तत्त्वनिष्ठ आणि कुटुंबवत्सल उद्योजिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Sep-2021   
Total Views |

Manasa 2_1  H x
संकटात संधी शोधत एक आदर्श वस्तुपाठ निर्माण करणार्‍या नाशिक येथील मृणालिनी गोरे यांच्याविषयी...
ज्या विषयाचे आपण शिक्षण घेतो, त्याच विषयात नोकरी आणि व्यवसाय करणे सोपे असते. मात्र, ज्या विषयाचा आणि आपला काडीचाही संबंध नसतो, एका दुःखद घटनेने जेव्हा व्यवसायाची जबाबदारी आपल्यावर येते. तेव्हा एखादी व्यक्ती त्यात न केवळ यशस्वी होते, तर अनेकांचे कुटुंबदेखील सावरते, अशावेळी ती व्यक्ती नक्कीच दखलपात्र ठरते. नाशिक येथील ‘इंटरकॉन इंडस्ट्रीज’च्या संचालिका मृणालिनी अनिल गोरे त्यापैकीच एक. बी.ए. (अर्थशास्त्र) हे त्यांचे शिक्षण. ‘केमिकल इंजिनिअरिंग बेस इंडस्ट्री’ हे त्यांचे कार्यक्षेत्र. एक सकारात्मक स्पष्टवक्तेपण, कणखरपणा, ध्येयप्रेरित सक्षम व्यक्तिमत्त्व अशीच त्यांची ओळख आहे. त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाच्या मागे एक सहज आणि सहृदयी आईदेखील आहे. हे त्यांच्या कार्यावरून सहज जाणवते.
गोरे यांचे अंबड येथे ‘इलेक्ट्रोप्लेटिंग’चे युनिट आहे. २००३ मध्ये त्यांच्या पतीचे अकाली निधन झाले. त्यानंतर युनिटची कार्यधुरा मृणालिनी गोरे यांनी हाती घेतली. त्यापूर्वी विशेष सण असल्यावर युनिटमध्ये जाणार्‍या गोरे आता येथे प्रत्यक्ष कामकाज करणार होत्या. पतीच्या या व्यवसायाची कोणतीही तांत्रिक माहिती त्यांच्याकडे नव्हती. शिक्षणही त्या क्षेत्राशी संबंधित नव्हते. त्यांचा मुलगा नुकताच अभियंता झालेला होता. मात्र, तो त्याच्या नुकत्याच लागलेल्या नोकरीत व्यस्त होता. अशावेळी आपल्या व्यवसायातील सर्व तांत्रिक बाजू मृणालिनी यांनी समजून घेतल्या. त्यासाठी एक कोर्सदेखील केला आणि आपला व्यवसाय न केवळ गतिमान केला, तर त्यास पुढे नेले. एक यशस्वी, तत्त्वनिष्ठ उद्योजिका म्हणून त्या नावारूपाला आल्या.
पती निधनानंतर सर्वात मोठा प्रश्न होता तो कंपनीतील कामगारांचा. या कामगारवर्गाला आपले पुढे काय होणार ही धास्ती होती. अशावेळी गोरे यांनी आपल्या कामगारांना विश्वास देत सर्वात आधी आम्ही आपला विचार करू, असे आश्वासित केले. तसेच, कंपनीतील कामगार व त्यांचे कुटुंब समोर असल्याने गोरे यांनी कंपनी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. “त्यामुळे तुम्ही नसला म्हणजे कंपनी ही आई नसलेल्या घरासारखी वाटते,” असेच बोल त्यांच्या कामगारवर्गाचे त्यांच्याप्रति आहेत. गोरे यांच्या अथक परिश्रमाने कंपनीस आज ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त आहे. कंपनीतील कामकाज जाणून घेण्यासाठी त्यांना कामगारांची मोठी मदत झाली. प्रत्यक्ष कामकाज करत असतानाच आपण शिकल्याचे त्या आवर्जून नमूद करतात. मागील १७ वर्षांत कंपनीच्या वार्षिक उलाढालीत चार ते पाचपटीने वाढ झाली आहे, हे विशेष.
