वंचित समाजघटकांच्या उत्थानासाठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2021   
Total Views |

Seema Chitte_1  
 
 
शोषित-वंचित समाजघटकांच्या न्यायहक्कासाठी संघर्ष करणाऱ्या आणि समाजघटकांना न्याय मिळवून देणाऱ्या सीमा धुडकू चित्ते यांच्या जीवनकार्याचा घेतलेला मागोवा...
 
 
आयुष्य पोळलेले असताना दुसऱ्याच्या आयुष्यात सुखाचे दिवस आणण्यासाठीसुद्धा मानवी शाश्वत मूल्यांची जाणीव असावी लागते. नेमके हेच धैर्य आणि हीच शाश्वत मूल्यांसंदर्भातील जाणीव नाशिकच्या सीमा चित्ते यांच्याकडे आहे. सीमा या ‘भटके विमुक्त दलित वनवासी ओबीसी समाज विकास परिषद’ या संस्थेच्या महाराष्ट्राच्या महिला अध्यक्ष आहेत. त्या ज्या संघटनेचे काम करतात, ती संघटना मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय आणि वनवासी समाजासाठी कार्यरत आहे.
 
 
कोरोना काळात सीमा यांनी रा. स्व. संघाच्या माध्यमातून देवदासी महिलांना रेशनचे वितरण केले. वनवासी कल्याण आश्रमाचे शरद चव्हाण यांच्या सहकार्याने गरजूंना कोरोना काळात विविध आयामांतून मदत केली. सीमा यांनी संघटनेच्या माध्यमातून शेकडो भटके विमुक्त समाजबांधवांना रेशनकार्ड मिळवून दिले. हे काम सोपे नव्हते. आपण भारतीय नागरिक आहोत, असे दर्शवणारे एकही कागदपत्र या बांधवांकडे नव्हते. सीमा यांनी संघटनेच्या माध्यमातून सततचा संघर्ष केला. शेवटी पालावर राहणाऱ्या जवळ जवळ १००च्यावर कुटुंबीयांना रेशनकार्ड वितरित करण्यात आले. दिव्यांगांनाही दारिद्य्र रेषेखाली दर्शवणारे रेशनकार्ड वितरित होणार, अशी एक सरकारी योजना आहे. दि. १५ ऑगस्ट रोजी नाशिकच्या आजूबाजूच्या शहरात ही योजना कार्यान्वित झाली. मात्र, नाशिकमध्ये याबाबत काहीच कारवाई होताना दिसली नाही. सीमा यांनी नाशिक शहरात दिव्यांगांना ही योजना लागू व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांना यश येत आहे.
 
 
सीमा यांच्या आयुष्याचा प्रेरणादायी आणि आनंददायी प्रसंग कोणता? तर नाशिक शहर परिसरातील एका रस्त्यालगत झोपडपट्टी होती. प्रशासनाने रस्त्याच्या कामासाठी या कच्च्या झोपड्यांना येथून हटवण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी या विस्थापितांना पक्की घरे देण्याचाही निर्णय घेतला. या वस्तीत एक आज्जी राहायच्या. त्या बिगारी काम करायच्या. दिवसभर त्या कामाला जायच्या. नेमके याच काळात प्रशासनाचे अधिकारी सर्वेक्षण करायला यायचे. त्यामुळे विस्थापितांच्या यादीमध्ये आजींचे नाव आलेच नाही. आजींच्या मदतीला सीमा धावल्या. आजी या वस्तीतील रहिवासी होत्याच, हे सीमा यांनी प्रशासनाला कागदोपत्री पटवून दिले. आयुष्यभर निराधार आणि बकाल घरात असलेल्या आजींना हक्काचे घर मिळाले. सीमा म्हणतात, “आजीला हक्काचे घर मिळाले हा माझ्यासाठी प्रेरणादायी आनंदाचा क्षण.”
 
 
सीमा यांच्या आयुष्याचा मागोवा घेतला तर जाणवते की, त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण का होता?
 
