‘बदलापूर ऑर्ट गॅलरी’त अवतरले शेकडो गणराज

एका देखण्या श्री गणेश प्रदर्शनाची माहिती घेऊया.

    18-Sep-2021
Total Views |

fsd_1  H x W: 0

१० तारखेच्या शुक्रवारपासून श्री गणेशोत्सवाला मानसिक उत्साहाच्या धुमधडाक्यात सुरुवात झाली. घराघरांत श्री गणेशाचं आगमन झालं. प्रत्येक जण गणेशमय झाला. अशातच महाराष्ट्रातच नाही तर कदाचित भारतदेशात श्रीगणेश महाराज अशा काही थाटात प्रकटले आहेत की, प्रत्येक रूपाची नावे सांगता-सांगता या लेखाचीच सांगता होईल. तसे होऊ न देता आपण या स्तुत्य, आदर्श, मनोबल वाढविणार्‍या आणि वातावरण भक्तिमय करणार्‍या एका देखण्या श्री गणेश प्रदर्शनाची माहिती घेऊया.


असा गणराज मनी ध्यायीजे,
मनी पायीजे...
श्रावणात सुरू होणार्‍या हिंदू सणांच्या शृंखलेला जेव्हा सुरुवात होते, तेव्हा सप्ताहातल्या प्रत्येक वाराची एक कहाणी असते. त्या कहाणीत एक बोधप्रत कथानक असते आणि ती वाराची कहाणी सुरू करण्याअगोदर ‘कम्पलसरी’ श्रीगणेशाची कहाणी ही वाचायचीच असते. कुठलेही शुभकार्य करण्यासाठी श्री गणेशपूजनाने सुरुवात करतात. आपलं शास्त्र श्रीगणेशाला प्रथम वंदन करून पुढे जायला सांगते. त्याचप्रमाणे कुठल्याही संकटातून सहिसलामत मार्ग काढण्यास शक्ती मागितली जाते, तीही विघ्नहर्त्या श्री गणेशाकडेच...!! श्री गणेश ही देवताच अशी आहे की, अगदी लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सार्‍यांनाच आवडते. बरं ‘रूप’ कसं असावं? अगदी कसंही चालेल...!! या जगात, श्री गणेश देवता ही एकमेव अशी देवता आहे की, जिचं रूप प्रत्येकाच्या मनामनात साठलेलं असतं आणि म्हणून जे मनात ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी फारशी अडचण येत नाहीच, उलट जे प्रत्यक्षात उतरतं, ते उत्तम असतं, ते स्वयंभू असतं, ते सत्य आणि नितांत सुंदर असतं.

१० तारखेच्या शुक्रवारपासून श्री गणेशोत्सवाला मानसिक उत्साहाच्या धुमधडाक्यात सुरुवात झाली. घराघरांत श्री गणेशाचं आगमन झालं. प्रत्येक जण गणेशमय झाला. अशातच महाराष्ट्रातच नाही तर कदाचित भारतदेशात श्रीगणेश महाराज अशा काही थाटात प्रकटले आहेत की, प्रत्येक रूपाची नावे सांगता-सांगता या लेखाचीच सांगता होईल. तसे होऊ न देता आपण या स्तुत्य, आदर्श, मनोबल वाढविणार्‍या आणि वातावरण भक्तिमय करणार्‍या एका देखण्या श्री गणेश प्रदर्शनाची माहिती घेऊया.
मुंबई आणि मुंबई उपनगरांतही यंदा इतर शहरांप्रमाणे श्री गणेशोत्सवास उत्साहात सुरुवात झाली. ज्या उपक्रमांत खरंतर ‘न्यूज व्हॅल्यू’ आहे, ज्या उपक्रमामुळे खरं तर ‘शुभवार्ता’ दर्शकांना आणि रसिकांना मिळू शकेल आणि काही क्षण का होईना, परंतु, सध्याच्या दोन वर्षांपासून मानगुटीवर बसलेल्या कोरोना राक्षसामुळे जो तणाव आहे, त्यापासून सुटका मिळेल, अशा सुंदर, भावशक्तीचं गुरुत्वीय बल निर्माण झालेल्या ‘श्री विघ्नहर्ता’ या प्रदर्शनाने, बदलापूरकरांचं वातावरण महोत्सवी बनवलं.
बदलापूर, एक मध्य रेल्वेचं म्हणजे मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील कर्जत स्टेशनच्या अगोदरचं (मुंबईकडून पुण्याला जाताना) मोठं रेल्वे स्टेशन. ही झाली या बदलापूर शहराची आधुनिक ओळख. पण, या शहराला ऐतिहासिक महत्त्वही आहे, हे किती जणांना माहिती आहे? हा अडचणीत टाकणारा प्रश्न न विचारताच याचं ऐतिहासिक महत्त्व सांगतोच.
 
छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा राजगड/रायगड किंवा मावळ प्रांतातून सुरतेच्या दिशेने निघायचे, तेव्हा त्यांच्या सैन्याचं मुक्कामाचं स्थळ म्हणजे बदलापूर. त्यांच्या सैन्यातील ज्या ज्या घोड्यांना कर्तव्य बजावण्याच्या दृष्टीने कामे दिलेली असायची. जसे दाणागोटा, चारा, पाण्याच्या घागरी वा खाण्या-पिण्याचे साहित्य, शिदोरी इ. काम बदलापूर गावात आल्यावर विश्रांतीच्या वेळी, बदललं जायचं. म्हणजे आतापर्यंत जी घोडी रिकामीच बरोबर असायची त्यांच्या पाठीवर अगोदरच्यांची ओझी दिली जायची, म्हणेच बदलली जायची, म्हणजे गुजरातेत जाण्याच्या मार्गावरील या ठिकाणाला ‘बदलापूर’ असे नाव पडले. येथेच घोडे, ‘ड्युट्या’ बदलल्या जातात, हे पाहिल्यावर आजूबाजूचे शेतकरी, कामकरी या ठिकाणी वसती करायला लागले. एक खेडेगाव तयार झालं. तेच आजचं ‘विघ्नहर्ता’ प्रदर्शनाच्या रूपाने ओळख वृद्धिंगत करणार ‘बदलापूर’ शहर.या शहराने आता कात टाकायला सुरुवात केली आहे. मुंबईच्या धकाधकीपासून ‘बदल’ हवाय, या इच्छेने बरीच मुंबईकर मंडळी बदलापूरला विसावली आहेत, या ‘बदल प्रक्रियेत’ आमचा दृश्यकलाकार कसा मागे राहील?

आज बदलापूरला अनेक चित्रकार, शिल्पकार, स्थायिक झालेले दिसतात. एकाबरोबर दोन-तीन-दहा-पन्नास, असे सकारात्मक विचारसरणीचे लोक जागरूकतेने एकत्र आले, तर काय होऊ शकतं, याचं बोलकं उदाहरण म्हणजे ‘बदलापूर आर्ट गॅलरी’ची स्थापना. काही ज्येष्ठ आणि प्रयोगशील कलाकारांनी एक मंच स्थापन केला, त्यातून ‘गॅलरी’ स्थापन करण्याचा विचार पुढे आला आणि अगदी अलीकडच्या दशकात या गॅलरीची स्थापना झाली.कुळगांव-बदलापूर नगरपालिकेने, सकारात्मक कलाकारांच्या सांस्कृतिक विचारांना मूर्तस्वरूप देत, बदलापूर शहराच्या ‘प्राईम लोकेशन’मध्ये चौकांच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आणि ‘बदलापूर आर्ट गॅलरी’ जन्मास आली. कुठलाही बदल हा काही ना काही तरी शिकवून जातो. बदलापूरमधील ‘विघ्नहर्ता’ या श्रीगणेश प्रदर्शनातून कोरोना पार्श्वभूमीवर झालेला-घडवून आणलेला बदल निश्चितपणे शिकवून जाणाराच ठरेल, यात संदेह नाही.

मला काही दिवसांपूर्वी बदलापूर येथील चित्रकर्ती भावना सोनवणे यांचा फोन आला. त्यांच्या ‘विघ्नहर्ता’ प्रदर्शनासाठी एका विशिष्ट आकारातीलच श्रीगणेशचित्र, पेंटिंग वा अन्य माध्यमातील कलाकृती त्यांनी मागितली होती. श्रीगणेश प्रतीकावर सुमारे १९९८ पासून संशोधनात्मक अभ्यास करणारा मी, त्वरित हो म्हणालो आणि मग पुढे त्यांनी प्रदर्शनाच्या स्वरूपाची माहिती दिली. उपक्रम नुसता स्तुत्यच नव्हता, तर त्यामागे अनेक आव्हानेही होती. कलाकारांना संपर्क करणे, त्यांच्याकडून कलाकृती मागविणे, आकार निश्चित करणे, जास्तीत जास्त कलाकारांच्या कलाकृती प्रदर्शित होण्यासाठीची सकारात्मक मानसिकता अखेरपर्यंत जीवंत ठेवणे, कंटाळा न येऊ देता सातत्य ठेवणे, अगदी काम करणार्‍या सहकार्‍यांशी सुसंवाद साधून प्रदर्शनस्थळी कलाकृती एका आकर्षक रचनेत प्रदर्शित करून पाहुण्यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करणे, या सार्‍या मैलाच्या दगडांना पार केल्यानंतर ‘विघ्नहर्ता’ पावतो.

