सोनपावलांनी घरी रविवारी विराजमान झालेल्या ज्येष्ठगौरींचे आज पूजन आणि उद्या विसर्जन. त्यानिमित्ताने महालक्ष्मीची परंपरा आणि त्यासाठी गृहिणींची साग्रसंगीत तयारीची लगबग याचे हे शब्दचित्रण...
भाद्रपद चतुर्थीला गणरायाचं आगमन झालं की, सर्व घरदार आनंदात न्हाऊन निघतं आणि त्या आनंदाला उत्साहाची झालर लावून दोनच दिवसांनी अनुराधा नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर सोनपावलांनी घरी येते ती श्री महालक्ष्मी...
स्त्रियांची अतिशय प्रिय देवता म्हणजेच ही महालक्ष्मी गौराई. ‘आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा’ अशा भावनेतून माहेरी आलेल्या लेकीचं कोडकौतुक करावं, तसा सगळा हा थाटमाट असतो. लाडक्या गौराईचं स्वागत करताना काहीही उणं राहू नये, यासाठी घराघरातली गृहिणी अतिशय दक्षतेने तिच्या पूजनाची तयारी करीत असते.
कानाकोपरा स्वच्छ करून, मनासारखी घराची सजावट करून स्वागताची ही जोरदार तयारी सुरू होते. बाजारातून दरवर्षी गौरीसाठी नव्या साड्यांची खरेदी असते. त्या त्या वर्षीची जी फॅशन असेल, ती साडी खरेदी करण्याकडे बायकांचा कल असतो. अर्थात शक्यतो पैठणी, रेशमी किंवा जरीकाठी साडीच गौरीसाठी निवडली जाते.
दागिने घेतानाचा उत्साह तर विचारायलाच नको. बाजारात इतके तर्हेतर्हेचे पारंपरिक दागिने गौरीसाठी उपलब्ध आहेत की, ते खरेदी करताना मन हरखून जातं. स्वतःही कधी घातले नसतील, असे एकाहून एक सुबक दागिने घालून गौरीला सजवण्याची हौस अशी की, त्या हौसेला मोल नाही.
गौरीची आरासही खूप देखणी व्हावी म्हणून हातातली सगळी कलाकुसर पणाला लावली जाते. जणू काही प्रत्येक गृहिणीच्या सुप्त गुणांना पालवीच फुटते. काही घरात एखादी संकल्पना घेऊन देखावे उभे केले जातात. याशिवाय रांगोळ्या, पडदे, महिरपी, तोरणं या प्रकारात कलात्मकतेचा अगदी कस लागतो. त्यांच्यासोबत विविध शोभेच्या वस्तूंची जमवाजमव करून महालक्ष्मीच्या स्थापनेची जागा सुशोभित करताना मन आनंदाने काठोकाठ भरून गेलेलं असतं.
सजावट व सुशोभिकरण झाल्यानंतर खरी कसोटी असते, ती महालक्ष्मीपुढे ठेवले जाणारे फराळाचे पदार्थ आणि पूजनाच्या दिवशी करावा लागणारा महानैवेद्य. लाडू, करंजी, चकली, शंकरपाळी या नेहमीच्या पदार्थांबरोबर पाकातले चिरोटे आणि काजूकतली किंवा खव्याची बर्फी असेही जिन्नस नजाकतीने तयार करताना बायका अजिबात थकत नाहीत. पुरणा-वरणाचा स्वयंपाक तर साग्रसंगीत असतोच, पण १६ भाज्या, १६ चटण्या आणि १६ पदार्थांची मेजवानी हा नैवेद्याचा सोहळा या सणाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य. पानातील पदार्थांची संख्या मोजतात त्याला ’महावैशिष्ट्य’ असंच म्हणायला हवं.
