ममतांना ‘भवानी’(पूर) पावणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2021   
Total Views |

Mamata_1  H x W
 
 
भवानीपूर मतदारसंघातून विजयी होणे ही ममतांसाठी केवळ औपचारिकता असल्याचे मानले जात आहे. त्यांच्यासाठी शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी जागा रिकामी करून दिली आहे. मात्र, सुवेंदू अधिकारी यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला असल्याने ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघाची निवडणूक हलक्यात घेणार नाहीत.
 
 
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली. मात्र, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदिग्राममधून पराभव झाला होता. निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात हिंसाचाराचे मोठे सत्र सुरू झाले. हा हिंसाचार सत्ताधारी तृणमूल पुरस्कृत असून, त्यात भाजप समर्थक, कार्यकर्ते यांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोग यांनी स्वतंत्रपणे बंगालचे दौरे करून हिंसाचाराचा अहवाल तयार केला आहे. तसेच याप्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जोरदार झापून हिंसाचाराची ‘सीबीआय’ आणि ‘एसआयटी’ चौकशी करण्याचेही निर्देश दिले आहेत. सध्या ‘सीबीआय’ आणि ‘एसआयटी’ आपला तपास करीत आहे. ‘सीबीआय’ने दाखल केलेल्या ‘एफआयआर’मध्ये हिंसाचाराची दाहकता अधिकच स्पष्ट झाल्याचे दिसत आहे.
 
 
 
या पार्श्वभूमीवर प. बंगाल विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे. येत्या ३० सप्टेंबर रोजी भवानीपूर, जंगीपूर आणि शमशेरगंज विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणूक होणार असून, ३ ऑक्टोबर रोजी मतमोजणी आहे. त्यापैकी भवानीपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या निवडणूक लढविणार आहेत. अर्थात, भवानीपूर मतदारसंघातून विजयी होणे ही ममतांसाठी केवळ औपचारिकता असल्याचे मानले जात आहे. त्यांच्यासाठी शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी जागा रिकामी करून दिली आहे. मात्र, सुवेंदू अधिकारी यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला असल्याने ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघाची निवडणूक हलक्यात घेणार नाहीत. कारण, पुन्हा सत्ता मिळाल्याच्या आनंदात सुवेंदू अधिकारी यांच्या विजयामुळे मिठाचा खडा पडला होता आणि तो पराभव ममतांना अतिशय जिव्हारी लागला होता.
 
 
त्यामुळेच आता हक्काचा आणि हमखास विजय मिळवून देणार्‍या मतदारसंघाची निवड ममतांनी केली आहे. ममतांना २०११ आणि २०१६ साली भवानीपूर मतदारसंघातून विजय मिळाला होता, त्यामुळे आता तिसर्‍यांदाही विजय मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. भवानीपूर मतदारसंघ हा बंगालच्या राजकारणात ममतांचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला अपेक्षित अशा ‘सुवेंदू अधिकारी विरुद्ध ममता बॅनर्जी’ या जाळ्यात त्या अडकल्या आणि त्यामुळेच केवळ एकाच मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामागे निवडणूक प्रचार व्यावसायिक प्रशांत किशोर यांचाही सल्ला होताच. मात्र, तो सल्ला अगदीच ममतांच्या अंगाशी आला. कोलकाता दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणार्‍या भवानीपूर मतदारसंघात गेल्या १५ वर्षांपासून तृणमूल काँग्रेसचा वरचश्मा राहिला आहे. या मतदारसंघाचा इतिहास बघितल्यास १९५२ साली काँग्रेसला विजय मिळाला होता. त्यानंतर बंगालचे माजी मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे यांनी १९५७ आणि १९६२ साली विजय मिळविला होता. मात्र, त्यानंतर राज्याच्या राजकारणात काँग्रेस क्षीण होत गेल्याने त्यांच्या हातून हा मतदारसंघ निसटला. राज्याच्या २०११ साली झालेल्या निवडणुकीत तृणमूलचे सुब्रत बक्षी विजयी झाले होते, त्यांनीही तेव्हा ममतांसाठी जागा रिकामी करून दिली. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ममतांनी माकपच्या नंदिनी मुखर्जी यांचा ५० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. त्यानंतरच्या २०१६ सालच्या निवडणुकीत काँग्रेसच्या दीपा दासमुन्शी यांचा ममतांनी २५ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. आकडेवारीनुसार निकाल पाहिल्यास, २०११, २०१६ आणि २०२१ मध्ये तृणमूल काँग्रेसची मतांची टक्केवारी अनुक्रमे ६३.७८ टक्के, ६६.८३ टक्के आणि ५७.७१ टक्के अशी राहिली आहे. त्यामुळे आपल्यावर पुन्हा पराभवाची नामुष्की येणार नाही, अशी अपेक्षा करून ममतांनी या सोप्या मतदारसंघाची निवड केल्याचे स्पष्ट झाले.
 