भावना सोनवणे यांनी माहिती दिली की, राजेंद्र घोरपडे यांच्या पुढाकाराने आणि काही स्थानिक ज्येष्ठ कलाकारांच्या साहाय्याने ‘बदलापूर आर्ट गॅलरी’ सुरू झाली. या गॅलरीत १२५ कलाकारांहून अधिक कलाकारांनी, त्यांच्या कलाकृती पाठवून सहभाग घेतलेला आहे.चित्र, उठाव शिल्प, कोलाज, धातुकाम, मीनाकारी, प्रिंट रेखाटणे, या व अशा विविध माध्यमांमध्ये, सिद्धहस्त काम करणार्‍या कलाकारांनी इ. निर्माण केलेल्या कलाकृती पाठविलेल्या आहेत. या कोरोनाकाळातील प्रत्यक्ष स्वरूपात म्हणजे ‘ऑफलाईन’ प्रकारातील पहिलेच मोठ्या रचनेतील हे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनाचा दर्जाही तितकाच उंच होता.

चित्रकार आबालाल रहमान, चंद्रवर्मा, बद्रीनारायण, संभाजी कदम, विजू सडवेलकर या दिवंगत चित्रकारांच्या कलाकृतींसह सुहास बहुळकर, वासुदेव कामत, कुमुद जसानी, प्रतिभा वाघ, विनोद व प्रमोद गुरुजी बंधू, प्रीतम देऊसकर, प्रतिमा वैद्य, शुभा गोखले, विजयराज बोधनकर, सुरेंद्र जगताप, राजेंद्र महाजन, विजय ढोरे, राजू बाविस्कर, मंजिरी मोरे, अर्पिता रेड्डी, श्याम कुमावत, मृणाल जोहरापूरकर, सुमना डे, रामचंद्र व वर्षा खरटमल, सुमन वाड्ये, पवनकुमार, हृषीकेश देशमाने, अजय मेश्राम, प्रशांत हिर्लेकर यांच्यासह आणखी काही नवोदित व उदयोन्मुख कलाकारांच्या कलाकृती येथे प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.
कार्यकारी समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ चित्रकार श्रीकांत जाधव, भावना कदम ज्या या समितीच्या उपाध्यक्ष आहेत, सुबोध कर्पे, राकेश सूर्यवंशी, संतोष कुमार, शार्दूल कदम, राहुल म्हेत्रे, जोत्स्ना कदम, कैलास मालखेडे, श्वेता काटवडेकर यांनी ‘विघ्नहर्ता’ या प्रदर्शनास खर्‍या अर्थाने मूर्त स्वरूप दिले. हे प्रदर्शन खरंतर एक प्रातिनिधिक बदल आहे, तोही बदलापूरला हा निव्वळ योगायोग वाटत नाही. सर्व वयोगटातील, ज्येष्ठ-कनिष्ठ, मूर्त-अमूर्त अनुभवी-नवोदित असा कुठल्याच प्रकारचा भेद, किंतु-परंतु कुणाही कलाकारांच्या मनात न येता, एकाच व्यासपीठावर ५०-६० वर्षांची कलासाधना करणार्‍या कलाकाराचे श्रीगणेशाकार एकाच वेळी पाहायला मिळताहेत. हे कमी की काय, अगदी दिवंगत कलाकारांच्या अजरामर कलाकृती पाहण्याची दुर्मीळ संधी येथे उपलब्ध झालेली आहे. हाही एक दैवी चमत्कारच म्हणावा लागेल.

 
इतक्या मोठ्या सकारात्मक ऊर्जेच्या ठिकाणी त्या-त्या कलाकृतींचे रसग्रहणात्मक विश्लेषण करत आपल्या वाचकांना लेखी कळविण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने, जास्त गर्दी न करता कोरोनाविषयक सर्व बंधने पाळून ‘बदलापूर आर्ट गॅलरी’ला विश्वात्मक गणेशाची रूपे पाहण्याची संधी दि. २५ सप्टेंबरपर्यंत उपलब्ध आहे. सर्वांनी या प्रदर्शनाच्या रूपाने आध्यात्मिक गणेशरूपांचं दर्शन घ्यावं, असं एक गणेशभक्त म्हणून आवाहन करतानाच या गॅलरी व्यवस्थापनासह कुळगांव-बदलापूर नगरपालिकेलाही शुभेच्छा देताना आनंद होतो.


- डॉ. प्रा. गजानन शेपाळ