अर्थात, आता हल्ली अलीकडे या १६ पदार्थांचं नियोजन जरा वेगळ्या पद्धतीने होतं. म्हणजे मिश्रभाजी, मिश्रचटणी असे एकात एक मिळून एकूण १६ पदार्थ झाले, तरी करणार्याला आणि खाणार्यालाही पराक्रमच वाटतो. यापैकी किती पदार्थ केले किंवा नाही केले तरी पडवळ, काकडी, लाल भोपळा, मक्याचं कणीस आणि मेथीची भाजी यांचा समावेश गौरीच्या जेवणात करावाच लागतो. येते त्या दिवशी भाजी-भाकरी आणि जाते त्या दिवशी गव्हल्याची खीर आणि कानोला हे पदार्थ अनिवार्य आहेत.
प्रत्येक घरी या सणाची परंपरा वेगवेगळी असते. विशेषतः गौरीचे मुखवटे आणि तिचं एकंदर मूर्तिरूप प्रत्येकाच्या घरी वेगळं असतं. पितळेचे, शाडूचे, मातीच्या घटाचे किंवा पाण्याकाठच्या खड्याचे आणि आता तर फायबरचे अशी देवीची वेगवेगळे रूपं असणे साहजिकच आहे. कारण, आपली संस्कृतीच बहुपेडी आहे. भाषा, प्रांत, प्रदेश यांच्या वैविध्यानुसार काही विशिष्ट पदार्थ, गौरीला साडी नेसवण्याची पद्धत, साजशृंगाराची पद्धत, त्या त्या भागातील रूढ परंपरेनुसार असतात. पण, ते काहीही असलं, तरी एक गोष्ट सर्वत्र समान असते ती म्हणजे या देवतेप्रति असलेली श्रद्धा.
मोठ्या श्रद्धेने आणि यथाशक्ती थाटामाटाने साजरा होणारा हा सण म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या मनात असलेल्या सुखसमृद्धीच्या कल्पनेचं मूर्त रूप. महालक्ष्मीची सर्व अर्चना रितीनुसार नेटकेपणे झाली, तिला पानाफुलांनी हारातोरणांनी सजवली की, ती आपल्यावर प्रसन्न होईल आणि सर्व दुःखं-दैन्य मिटतील, असा गाढ विश्वास मनात बाळगूनच वर्षानुवर्ष हा सण साजरा होतो.
आपलं घर धनधान्याने भरलेलं असावं, अडीअडचणीला उपयोगी पडेल इतपत तरी सोनंनाणं असावं, गाठीला थोडा पैसाअडका असावा, असं प्रत्येक गृहिणीला वाटत असतं. आपला प्रपंच नेटका व्हावा, दारी आलेल्या पाहुण्याला दोन घास देता यावे आणि कुणाच्या घरी मोकळ्या हाताने जाऊ नये, असं आणि खरंतर एवढंच सामान्य माणसाचं स्वप्नं असतं आणि जवळपास अशाच मध्यमवर्गीय सामान्य माणसाच्या समृद्धीच्या आणि सुखसमाधानाच्या कल्पना असतात. म्हणूनच धान्यलक्ष्मी, ते वैभवलक्ष्मी अशा व्यापक रूपात महालक्ष्मी पूजली जाते.
वैभवाच्या कल्पना परिस्थितीनुसार वेगवेगळ्या असल्या, तरी देवी महालक्ष्मी आपल्यावर सदैव प्रसन्न असावी, असं मात्र गरीब-श्रीमंत कुणीही असो, प्रत्येकालाच वाटत असतं. म्हणून गणरायाच्या बरोबर येणारी आणि गणरायाबरोबरच जाणारी महालक्ष्मी मनावर प्रसन्न अत्तरी शिंपण करून साधंसं आयुष्य सुगंधित करते आणि आगमन-पूजन-विसर्जन या तिच्या तीन दिवसीय मंगलमयी वास्तव्यात वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा मनाला देऊन जाते.
यानिमित्त घरी होणारी पाहुण्यांची वर्दळ, नातेवाईक, मित्र परिवार यांनी दर्शनाला घरी येणं, यामुळे आनंदित झालेली घरची गृहिणी पक्वान्नाचा प्रसाद आल्यागेल्याच्या हाती ठेवते, तेव्हा त्या गृहिणीचं रूपसुद्धा महालक्ष्मीचंच प्रतिरूप भासू लागतं..
- अमृता खाकुर्डीकर