भारतीय मुस्लीम मन तेव्हाही आणि आताही...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Sep-2021   
Total Views |

ds_1  H x W: 0

 
 
‘इस्लामचे भारतीय चित्र’ आणि ‘कानोसा : भारतातील मुस्लीम मनाचा’ ही हमीद दलवाई यांच्या लेखाची दोन पुस्तके. नावावरूनच या दोन्ही पुस्तकांचे वैचारिक जुळेपण स्पष्ट होते. इस्लामचे भारतीय चित्र हे भारतातील मुस्लिमांच्या मनाचा कानोसा घेतल्याशिवाय शक्यच नाही. मुस्लीम म्हणून भारतात जगताना मुस्लिमांची मानसिकता का आणि कशी झाली, याचे अत्यंत स्पष्ट आणि कठोर वास्तव हमीद मांडतात. या मांडण्यात कोणताही आडपडदा नाही. निर्भयता आणि केवळ राष्ट्रीयत्वाच्या भूमिकेतून मांडलेले हमीद यांचे लेख भारतीय मुस्लिमांचे अंतरंग उलगडत जातात.
 
 
“तुमचे कोणतेही प्रश्न तुमच्या एकट्याचे नसून, ते या देशात बहुसंख्य असलेल्या जनतेचे आहेत. त्यांची सोडवणूक व्हायला हवी असेल तर ते त्या बहुसंख्य जनतेच्या सदिच्छेनेच सुटू शकतील, असे मी मानतो.” ‘इस्लामचे भारतीय चित्र’मधील ‘मानसिक तणाव’ या लेखात हमीद दलवाई एका मुस्लीम सामाजिक विचारवंत कार्यकर्त्यास सांगतात. आज भारतीय राजकारण आणि समाजकारणाचा मागोवा घेतला तर हमीद यांचे म्हणणे पटल्याशिवाय राहत नाहीत. ‘ते आणि आम्ही’ ही भूमिका पूर्वापार आहे.
 
 
त्याला इतिहासाची कटुता आहे. त्यामुळे हिंदूने कितीही ठरवले की, आम्ही मुसलमानांचे इतिहासातील अत्याचार विसरू तर ते शक्य नाही. मात्र, प्रत्यक्ष वास्तव विचार केला तर जाणवते की, १२५ कोटी लोकसंख्येमधील १०० कोटी जनता कितीही घटनाप्रेमी, राष्टप्रेमी असली आणि २५ कोटी लोकसंख्येमधले दहा टक्के जरी समजा देशविरोधी विचार करत असले, तर त्याची भयानकता शब्दात मांडता येत नाही. (हेच उलट झाले तरी भयानकच!) या अशा पार्श्वभूमीवर भारतीय मुस्लिमांच्या मानसिकतेचा शोध घेण्यासाठी हमीद दलवाई यांचे ‘इस्लामचे भारतीय चित्र’ आणि ‘कानोसा : भारतातील मुस्लीम मनाचा’ हे पुस्तक मदत करते.
 
 
 
‘इस्लामचे भारतीय चित्र’ किंवा ‘कानोसा : भारतातील मुस्लीम मनाचा’ ही दोन्ही पुस्तके ६० ते ६५ पानांची. हमीद दलवाई यांनी लिहिलेल्या विविध लेखांचा संग्रह म्हणजे ही पुस्तके. मुस्लीम समाजात परिवर्तन होण्यास इतक्या अडचणी का? याबाबतची सखोल आणि संवेदनशील अत्यंत सहज मांडणी या पुस्तकात हमीद करतात. या दोन्ही पुस्तकात विविध स्तरातील मुस्लिमांची मनोभूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जमात-ए-इस्लामिया, देवबंद, पाकिस्तान सीमेलगत राहणारा मुसलमान, बांगलादेशच्या सीमारेषेवर राहणारा मुसलमान, त्यात बहुसंख्य मुस्लीम अजूनही पाकिस्तानधार्जिणे कसे आहेत? तसेच प. बंगालच्या काही मुस्लिमांना अजूनही कसे वाटते की, पूर्व बंगाल आणि प. बंगाल कधीतरी एकत्र येतील, याची मासलेवाईक उदाहरणही हमीद यांनी दिली आहेत.
 
