नवगोपाळ मित्र : हिंदू राष्ट्रवादाचे उद्गाते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2021   
Total Views |

Bangal _1  H x




नवगोपाळ मित्र हिंदू धर्म हा भारताच्या एकतेचा पाया मानत होते. पण, त्यांना हिंदू धर्मातील केवळ आध्यात्मिक किंवा धर्मग्रंथावर आधारित एकता अपेक्षित नव्हती, त्यांना बलशाली एकता अपेक्षित होती. म्हणून वर सांगितल्याप्रमाणे त्यांनी तरुणांच्या शारीरिक शिक्षणावर भर देऊन राष्ट्रीय व्यायामशाळा आणि शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देणारी शाळा सुरू केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही सामर्थ्यशाली आणि शस्त्रसज्ज राष्ट्राचेच स्वप्न पाहिले होते.
 
 
 
नवगोपाळ मित्र हे देवेंद्रनाथ टागोरांनी (रवींद्रनाथ टागोरांचे वडील)१८६५ साली सुरू केलेल्या ‘नॅशनल पेपर’चे संपादक होते. ‘हिंदू मेळा’ व ‘नॅशनल सोसायटी’च्या संस्थापकांपैकी ते एक होते. नवगोपाळ मित्र हे त्यांच्या कट्टर राष्ट्रवादी विचारांमुळे समकालिनांमध्ये ‘नॅशनल नवगोपाळ’ किंवा ‘नॅशनल मित्र’ या नावाने ओळखले जात होते. ते ‘आदी ब्राह्म समाजा’चे एक प्रमुख सदस्य होते, येथेच त्यांचा देवेंद्रनाथ टागोर आणि राजनारायण बोस यांच्याशी संबंध आला.
 
 
 
नवगोपाळ मित्र यांचा तरुणांच्या शारीरिक शिक्षणावर विशेष भर असे. त्यासाठी त्यांनी राष्ट्रीय व्यायामशाळाही स्थापन केली होती. लाठी, छुरीका, तलवार, रायफल, कुस्ती आदींचे प्रशिक्षण देणारी शाळा त्यांनी सुरू केली होती. त्यांनी त्यांचा सर्व वेळ, ऊर्जा आणि आर्थिक स्रोत शारीरिक शिक्षणाच्या प्रसारावर आणि राष्ट्रीय कला नि उद्योगधंद्याच्या पुनरुज्जीवनासाठी खर्च केला. पहिली बंगाली सर्कसही त्यांनीच सुरू केली होती. या सर्व व्यापामुळे त्यांची आर्थिक स्थिती अतिशय खालावली आणि अखेरचे दिवस त्यांना अत्यंत हलाखीत काढावे गेले.
 
 
 
महर्षी देवेंद्रनाथ टागोरांच्या कुटुंबातील तरुण मंडळी विशेषत: ज्योतींद्रनाथ टागोरांना नवगोपाळ मित्रांच्या चळवळींमध्ये रस होता आणि त्यासाठी त्यांना त्यांच्याकडून आर्थिक साहाय्यही मिळत होते. (Pal, Bipin Chandra, Memories of My Life Times, Modern Book Agency, १९३२, पृष्ठ २६४ ते २६६ ) राजनारायण बोस यांनी "The Prospectus of a Society for the promotion of National feeling among the Educated Natives of Bengal' या पत्रकात मांडलेल्या विचारांच्या आधारे नवगोपाळ मित्र यांनी द्विजेंद्रनाथ टागोर (रवींद्रनाथ टागोरांचे थोरले बंधू) आणि राजनारायण बोस यांच्यासह १८६७ला ‘हिंदू मेळा’ या संस्थेची स्थापना केली. बंगाली वर्षाच्या अखेरीस हा मेळा भरवला जाई. १८६७ ते १८८0 या दरम्यान १४ वेळा ‘हिंदू मेळा’ भरवण्यात आला होता. १८७0ला चौथ्या मेळ्यानंतर ‘नॅशनल सोसायटी’ची स्थापना करण्यात आली. हिंदूंमध्ये राष्ट्रीय भावना आणि संघटन निर्माण करणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट होते. संस्थेतर्फे मासिक व्याख्याने आयोजित केली जात.
 
