उत्तरप्रदेश देशात अग्रेसर का याची कारणे शोधण्याचेही समितीला निर्देश
मुंबई: उत्तरप्रदेश राज्य हे साखर उत्पादनात देशात अग्रेसर असून साखर उद्योगात एकेकाळी अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्राच्या पुढे गेला आहे. याबाबतची कारणे शोधत महाराष्ट्र राज्य पुन्हा साखर उत्पादनामध्ये अव्वल येण्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून महाराष्ट्र सरकारने साखर आयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली शासन स्तरावर समिती गठीत केली आहे. याबाबतचे परिपत्रक राज्य सरकारने जारी केले आहे.
या परिपत्रकात म्हंटले आहे की, सन २०१९-२० मधील ऊस गाळपाचे हंगाम आणि सन २०२०-२१मधील ऊस गाळप हंगामाचे धोरण ठरवण्यासंदर्भांत दि. २५.६.२०२० रोजी मा. मंत्री समितीची बैठक घेण्यात आली होती. सदर बैठकीत “उत्तरप्रदेश हा साखर उत्पादनामध्ये देशात अग्रेसर असून साखर उद्योगामध्ये एके काळी अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रापुढे गेला आहे. याबाबत कारणे शोधून महाराष्ट्र राज्य पुन्हा साखर उत्पादनामध्ये अव्वल येण्यासाठी प्रयत्न करणे.” याकरीता साखर आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली शासन स्तरावर समिती गठीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यास अनुसरुन साखर आयुक्त, पुणे यांनी १८.८.२०२०ला पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्र राज्य पुन्हा अव्वल येण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी साखर आयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासमितीत ११ सदस्य असणार आहेत. त्याचप्रमाणे दोन महिन्यात या समितीला अहवाल सादर करण्याचेही नमूद करण्यात आले आहे.