'उठा उठा दिवाळी आली...'मुळे घराघरात पोहचलेले आबासाहेब करमरकरांचे निधन

मराठी तसेच हिंदी चित्रपट मालिकांमध्ये केल्या अनेक भूमिका

    21-Sep-2021
Total Views |

Vidyadhar Karmarkar_1&nbs
मुंबई : ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली’, या मोती साबणाच्या जाहिरातीतील एका वाक्यामुळे घराघरात पोहोचलेले अलार्म काका म्हणजेच विद्याधर करमरकर यांचे शनिवारी १८ तारखेला निधन झाले. आबासाहेब उर्फ विद्याधर करमरकर हे ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी, लेखक व कवीदेखील होते. मात्र, मोती साबणाच्या या एका जाहिरातीमुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या पश्चात दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे.
 
 
विद्याधर करमरकर हे विलेपार्ले येथील तेजपाल स्कीम या इमारतीमध्ये राहत होते. त्यांचे पुत्र संजय करमरकर यांनी सांगितले की, शनिवारी संध्याकाळी वृद्धापकाळाने आबासाहेबांचे निधन झाले. ते आजारी नव्हते. पण, वर्षभरापासून दमा, कफ आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता.
 
 
नाटक, मालिकांमध्ये छोट्या भूमिका तसेच अनेक चित्रपटांमध्ये भूमिका निभावल्या आहेत. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांसह मालिकांमध्ये सहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या. कार्तिक कॉलिंग कार्तिक, एक थी डायन, गेम, सांस बहू और सेन्सेक्स, लंच बॉक्स, तुम्हारी सुलू, विरे की वेडिंग हे त्यांचे चित्रपट आहेत. दोस्ती... यारियां... मनमर्जियां या मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका विशेष लक्षवेधी ठरली. आघाडीच्या ब्रँडच्या जाहिरातींचा प्रमुख चेहरा म्हणूनही त्यांची ओळख होती.