 
 
नवगोपाळ मित्र त्यांच्या लेखनाद्वारे हिंदूराष्ट्रवादाचे शास्त्रशुद्ध विवेचन करत होते. नवगोपाळांच्या मते ‘एकता’ ही राष्ट्रीयत्वाची प्राथमिक अट आहे. ही एकता वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या अर्थाने आणि वेगवेगळ्या तत्त्वांवर आधारित असते. ग्रीकांमध्ये राष्ट्रप्रेम, ज्यूंमध्ये मोझेसची संहिता, रोमन आणि इंग्रजांमध्ये स्वातंत्र्यप्रेम ही तत्त्वे राष्ट्रीयत्वाच्या वाढीस कारणीभूत ठरली. हिंदू धर्म हा भारतातील राष्ट्रीय एकतेचा पाया आहे. हिंदू राष्ट्रीयत्व बंगालपुरते मर्यादित नाही. अखिल हिंदुस्थानातील सर्व हिंदू नाम आणि हिंदू श्रद्धा ते (हिंदू राष्ट्रीयत्व) आपल्या कवेत घेते; भौगोलिक स्थान वा भाषा त्याला अडथळा आणू शकत नाहीत. हिंदूंचे धार्मिक राष्ट्र व्हावे हे विधिलिखित आहे.
 
 
 
नवगोपाळ मित्र २ ऑक्टोबर, १८७२ला ‘नॅशनल पेपर’च्या लेखात म्हणतात, “व्यक्तींना समुदायामध्ये आणि समुदायांना राष्ट्रामध्ये विणण्याचे हिंदू धर्माचे सामर्थ्य उल्लेखनीय आहे” आणि त्यासाठी त्यांनी हिंदू धर्माच्या प्रेरणेने संघटित होणार्‍या मराठे आणि शीख यांचे उदाहरण दिले आहे. (Majumdar, B B., History of Political Thought From Rammohun to Dayananda (१८२१-८४)- Volume १- Bengal, University of Culcutta, १९३४, पृष्ठ २९३-२९४) परदेशात विशेषत: युरोपात तेथील संस्कृती, लोकजीवन, धर्म, परिस्थितीला अनुसरून त्या-त्या देशाने विविध विचारप्रणाली स्वीकारल्या किंवा काही देशांनी पूर्वापार चालत आलेल्या विचारप्रणाली किंवा तत्त्व यानुसार राष्ट्रीय एकात्मता साधली होती. नवगोपाळ मित्र हिंदू धर्म हा भारताच्या एकतेचा पाया मानत होते. पण, त्यांना हिंदू धर्मातील केवळ आध्यात्मिक किंवा धर्मग्रंथावर आधारित एकता अपेक्षित नव्हती, त्यांना बलशाली एकता अपेक्षित होती. म्हणून वर सांगितल्याप्रमाणे त्यांनी तरुणांच्या शारीरिक शिक्षणावर भर देऊन राष्ट्रीय व्यायामशाळा आणि शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देणारी शाळा सुरू केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही सामर्थ्यशाली आणि शस्त्रसज्ज राष्ट्राचेच स्वप्न पाहिले होते.
 
 
 
१५ नोव्हेंबर, १८६६च्या सर्वसाधारण सभेत ‘ब्राह्म समाज’ अधिकृतपणे दुभंगला आणि ‘ब्राह्म समाज ऑफ इंडिया’ची (भारतीय ब्राह्म समाज) स्थापना करण्यात आली आणि मूळ ब्राह्म समाज ‘आदी ब्राह्म समाज’ म्हणून ओळखला जाऊ लागला. केशवचंद्रांच्या वतीने वैष्णव ब्रह्म बिजोयकृष्ण गोस्वामी यांनी सभेत ठराव मांडला की, ब्राह्म समाजाच्या मूलभूत तत्त्वप्रणालीवर श्रद्धा असणारे प्रत्येक देशातील आणि जातीतील पुरुष आणि स्त्री हे ‘ब्राह्म समाज ऑफ इंडिया’चे सदस्य होण्यास पात्र आहेत. तसेच ‘जगातील सर्व धर्मग्रंथांतील आस्तिक वचनांचे संकलन करणे आवश्यक आहे.
 
 
 
हिंदू धर्म हा भारताच्या एकतेचा पाया मानणार्‍या नवगोपाळ मित्रांना केशवचंद्र सेन आणि बिजोयकृष्ण गोस्वामी यांचा वरील ठराव भारताच्या एकतेला आव्हान देणारा वाटला, त्यामुळे याला नवगोपाळ मित्रांनी सभेतच प्रत्युत्तर दिले, “जर घरी मुबलक सत्य असेल तर आपण परदेशी का पाहावे?
 
 
 
आपल्याला आवश्यक असणारे सत्य हिंदू धर्मग्रंथात आहे आणि म्हणून आपल्याला दुसर्‍या धर्मग्रंथातून उसनवारी करायची आवश्यकता नाही.” (Kopf, David, The Brahmo Samaj The Shaping of The Modern Indian Mind, Gupta Brothers, १९५९, पृष्ठ १३५-१३६) हे प्रत्युत्तर ‘आपल्याला आवश्यक सत्य हिंदू धर्मग्रंथात आहे’ इतक्याच विषयाला अनुसरून केले आहे हे लक्षात घ्यावे. कारण, त्या काळातसुद्धा जे जे हिंदू ते ते बुरसटलेले असे समजण्याची ‘फॅशन’ आली होती. त्यामुळे अशा भ्रामक ‘फॅशन’ला आव्हान देऊन हिंदू धर्मग्रंथाचे महत्त्व जाहीरपणे सभेत सांगणे अत्यंत आवश्यक होते.
 
