मुंबई : साकीनाका येथील पीडित महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण देखील करण्यात आली होती. शनिवारी त्या पिडीतेचा मृत्यू झाला. यानंतर सर्व देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी पीडितेच्या परिवाराचीही भेट घेतली. यावेळी महिला आयोगाच्या टीमने मुंबईत येऊन राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
राष्ट्रीय महिला आयोग सदस्य चंद्रमुखी देवी यांनी यावेळी सांगितले की, "गेल्या २ वर्षांपासून महिला आयोगाची स्थापना नाही. महाराष्ट्रात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पीडितेच्या कुटुंबियांची आम्ही भेट घेतली असून पोलिसांकडून संबधित घटनेची माहिती घेतली आहे. पीडितेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचाही देखील जबाब नोंदवण्यात येणार आहे. यासोबतच पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून विस्तृत माहिती जाणून घेऊ. त्यानंतर यावर चर्चा करता येऊ शकेल,"
"राज्य महिला आयोग ही महत्वाची संस्था आहे. संपूर्ण देशात प्रत्येक राज्यात राज्य महिला आयोग आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून राज्य महिला आयोगाची नेमणूक करण्यात आलेली नाही. अशा वेळी कोणतीही पीडित महिला राज्य महिला आयोगाकडेच मदतीसाठी जाते. येथे अशी कोणतीच संस्था नाही जिथे महिला आपली बाजू मांडू शकतील. मला हे कळत नाही, की सरकार इतके असंवेदनशील कसे आहे? त्यांनी महिला आयोगाची स्थापना केलेली नाही," अशा शब्दात महिला आयोगाच्या सदस्यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.