दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला निरोप
ठाणे : कोरोनामुळे यंदाही गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला असून दीड दिवसाच्या आपल्या लाडक्या बाप्पाला सर्वत्र निरोप देण्यात आला. आपल्या आवडत्या बाप्पाला निरोप देतांना “गणपती बाप्पा मोरया, पुढच्यावर्षी लवकर या" अशी प्रार्थना केली जाते.
हीच प्रार्थना गणपती बाप्पाने ऐकली असून पुढच्यावर्षी आपला आवडता गणपती बाप्पा १० दिवस अगोदर म्हणजेच बुधवार, ३१ ॲागस्ट २०२२ रोजी येणार असल्याचे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. यावर्षी मागच्यावर्षीं प्रमाणेच आपली कोरोनाशी लढाई सुरू असतानाच आपल्या आवडत्या गणपतीबाप्पाचे आगमन झाले.
पुढच्यावर्षी बाप्पाच्या आगमनापूर्वीच हे कोरोनाचे संकट दूर होऊदे.अशी प्रार्थनाही सर्वत्र करण्यात आली असून शनिवारी दिड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले आहे. ठाण्यात भक्तांनी शांततेत विसर्जन केले असून पुढच्या वर्षी बाप्पा दहा दिवस लवकर येत आहे.