 
 
मी मुस्लीम आहे आणि मुस्लिमांबद्दल चांगले चांगलेच लिहायला हवे. नाहीतर मुस्लिमांबद्दल इतरधर्मीय वेगळा विचार करतील, तसेच प्रत्यक्ष मुस्लीमही माझ्याविरोधात भूमिका घेतील, असा थोडासाही विचार हमीद यांनी केलेला नाही. त्यामुळेच हमीद या पुस्तकामध्ये लिहितात की, “आपण म्हणजे मुघलांनी, मुसलमानांनी ८०० वर्षे हिंदूंवर राज्य केले. आपण राज्यकर्ता होतो, हिंदू गुलाम होते, अशी मानसिकता आजही बहुसंख्य मुसलमानांमध्ये दिसून येते. मात्र, मला बिलकूल मी मुसलमान असल्याचा अभिमान नाही. कारण, माझे पूर्वज हिंदूच होते. त्यांना बळजबरीने आत्यंतिक त्रासाने मुस्लीम व्हावे लागले.
 
 
 
यात अभिमान बाळगण्यासारखे काय आहे? आजही आपण पाहतो की, भारतात यश, पैसा, सन्मान मिळालेले प्रथितयश मुस्लीम अभिनेते, साहित्यिक आणि विचारवंतही हा खोटा न्यूनगंड बाळगताना दिसतात. त्यातूनच मग नेमके हे लोक बहुसंख्य हिंदू विचारांवर आगपाखड करताना दिसतात. ‘भारतात राहायची भीती वाटते’ बोलणारे, मग अफगाणिस्तान, तालिबान, दहशतवादावर मूग गिळून गप्प बसतात. तालिबान आणि रा. स्व. संघाची तुलना करतात. हेतू हा की, रा. स्व. संघासोबत तुलना केली की, तालिबानबद्दलची लोकांची घृणा कमी होईल.” तर या परिक्षेपात हमीद या पुस्तकामध्ये मुस्लीम असणे म्हणजे श्रेष्ठ असणे, या विशिष्ट लोकांच्या गृहितकाचा चेंदामेदा करतात.
 
 
 
असो. ‘समान नागरी कायद्या’संदर्भात पुस्तकात लेखक घटना लिहितात. ‘समान नागरी कायद्या’बद्दल हमीद चर्चा करत असतात. युसूफ नावाचे एक जण म्हणतात, “पण, मुसलमानांच्या कायद्यात काही बदल झालेला नाही. मुस्लीम कायदे बदलण्याचा अधिकार फक्त ‘मुस्लीम स्टेट्स’लाच असतो.” यावर हमीद विचारतात, “कशावरून? ब्रिटिशांनी ‘मोहमेडन लॉ’ केला. ‘मोहमॅडन लॉ’ हीच मुस्लीम ‘शरिया’ कायद्यातील एक सुधारणा आहे.” यावर समोरचा म्हणतो, “ब्रिटिशांनी तो कायदा बळजबरीने केला.” यावर हमीद यांचे उत्तर असते, “म्हणजे बळजबरीने केलेला कायदा तुम्ही मानता आणि जो बळजबरी करत नाही, त्याला विरोध करता.” यावर युसूफ भडकून म्हणतात, “आपण मुसलमानांवर बळजबरी करावी असे म्हणणार काय?” यावर हमीद म्हणतात, “अर्थातच कायद्याची सक्ती केल्याखेरीज कोणत्याही समाजात सामाजिक सुधारणा करता आली आहे काय? हिंदूंवरदेखील ती करावी लागली, मग मुसलमानांवर करावी लागली तर आश्चर्य काय?”
 
