मुंबई : एकीकडे भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचे मार्केट वाढत असताना एक सकारात्मक बातमी समोर आली. इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत ओलाने विक्रम रचला. ओला इलेक्ट्रिकचे सहसंस्थापक भाविश अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ४८ तासांमध्ये १,१०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या ओला इलेक्ट्रिक वाहनांची विक्रमी विक्री झाली आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, पहिल्या दिवशी ओला स्कूटरची ६०० कोटी रुपयांची विक्री झाली होती. त्यामुळे कंपनीचा दावा आहे की, भारतातील ऑटोमोबाईल उद्योगात हा विक्री ऑर्डरचा आकडा एका दिवसाच्या विक्रीपेक्षा जास्त आहे.
भाविश अग्रवाल यांनी सांगितले की, भारत हा इलेक्ट्रिक वाहनांनाबाबतीत सकारात्मक आहे. प्रत्येक सेकंदात ४ स्कूटरची विक्री झाली. विशेष म्हणजे, ग्राहकांनी ओला स्कूटरला दिलेला हा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. या विक्रीला आमच्या अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे एक स्पष्ट झाले की, आपल्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची प्रचंड मागणी आहे. ओला इलेक्ट्रिकने ओला एस १ आणि एस २ या दोन मॉडेलची विक्री बुधवारी, १५ सप्टेंबरला ऑनलाइन सुरु झाली, तर गुरुवारी १६ सप्टेंबरला ही विक्री बंड करण्यात आली. आता पुढील विक्री ही १ नोव्हेंबरला सुरु होणार आहे.
ओला एस १ इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत १ लाख रुपये आहे. तर, एस १ प्रोची किंमत १.३० लाख रुपये. ओला ए १ ची सिंगल चार्जिंगनंतर रेंज १२० किमी आहे. तर, एस १ प्रोची रेंज १८० किमी आहे. एस १ प्रो ला मोठी बॅटरी मिळते, तर त्याची टॉप स्पीड ११५ किमी प्रतितास आहे. ओला एस १ मॉडेलमध्ये २.९८ केडब्ल्यूएच बॅटरी आहे, तर एस १ प्रोमध्ये ३.९७ केडब्ल्यूएच बॅटरी आहे.
ओला इलेक्ट्रिक स्कूटरचे चार्जिंग हे घरातील ५ ए सॉकेटच्या मदतीने करता येते. कंपनीने दुचाकीकरिता चार्जिंग नेटवर्कसाठी काम करणार असल्याचे जाहीर केले. कंपनीकडून देशभरातील ४०० शहरांमध्ये ग्राहकांकरिता १ लाख चार्जिंग पाँईट्स सुरू करण्यात येणार आहेत. ओलाची ई-स्कूटर ही १८ मिनिटात ५० टक्के चार्ज होते. तर ७५ किलोमीटर स्कूटर धावू शकते.