रत्नागिरी - गणपती उत्सावासाठी गाजावाजा करुन ऐन पावसाळ्यात मुंबई-गोवा महामार्गावर वाशिष्ठी नदीवरील नवीन पुलाचा शुभारंभ करण्यात आला. या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. परंतु, काही दिवसातच या पुलावरील काँक्रीट उखडले गेले असून त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे गणेशोत्सोव साजरा करुन परतीच्या वाटेवर असणाऱ्या चाकरमान्यांना नाकह त्रासाला जावे लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण येथे बहादूरशेख ते कळंबस्तेला जोडणार्या वाशिष्ठी नदीवरील दोन जुने ब्रिटीशकालीन पूल आता कालबाह्य होत आहेत. या पुलाऐवजी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाअंतर्गत या मार्गावर एकच मोठा पूल बांधण्यात आला आहे. गणशोत्सोवाच्या तोंडावर हा नवीन पूल बंद होता. त्यामुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयी व्हावी म्हणून या पूलावरील एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. खासदार विनायक राऊत यांनी पाठपुरावा केल्यावर या पुलावरून गणेशोत्सवापूर्वी एकेरी वाहतूक सुरू झाली.
मात्र, वाहतूक सुरू झाल्याच्या दहा दिवासांमध्येच या पुलांच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचे दर्शन घडले आहे. या पुलाचे कॉंक्रीटचे काम हे पूलावरील एकेरी वाहतूक सुरू करण्याच्या आदल्या रात्रीच करण्यात आले होते. पुलाच्या वरचे कॉंक्रीटीकरण करताना लोखंडी जाळीच्यावर केलेले कॉंक्रीट तकलादू होते. परिणामी गणेशोत्सवातील वाहतुकीमुळे ते उखडले आणि आता त्याठिकाणी खड्डे पडले आहेत.