केडीएमसीच्या वाढीव मालमत्ता कर बिलाची होळी करू!
केडीएमसीच्या वाढीव मालमत्ता कर बिलाची होळी करू!
02-Sep-2021
Total Views | 65
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका २७ गावांना सोयीसुविधा देत नाही. मालमत्ता करांमध्ये सुध्दा त्यांनी १० टक्क्यांनी वाढ केली आहे. हा कर भरण्यासाठी महापालिका सक्ती करीत आहे. संघर्ष समितीने हा कर भरू नये असे जाहीर केले आहे. तसेच सुविधा न देता महापालिका वाढीव मालमत्ता कर भरण्याची सक्ती करीत असल्याने त्या बिलाची होळी करू असा इशारा सर्व पक्षीय संघर्ष हक्क संरक्षण समितीने दिला आहे.
कल्याण डोंबिवलीतील २७ गावे पूर्णत वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका तयार करा या मागणीसाठी २७ गाव संघर्ष हक्क संरक्षण समितीची मानपाडेश्वर मंदिरात नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी समितीने हा इशारा दिला आहे. संघर्ष समितीतील सदस्यांनी २७ गावांतील विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी चंद्रकांत पाटील, गंगाराम शेलार, गुलाब वझे आदी सदस्य उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, या परिसरात मेगा सिटी प्रकल्प येत आहे. दहा गावांचे ग्रोथ सेंटर असताना सुध्दा त्यांना शंभर एकर पेक्षा जास्त जागा घेतल्यामुळे त्यांना परवानगी दिली आहे. ते या परिसरात आल्यानंतर वाहतूक , शिक्षण अशा सर्वावरच ताण पडणार आहे. रुनवाल हा प्रकल्पाच्या जागेत प्रिमियर कंपनी होती. त्या ठिकाणी उद्योग उभा राहिला असता तर अनेकांना रोजगार मिळाला असता. या परिसरातील नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ग्रोथ सेंटर हे केवळ भूत आमच्या अंगावर सोडले आहे. ग्रोथ सेंटरमुळे १० गावातील लोकांना बांधकाम परवानगी मिळत नाही. त्यामुळे ग्रोथ सेंटर बंद करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डोंबिवलीत एक ही रस्ता चांगला नाही. रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्डयात रस्ते आहे समजत नाही. मुख्यमंत्री हे डोंबिवलीच जावई आहेत त्यांनी डोंबिवलीतील रस्त्याची पाहणी करावी. गणेशोत्सवापूर्वी किंवा गणेशोत्सवात डोंबिवलीला भेट द्यावी. त्यामुळे त्यांना याठिकाणच्या रस्त्याची वस्तुस्थिती काय आहे ते समजेल. मुख्यमंत्री येणार म्हणून तरी किमान आमचे रस्ते चांगले होतील, असे मत संघर्ष समितीच्या पदाधिका:यांनी व्यक्त केला आहे.