 
हमीद यांच्या लेखातील ही आठवण वाचून त्या मुस्लीम महिलांचीही आठवण झाली. ‘तीन तलाक’विरोधात कायदा पास झाल्यानंतर मुस्लीम महिला काय विचार करतात, याचा कानोसा घ्यायचा प्रयत्न केल्यावर या परिसरातील बहुसंख्य मुस्लीम महिलांचे मत वैयक्तिकरीत्या चांगले होते. मात्र, ज्यावेळी त्या एकत्रित येऊन मत मांडू लागल्या, तेव्हा त्यांचे मत होते. “ये ‘शरिया’ के खिलाफ हैं। ‘शरिया’च्या विरोधात म्हणजे अल्लाच्या विरोधात.
 
 
 
आम्ही अल्लाच्या विरोधात जावे म्हणून आमच्यासाठी काफीरने म्हणजे मोदीने हा कायदा तयार केला आहे.” मात्र, हा तिहेरी तलाकच्या विरोधातील कायदा झाला आणि त्याच्या अंमलबजावणीचा फायदा मुस्लीम भगिनींना झाला. पंतप्रधान मोदींच्या या कायद्याबाबतची भूमिका हमीद दलवाई यांच्या कायद्याची सक्ती केल्याखेरीज कोणत्याही समाजात सामाजिक सुधारणा करता आली आहे काय? या विधानांशी सुसंगतच वाटते. अर्थात, पंतप्रधान मोदींनी केलेला कायदा राज्यघटनेच्या ‘जगा आणि जगू द्या’ तत्त्वाचे मूर्त रूप आहे.
 
 
 
ज्यावेळी हमीद यांनी ही दोन्ही पुस्तके लिहिली, त्यावेळी बहुसंख्य मुस्लिमांचा हिरो हा पाकिस्तान होता. मात्र, सध्या त्यांच्या मनातील पाकिस्तानची जागा सौदी किंवा अफगाणने घेतली आहे. अफगाणिस्तानामध्ये तालिबान्यांनी क्रूरतेचा डाव मांडत सत्ता हस्तगत केली. भारतीय गल्लीबोळातले परिमाण म्हणून मुंबईच्या मुस्लीम गल्ल्यांमध्ये तालिबान म्हणजे ‘शरिया’ आणि मुस्लीम राजसत्ता आणणारा कुणीतरी थोर आहे, असे वातावरण तयार झाले (सत्य नाकारण्यात अर्थ नाही, कटू आहे. पण, सत्य आहे.), तर दुसरीकडे अत्यंत श्रीमंत आणि उच्चविद्याभूषित मुस्लीम सामाजिक कार्यकर्ता असलेल्या एका युवतीचे म्हणणे आठवले.
 
 
 
ती मुंबईतही तालिबान्यांविरोधात बोलू शकत नाही, कारण म्हणे तालिबानी हे मुस्लीमच आहेत. त्यांच्याविरोधात बोलणे म्हणजे ‘मुस्लीम ब्रदरहूड’च्या विरोधात आहे. तसेच अमेरिकेने अफगाणिस्तानवरून सैन्य का हटवले? मुस्लीम महिलांवर अत्याचार व्हावेत, असा अमेरिकेचा छुपा अजेंडा होता, असेही या उच्चविद्याभूषित युवतीचे मत. तिला किंवा गल्लीतील अल्पशिक्षित मुसलमानांना असे का वाटावे तर? याचा संदर्भ आपण ‘इस्लामचे भारतीय चित्रण’ या पुस्तकातील जिना यांच्या आठवणीत आपण पाहू शकतो.
 
