काबुल - इस्लामिक स्टेटने अफगाणिस्तानच्या जलालाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. रविवारी टेलिग्राम चॅनेलवरील अमाक न्यूज एजन्सीच्या गटाने सांगितले की, शनिवारी जलालाबादमध्ये तालिबानच्या वाहनांवर तीन आणि रविवारीए एक हल्ला झाला. या सर्व घटनांमध्ये ३५ हून अधिक तालिबान मारले गेले किंवा जखमी झाले आहेत.
जलालाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचे लक्ष्य तालिबानचे वाहन होते, असे स्थानिक माध्यमांचे वृत्त आहे. प्रत्यक्षदर्शीही तीच माहिती देत आहेत की, बॉम्बस्फोटानंतर अनेक तालिबान्यांना रुग्णालयात नेण्यात आले. ३० ऑगस्ट रोजी अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर शनिवारचा स्फोट हा सर्वात घातक असल्याचे म्हटले जात होते. तालिबानने अद्याप मृतांबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण तालिबानचे प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद यांनी टोलो न्यूजला बॉम्बस्फोटाची माहिती दिली आहे. अफगाणिस्तानात तालिबान्यांनी घुसखोरी केल्यापासून पाकिस्तानच्या सीमेवरील नांगरहार हा एकमेव प्रांत आहे जिथे तालिबानला आयएसने लक्ष्य केले आहे. पूर्वीच्या अफगाणिस्तान सरकारच्या काळात नंगरहार आणि कुन्नर प्रांतातील काही जिल्हे आयएसचे गड होते. परंतु, नंतर फागन सैन्य, मोठ्या प्रमाणात झालेली बंडखोरी आणि तालिबानने त्यांना परतवून लावले.
आयएस आणि तालिबान हे सुन्नी इस्लामवादी गटाचे कट्टर चेहरे आहेत. परंतु धर्म आणि रणनीतीच्या बाबतीत त्यांचे मत भिन्न आहे. ज्यामुळे त्यांच्यामध्ये रक्तरंजित संघर्ष चालू आहे. हे दोघेही अफगाणिस्तानमध्ये तैनात असलेल्या अमेरिकन सैन्याच्या विरोधात होते. तालिबानची इच्छा होती की, त्यांनी अफगाणिस्तानवर नियंत्रण ठेवावे, आयएस जागतिक जिहादचे स्वप्न पाहत आहे. यापूर्वी, आयएसने अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळावर हल्ला केला. जिथे शेकडो लोक तालिबानच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होते.