंवाद. कुठल्याही राष्ट्रीय गोष्टीला परदेशी गोष्टी पर्याय म्हणून वापरणे म्हणजे प्रगती नव्हे. मृतवत संस्थांचे आणि वेगाने प्रगती करणार्‍या संस्थांचे आपल्या संस्कृतीच्या हितासाठी एकत्रीकरण म्हणजे प्रगती.”दि. २४  फेब्रुवारी, १८६९ च्या ‘Nationality Universality’ (राष्ट्रीयता आणि वैश्विकता) या लेखात द्विजेंद्रनाथ म्हणतात, “हिंदू आणि युरोपियनांची समानता हेच अपेक्षीय ध्येय आहे, यात शंकाच नाही. पण, त्याआधी आपली युरोपियनांसोबत समता प्रस्थापित व्हायला हवी. सध्याच्या परिस्थितीत युरोपीय पद्धती अंगीकारणे हे गुलामगिरीचे लक्षण ठरेल.” पण, त्यांचा युरोपीय गोष्टीला आणि आधुनिकतेला विरोध नव्हता; कारण द्विजेंद्रनाथांनी जेव्हा ‘हिंदू मेळ्या’चे नेतृत्व केले, तेव्हा त्यांनी त्यात आधुनिक उत्पादन आणि तंत्रज्ञानाचा समावेश केला होता.Spurious Brahmoism’ या लेखात केशवचंद्रांची ‘वैश्विकता’ म्हणजे युरोपीय ख्रिश्चॅनिटीचा बुरखा आहे, असे ते स्पष्ट शब्दांत सांगतात, “त्यांचा नैसर्गिक धर्म सांप्रदायिकता म्हणून पश्चिमेकडून आलेला धर्मांध हिंदूविरोधी आहे आणि ‘महान माणूस’ हा सिद्धान्त पूर्णपणे ब्राह्मो एकेश्वरवादाला परकीय आणि ईश्वरनिंदक आहे, कारण तो मानवजातीला ईश्वराचा शोध थेट घेण्याऐवजी ईश्वरप्राप्तीमध्ये अन्य मनुष्याला सहभागी करून घेण्यास भाग पाडतो.”


द्विजेंद्रनाथांच्या मते, पाश्चिमात्य संस्कृती, विचारसरणी किंवा रचना अंगीकारल्याने भारत आधुनिक होईल, हा भाबडा समज आहे. तसेच भारतीय समाजाला आधुनिक करण्यासाठी तर तो मुळीच परिणामकारक ठरणार नाही. कारण, आंग्ल सवयी अनुसरल्याने ब्रिटिश वसाहतवादात भारताची गुलामी अजून मजबूत होईल. भारताच्या सांस्कृतिक एकतेला बाधा न आणता, ब्रिटिशांचे लाचार आणि गुलाम न होता भारताने परिवर्तन करावे, असे त्यांचे स्पष्ट मत होते.आधुनिकतेची कास न सोडता, राष्ट्रीय हित आणि संस्कृतीच्या विरोधी न जाता हिंदूहित आणि विकास हे त्यांचे ध्येय होते. राष्ट्रीय ऐक्य भंग होऊ न देता राष्ट्राने परिवर्तन, प्रगती आणि विकास साधायला हवा. ते म्हणत, “स्वतःमध्ये आतून बदल कसा करावा हे शिकण्यासाठी पाश्चात्त्य अनुभवातील प्रकाशात स्वतःच्या संस्कृतीचे अध्ययन करणे आवश्यक आहे.” म्हणजे थोडक्यात पाश्चात्त्य विचार ‘कॉपी-पेस्ट’ करून आत्मसात न करता ‘एडिट’ करून आत्मसात करावेत आणि ते ‘एडिटिंग’ ‘हिंदू एडिटिंग’ असावे.द्विजेंद्रनाथांनी यासाठी एका निबंधात आधुनिकतेचे दोन पर्याय म्हणून चांदीची काठी आणि सोन्याची काठी याचे सुंदर उदाहरण दिले आहे. हिंदू आधुनिकतेचे प्रतिनिधित्व करणारी सोन्याची काठी मृत शरीराला संजीवनी देईल, तर पाश्चात्त्य आधुनिकतेचे प्रतिनिधित्व करणारी चांदीची काठी जीवंत शरीराला मृतवत करेल. येथे हे लक्षात घ्यायला हवे की, येथे वैश्विकतेच्या विरुद्ध राष्ट्रीयतेचा पुरस्कार करताना द्विजेंद्रनाथ हिंदूमूल्यांना महत्त्व देतात, म्हणून त्यांनी आधुनिकतेचा पुरस्कार करताना त्यात ते ‘हिंदू आधुनिकता’ आणि ‘पाश्चात्त्य आधुनिकता’ असा भेद करतात.‘वैश्विकता विरुद्ध राष्ट्रीयता’ हा लढा खरा म्हणजे ‘पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण विरुद्ध देशी संस्कृतीचे जतन करून आधुनिकतेकडे वाटचाल’ असा होता. पाश्चात्त्य संस्कृती स्वीकारली म्हणजे आपण वैश्विक झालो, असा केशवचंद्रांसारख्यांचा गैरसमज होता. ‘राष्ट्रीय वैशिष्ट्ये’ हा प्रगतीचा पाया आहे, या राष्ट्रीय वैशिष्ट्यांवर आपण पाश्चिमात्यांचे अनुकरण न करता प्रगती करू शकतो, आधुनिक होऊ शकतो हा आत्मविश्वास द्विजेंद्रनाथांना होता. म्हणून राष्ट्रीयतेवरील भाष्यकारात द्विजेंद्रनाथ हे एक अग्रणी विचारवंत ठरतात.

संदर्भ:
Kopf, David, The Brahmo Samaj The Shaping of The Modern Indian Mind, Gupta Brothers, 1959, पृष्ठ 182 ते 186



@@AUTHORINFO_V1@@