कोरोनाकाळात कंपनी बंद असतानाही एकही कर्मचारी कमी न करता त्यांनी कामगारांची वेतनकपातही केलेली नाही. सध्या ‘एबीबी’, ‘सिमेन्स’, ‘क्रॉप्टन ग्रीव्हज’ सारख्या कंपन्यांना पुरवठा करण्याचे काम गोरे यांच्या कंपनीमार्फत केले जाते. पती निधनाचे दु:ख मनात ठेवून संधी म्हणून पाहिले आणि आपल्याला आता हे काम जमलेच पाहिजे, या एकाच ध्यासाने कामास प्रारंभ केल्याचे मृणालिनी गोरे आवर्जून सांगतात. सध्या कोरोनामुळे जागतिक व्यवसायक्षेत्रावर जरी परिणाम झाला असला, तरी हा परिणाम फार काळ टिकणार नसल्याचा आशावाददेखील त्या बोलून दाखवितात.
संकटे सर्वांवर येत असतात. मात्र, आपण स्त्री आहोत म्हणून कोणत्याही स्त्रीने कधीही मागे राहू नये. कामात सातत्य असल्यास, ध्येय निश्चित असल्यास सर्व काही साध्य करता येते. जीवनात शिस्त असणे आवश्यक असल्याचे त्या आवर्जून नमूद करतात. या व्यवसायात येण्याआधी मृणालिनी गोरे यांनी दहा वर्षे ‘फुलोरा’ या नावाने सुती कपड्यांचा व्यवसायदेखील केला. या माध्यमातून त्यांनी सुमारे ५०० हून अधिक महिलांना स्वतःचे उत्पादन विक्रीस ठेवण्यासाठीचे हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले होते. भारतातल्या विविध राज्यांतील विणकारांकडून थेट कपडे आणून ते विक्रीस ठेवणे हे ‘फुलोरा’चे वैशिष्ट्य होते. गोरे या ‘उद्योगिनी महिला पतपेढी’त संचालिका आहेत. २००७ साली भारतीय स्त्रीशक्तीतर्फे ‘गौरव पुरस्कार’, २००९ मध्ये ‘वॉक्हार्ट ग्रुप’चा ‘उद्योगिनी पुरस्कार’, २०११ साली ‘उद्योगिनी प्रतिष्ठान’चा ‘यशस्वी उद्योजिका पुरस्कार’ असे मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. पतीच्या निधनापश्चात अचानकपणे मृणालिनी गोरे व्यावसायिका झाल्या. असणार्‍या व्यवसायाशी फारसा संबंध नसतानादेखील त्या हा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत आहेत. यामागे केवळ एक पवित्र भाव मनात असणे, हेच कारण आहे. आपल्या व्यवसायावर अनेकांची कुटुंबे अवलंबून आहेत. तेव्हा आपण त्यांच्यासाठी सीमोल्लंघन करणे आवश्यक आहे. हाच ध्यास मनात घेऊन गोरे यांनी आपल्या व्यवसायाला अत्याधुनिक स्वरूप दिले आहे.
कामगार वर्गाप्रति स्नेहभाव, ममत्व असण्याबरोबरच एक कुशल प्रशासकाचे गुणदेखील त्यांच्या या कार्यातून सहज दिसतात. वाटावा तितका सोपा नसणारा हा प्रवास गोरे यांनी मोठ्या हिमतीने सुरू केला आणि त्या पुढे जात आहेत. मुलगा, सून, सासू, सासरे, मुलगी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा कामगारवर्ग यांची साथ सोबत गोरे यांना वेळोवेळी मिळत आहे. संकटात संधी शोधत एक आदर्श वस्तुपाठ निर्माण करणार्‍या मृणालिनी गोरे यांच्या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!





















 
@@AUTHORINFO_V1@@