 
 
केवळ हिंदू धर्मग्रंथातच सर्व सत्य आहे आणि इतर धर्मग्रंथात असत्य आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. आपल्याला आवश्यक असणारे सत्य हिंदू धर्मग्रंथात आहे, इतकेच त्यांना म्हणायचे होते. म्हणजे धार्मिकदृष्ट्या हिंदूंना पूरक, पोषक आणि आवश्यक सत्य आपल्या धर्मग्रंथात आहे, त्यासाठी दुसर्‍या धर्मग्रंथातून उसनवारी करायची आवश्यकता नाही इतकाच त्याचा अर्थ घ्यावा. तसेच इतर धर्मीयांना त्यांनी हिंदू धर्मग्रंथातच सर्व आवश्यक सत्य आहे असे सांगितलेले नाही. महत्त्वाचे म्हणजे ते हे वाक्य केवळ आपल्याच धर्मबांधवांना उद्देशून सांगत होते.
 
 
 
नवगोपाळ मित्रांच्या मते, ‘प्रातिनिधिक शासन’ (Representative government) हे आदर्श शासन होय. जेथे राजकीय अडचणी नसतील तेथे ‘प्रातिनिधिक शासन’ स्वीकारण्यात यावे. पण, शिक्षणाचा अभाव, लोकांमध्ये सुधारणेप्रति निरुत्साह आणि विविध वर्गात असणारा एकतेचा अभाव यामुळे व्यावहारिकदृष्ट्या विचार करता भारतात ‘प्रातिनिधिक शासन’ निर्माण करणे सध्या तरी अवघड आहे, त्यामुळे सध्याच्या काळात भारतात प्रातिनिधिक शासनाऐवजी भारतीयांचीच निरंकुश एकछत्री सत्ता निर्माण व्हायला हवी, असे विचार नवगोपाळ मित्रांनी २१ मे, १८७३ च्या ‘नॅशनल पेपर’मध्ये मांडले होते. (Majumdar,, इ इ., पृष्ठ २९५) सध्या तत्कालिक उपाय म्हणून त्यांनी निरंकुश एकछत्री सत्तेचा पुरस्कार केलेला असला तरी ‘प्रातिनिधिक शासन’ हेच त्यांचे ध्येय होते आणि त्यालाच ते आदर्श शासन मानत होते.
 
 
 
त्याच लेखात ते पुढे म्हणतात की, “माणसाला केवळ आयुष्याची आणि शारीरिक सुरक्षितता देऊन माणूस संकटाविना किंवा अडथळ्याविना परिश्रम करून श्रीमंत होईल इतकेच पुरेसे नसते. उदात्त जीवन हे शासनाचे ध्येय असायला हवे.” अतिशय लहान आणि अकुशल असले तरी प्रत्यक्ष आणि मूर्त स्वरूपातील स्वशासन निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू करायला हवेत. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले होते म्हणून शासनाने जनतेला शिक्षण देऊन त्याद्वारे जनतेचे दारिद्य्र नष्ट करावे आणि याला शासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट सांगितले होते.
 
 
 
जनतेलाही शासनावर अतिअवलंबून न राहता आत्मनिर्भर व्हावे, असे सांगितले होते. (उपरोक्त, पृष्ठ २९६ व २९८) स्वातंत्र्य तर हवेच म्हणजे त्यासोबत येणारा स्वराज्याचा अधिकार येईलच; पण अधिकार आले की, त्यासोबत कर्तव्यही येतात, स्वशासन आल्यावर त्या शासनाने अधिकारांची अंमलबजावणी करताना कर्तव्यही पार पाडायला हवीत. जनतेचे दारिद्य्र नष्ट करावे म्हणजे ते स्वशासन रयतेचे शासन ठरेल. पण, त्यासोबत ते हेही सांगतात की, जनतेनेही शासनावर अति किंवा पूर्णपणे अवलंबून न राहता स्वावलंबी आणि आत्मनिर्भर होऊन सतत कृतिशील राहावे. म्हणजे शासन आणि जनता यांनी एकमेकांना साहाय्य करून परस्परांवर अवलंबून राहण्याऐवजी परस्परपूरक असावे. राजनारायण बोस यांनी मांडलेल्या राष्ट्रवादी विचारांना नवगोपाळ मित्रांनी कृतीत तर उतरवलेच आणि स्वत:चेही राष्ट्रवादी विचार स्पष्ट आणि निर्भीडपणे मांडले. म्हणून हिंदूपुनरुज्जीवनवादाच्या प्रमुख कृतिशील विचारवंतांमध्ये त्यांची गणना होते.





@@AUTHORINFO_V1@@