 
 
जिनांची सभा भेंडीबाजारात असते. सभा सुरू होते. पहिल्या रांगेत जिनांना एकही पत्रकार दिसत नाही. दिसतात ते भेंडीबाजारातले कट्टर मुसलमान. जिना आयोजकांना चिडून विचारतात, “पत्रकार दिसत नाहीत. मी काय या बेवकूफ मुसलमानांसमोर भाषण करू? त्यांना काय कळते?” त्यांच्या या वक्तव्यावर व्यासपीठावर बसलेले बडेबडे मुस्लीम नेते, विचारवंत काहीच म्हणत नाहीत. पुढच्या रांगेत बसलेल्या मुसलमानांना जिनांचे वाक्य ऐकू गेलेले असते. पण, तरीही ते ‘जिना जिंदाबाद’च्या घोषणा देतात.
 
 
 
हमीद यावर लिहितात की, “स्वतंत्र भारतात हिंदू बहुसंख्य होतील आणि ते आपल्यावर राज्य करतील, या न्यूनगंडांने मुस्लीम इतके पछाडलेले होते की, त्यांना मूर्ख-बेवकूफ समजणार्‍या आणि काडीचीही किंमत न देणार्‍या जिनांना ते आपले मसिहा समजत असत.” तर तीच आंतरिक भीती आजही भारतीय मुस्लिमांमध्ये आहे, असे म्हणायला वाव असावा. पुस्तकाचे नाव जरी ‘इस्लामचे भारतीय चित्रण’ असले, तरी पाकिस्तानच्या राजसत्तेची जी बारादारी झाली, त्याचे बीज कसे रुजले याची चुणूकही या पुस्तकांमध्ये आपल्याला दिसते. जिनांचे विचार कसे होते, हे सांगणारी एक घटना ‘इस्लामचे भारतीय चित्र’ या पुस्तकात दिली आहे.
 
 
 
बोहरा जमातीविषयक मालमत्तेचा कायदा आमच्या संमतीने तयार करावा, असे सांगायला बोहरा समाजाचे काही प्रतिष्ठित मान्यवर नेते जिनांना भेटायला जातात. मात्र, जिना त्यांना वेळ देत नाहीत. त्यावेळी एक जण म्हणतो, या नेत्यांच्या मागे बहुसंख्य बोहरा लोक आहेत. यावर जिना म्हणतात, “व्हॉट मेजॉरिटी, कसेल बहुमत? रोग्याला डॉक्टरने औषध विचारायचे नसते, तर त्याला योग्य वाटेल ती उपाययोजना करायची असते. तसेच लोकांना काय हवे ते नेत्यांना ठरवायचे असते. लोकांना काय कळते?” जिना यांचे विचार सध्याच्या अस्थिर आणि रसातळाला गेलेल्या पाकिस्तानचा आत्माच झाला, हे वेगळे सांगायला हवे का?
 
 
 
सहज एक वेगळेपण म्हणून सांगावेसे वाटते की, या मुस्लिमांच्या मते मुस्लीम सुधारणेचे व्रत घेतलेला तरुण कोण असू शकतो, यावरही या पुस्तकांमध्ये प्रकाश टाकला आहे. मुस्लिमांमधील त्रुटीबद्दल निर्भीडपणे मत व्यक्त करतो, म्हणजे हमीद हे पुण्यातील सावरकरी विचारांचे ब्राह्मण असावेत, नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाणारे हिंदू युवक असावेत, असे त्यांच्याबद्दल माहिती नसणार्‍या मुस्लिमांना वाटले होते. सावरकर किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघच हिंदुत्वाचे खरे प्रतिनिधी आहेत, असे मुस्लिमांना वाटून जाते? हे आजही किती प्रातिनिधीक आहे ना? भारतीय मुस्लिमांची मानसिकता समजून घ्यायची असेल, तर इतकी तर्कसुसंगत आणि रंगतदार शैलीतील पुस्तकं दुसरी नसावीत, असेच ही पुस्तकं वाचून वाटते.
 
@@AUTHORINFO_V1@@