 
तर, धुळ्याच्या कुसूंबा गावच्या कुंभार समाजाचे धुडकू चित्ते आणि सुमन यांना सहा अपत्ये. पाच कन्या एक पुत्र. त्यापैकी एक सुकन्या सीमा. धुडकू हे शिक्षक, तर सुमन या गृहिणी. घरात अत्यंत समाजशील आणि सुसंस्कृत वातावरण. घरात काळा मसाला, उन्हाळी कुरडया, पापड, लोणची, सांडगे बनत. सुमन सगळेच पदार्थ अधिक करत. गावाबाहेर राहणाऱ्या आयाबायांना हे पदार्थ अगत्याने डबे भरून देत. त्यावेळी सीमा लहान होत्या. त्या सुमन यांना म्हणाल्या, “आई यांना का देतेस? राहू दे ना आपल्याला जास्तीचे.” यावर सुमन जे म्हणाल्या ती सीमा यांच्या आयुष्याची मार्गदर्शक तत्त्वेच झाली. सुमन म्हणाल्या, “आपल्याकडे आहे म्हणून देतो. आपल्याकडे असल्यावर ज्यांच्याकडे नाही, त्यांना थोडेतरी द्यायलाच पाहिजे.”
 
 
२००० साली अकरावीमध्ये शिक्षण घेत असतानाच सीमा यांचा विवाह झाला. मात्र, संशय आणि अंधश्रद्धा यामुळे सासरच्यांनी पहिल्या दिवसापासून सीमा यांचे जगणे मुश्किल केले. एका दिवाळीत सीमाला सांगितले गेले, “जा, तुझ्या बाबांकडून एक लाख रूपये आण.” त्यांनी पैसे आणले नाहीत म्हणून त्यांचा छळ सुरू झाला. “तू सुंदर आहेस. त्यामुळे लोक करणी करतात,” असाही आरोप करून त्यांना घरात डांबून ठेवण्याचा प्रयत्न सुरू झाला. सीमा मनाने खचल्या होत्या. आयुष्य संपवावे, असे त्यांच्या मनात खूपदा येत होते. मात्र, यावेळी सीमा यांच्या आईने खंबीर भूमिका घेतली. शेवटी सीमा यांनी घटस्फोट घेतला. या काळात पुढचे आयुष्य अंधारमयच वाटत होेते. एकटेपणाच्या काळात त्यांचे लक्ष घराबाहेरच्या रस्त्यालगत गेले. रस्त्यांच्या कडेला गोणपाट आणि प्लास्टिकची कच्ची घरे वसलेली होती. अंधारात, चिखलातले ते उघडे संसार, लोक. हे लोक कसे जगतात? हा विचार सीमा करू लागल्या. त्यातूनच एकदा मग इथल्या एका महिलेशी संवाद साधला. घर नाही, गाव नाही, हातावरची पोटं, आज इथे उद्या तिथे. या लोकांचे जगणे किती कष्टप्रद आहे, यांच्या आयुष्यातील दु:खापुढे आपले दु:ख काहीच नाही, असे सीमा यांना वाटले. त्यांनी मग या वस्तीतील लोकांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली. इथे ‘भटके विमुक्त दलित वनवासी ओबीसी समाज विकास परिषद’या संघटनेचे काम सुरू होते. २००६ साली सीमा या संघटनेच्या कार्यकर्त्या झाल्या. आज त्या संघटनेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा आहेत. वंचित समाजघटकांना आणि महिलांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना त्या चांगल्याप्रकारे हाताळतात. त्यासाठी सरकारच्या नवीन योजना काय आल्या आहेत, नाशिक शहरातील वस्तीपातळीवरील नवीन समस्या काय आहेत, याचा त्या सातत्याने अभ्यास करतात. त्या अनुषंगाने कार्य करतात. सीमा म्हणतात, ’‘भटके विमुक्त समाजाचे प्रश्न सोडवणे हे माझ्या आयुष्याचे ध्येय बनले आहे. समाजातील सज्जनशक्ती माझ्या सोबत आहे. कारण, वंचित समाजघटकांना समाजप्रवाहात आणणे काळाची गरज आहे.” सीमा यांच्या कार्याची आणि विचारांची समाजाला नितांत गरज आहे, हे नक्की!
 
 
@@AUTHORINFO_V1@@