 
पोटनिवडणुकीत त्यांचा सामना भाजपच्या प्रियांका टिबरेवाल आणि माकपच्या श्रीजीब विश्वास यांच्यासोबत होणार आहे. काँग्रेसने या निवडणुकीत ममतांविरोधात उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केले आहे. अर्थात, काँग्रेस नेतृत्वाच्या या निर्णयाविषयी लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधिररंजन चौधरी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या निर्णयामुळे काँग्रेसचे उरलेसुरले क्षीण संघटन पूर्णपणे नष्ट होईल, असे त्यांचे मत होते. मात्र, सध्या भाजपविरोधासाठी ममतांची साथ घेण्याचा विचार करणार्‍या सोनिया गांधी यांना सध्या तरी ममतांना दुखवायची इच्छा नाही, त्यामुळे काँग्रेसने उमेदवार न देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे खरी लढत ही तृणमूल-भाजप-माकप यांच्यामध्ये होणार असल्याचे स्पष्ट आहे. अर्थात, बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्थान आवाम मोर्चाने (हम) आपला उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे. पक्षाचे बंगाल प्रदेशाध्यक्ष सतादरू यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे ठरविले आहे. मात्र, त्यामुळे फार फरक पडण्याची शक्यता धुसर आहे.
 
 
भाजपने या निवडणुकीत प्रियांका टिबरेवाल यांना उमेदवारी दिली आहे. टिबरेवाल या सर्वोच्च न्यायालय आणि कोलकाता उच्च न्यायालयातील वकील आहेत. त्यासोबतच प. बंगाल भाजप युवा मोर्चाच्या त्या उपाध्यक्षही आहेत. मात्र, त्यांची आणखी एक ओळख म्हणजे त्यांनी कोलकाता उच्च न्यायालयात निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराविरोधात याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेवर सुनावणी करतानाच न्यायालयाने ‘सीबीआय’ आणि ‘एसआयटी’ चौकशीचा निकाल दिला होता. टिबरेवाल यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने इंटल्ली मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, त्यात त्यांचा तृणमूल काँग्रेसचे स्वर्णकमल साहा यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला होता. मात्र, असे असले तरीही ममता सरकारला हिंसाचाराविरोधात न्यायालयात खेचण्याचे आणि ‘सीबीआय’-‘एसआयटी’ चौकशीचे आदेश मिळविण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे टिबरेवाल यांच्याकडे तृणमूल काँग्रेसला अगदीच दुर्लक्ष करून चालणार नाही.
 
 
 
बंगाल हिंसाचार खटल्यात प्रियांका यांनी अतिशय चोख युक्तिवाद केला होता. बंगालच्या हिंसाचाराविषयी त्या म्हणतात, “हिंसाचाराकडे बंगाल सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. बंगालच्या मतदारांची निर्घृणपणे हत्या होत असताना, सर्वत्र लूटमार, जाळपोळ, बलात्काराच्या घटना घडत असताना ममता बॅनर्जी या डोळे झाकून बसल्या होत्या. त्यामुळे बंगाली जनतेला न्याय मिळवून देणे ही माझी जबाबदारी आहे. न्यायालयीन लढा चालूच राहणार असून, त्यामुळे अत्याचारपीडित बंगाली जनतेच्या मनातही आत्मविश्वास जागा झाला आहे,” असे त्यांनी सांगितले आहे. बंगालमध्ये बंगाली अस्मिता आणि प्रामुख्याने हिंदी भाषकांचा विरोध हा मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा ठरत असतो. मात्र, तृणमूल काँग्रेसच्या हिंदीविरोधी राजकारणाचाही भवानीपूर मतदारसंघात फारसा फरक पडणार नसल्याचे टिबरेवाल यांचे मत आहे. तृणमूल काँग्रेसच्या दबावामुळे या मतदारसंघात नेहमीच ४० टक्क्यांच्या आसपास मतदान होते, कारण तृणमूल काँग्रेस हिंदी भाषक मतदारांना मतदानच करू देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
 
 
एकूणच, संपूर्ण देशाचे लक्ष आता भवानीपूर मतदारसंघाकडे लागले आहे. विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळविल्यानंतर आता ममतांना पुन्हा राष्ट्रीय राजकारणाचे आणि भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पडू लागले आहे. त्यासाठी गेल्या महिन्यातच त्यांनी दिल्लीत विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या, काँग्रेससोबतही जुळवून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत पुन्हा विजय मिळविणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. यदाकदाचित भाजपच्या प्रियांका टिबरेवाल यांनी त्यांचा पुन्हा पराभव केलाच, तर मात्र ममतांच्या राजकारणावर त्याचा प्रतिकूल परिणाम होणार हे निश्चित!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@