न्यायस्य अभयौकः

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Sep-2021   
Total Views |
man_1  H x W: 0 
 
 
 
अत्यंत वक्तशीर, शिस्तप्रिय, निःस्पृह, कर्तृत्ववान, निर्भीड व ‘अभयपणे’ न्यायदान करणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक या ठाणेकर प्रभूतीविषयी...
 
 
‘न्यायस्य अभयौकः’ अर्थात ‘न्यायाचे निर्भय आश्रयस्थान’. संस्कृतभाषेत ‘अभय’ म्हणजे ‘सुरक्षित’ आणि ‘ओकः’ म्हणजे आश्रय. न्यायमूर्ती अभय ओक यांच्या सर्वोच्च न्यायालयातील नियुक्तीमुळे समस्त भारतीय जनतेला न्यायदेवतेने जणुकाही एक निर्भय, सुरक्षित असे आश्रयस्थानच दिले आहे. अशी भावना सर्वसामान्यांच्या मनात आहे. शिवाय, ओक हे ठाणेकर असल्याने त्यांच्या नियुक्तीमुळे तमाम ठाणेकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. ते ठाण्यातील शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करणार्‍या मो.ह.विद्यालयाच्या १९७५च्या बॅचचे माजी विद्यार्थी होय. त्यामुळे ओक सरांचे ठाण्याशी आपुलकीचे नाते आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या ठाण्यातील रहिवासी सर्वोच्च पदावर विराजमान होतो, ही बाबही आपल्यासाठी अभिमानाचीच. ओक सरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात जिल्हा न्यायालयातून केली होती. ते जिल्हा न्यायालयातील वकील संघटनेचे सदस्यही होते. काही वर्षे वकिली केल्यानंतर त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. मुंबई उच्च न्यायालयातही जवळपास २० वर्षांहून अधिक काळ न्यायमूर्ती म्हणून काम करताना अनेक महत्त्वाचे निकाल त्यांनी आपल्या कारकिर्दीत दिले.
 
  
अगदी अलीकडे अभय ओक यांची कर्नाटकच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तिपदी नियुक्ती झाली होती. आता त्यांची सर्वोच्च न्यायालयातील एक न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली आहे. साधारणत: दोन आठवड्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या न्यायवृंदानं नऊ न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शिफारस केली होती. यामध्ये अभय ओक यांचाही समावेश होता. आता या शिफारसीला पंतप्रधान कार्यालयानेही मान्यता दिल्याने मराठी माणसाच्या न्यायदानाचा ठसा देशाच्या सर्वोच्च न्यायालयात उमटणार आहे.न्या. अभय ओक यांचा जन्म २५ मे, १९६०मध्ये झाला. विज्ञान शाखेतून पदवी मिळवल्यानंतर खरंतर अभय ओक अभियंता होणार होते. मात्र, त्यांनी विधी क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घरामध्येही विधी क्षेत्राचीच परंपरा होती. त्यांनी मुंबई विद्यापीठातून ‘एलएलएम’ केल्यानंतर त्यांनी २८ जून, १९८३मध्ये ठाणे जिल्हा न्यायालयात वकिली सुरू केली. ओक हे ठाणे शहरातील जुने घराणे. प्रचंड सामाजिक भान असलेले हे कुटुंब. त्यांचे आजोबा वामनराव ओक व वडील अण्णा उर्फ श्रीनिवास ओक हे दोघेही ठाण्यातील प्रख्यात दिवाणी वकील होते.
 
 
अभय यांचे वडील श्रीनिवास ओक हेही ठाणे न्यायालयात वकील होते. अभय ओक यांनी अनेक जनहित याचिकांमध्ये वकील म्हणून काम केलं. मुंबईत २९ ऑगस्ट, २०१३मध्ये अतिरिक्त वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर १२ नोव्हेंबर, २००५ मध्ये त्यांची नियुक्ती ही पूर्ण वेळ न्यायमूर्ती म्हणून झाली. मुंबई उच्च न्यायालयात असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निकाल दिले, त्यापैकी रस्त्यांमधील खड्डे तसेच मुंबईतील प्रदूषण, अनधिकृत बांधकाम याविषयीचे निकाल उल्लेखनीय होते.न्या. ओक यांचे ठाण्यातील कार्यालय हे अर्थातच त्यांचे आजोबा व वडिलांनी सुरू केलेले आहे. वकिलाचे कार्यालय कसे असावे, याचा तो आदर्श नमुना आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीसाठी न्यायालयाजवळच राहण्याची व्यवस्था असते. तरीही ओक यांनीआपले ठाण्यातील निवासस्थान सोडले नाही. दररोज ठाण्यातूनच उच्च न्यायालयात ये-जा करणे त्यांनी पसंत केले.
 
 
 मुंबई व ठाण्यात दररोज वाहतुकीची प्रचंड वर्दळ असतानाही त्यांना उच्च न्यायालयात पोहोचण्यास आणि स्वतःच्या दालनात पोहोचून न्यायासनावर बसण्यास एकदाही उशीर मात्र झाला नाही.न्यायदालनातही स्वतःची अशी कार्यपद्धती राबवली. न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाल्यावर खंडपीठात एखाद्या वरिष्ठ न्यायमूर्तींसोबत बसण्याची प्रथा आहे. सुरुवातीला अशा फौजदारी प्रकरणांची सुनावणी करणार्‍या एका खंडपीठात ते बसले, तेव्हा त्यांनी विशिष्ट फौजदारी कायद्यांखालील प्रकरणांचा प्रचंड अभ्यास करून त्यावर पकड मिळवली. अत्यंत वक्तशीर, शिस्तप्रिय, निःस्पृह, कर्तृत्ववान, निर्भीड व निःपक्षपाती, सचोटीचे, प्रामाणिक, हुशार, अभ्यासू वृत्ती, कामाचा प्रचंड आवाका असे विविध विशेष गुण त्यांच्या अंगी आहेत. त्यांना मराठी भाषेचाही प्रचंड अभिमान आहे. न्यायालयात मराठीचा वापर व्हावा, यासंदर्भातील काही प्रकरणांमध्ये त्यांनी आवर्जून कोणताही मोबदला न घेता बाजू मांडण्याचे काम केले.
 
 
एवढ्या उंचीवर जाऊनही न्यायमूर्ती ओक यांचे पाय कायम जमिनीवर राहिले आहेत. सामाजिक भान आणि मनात करुणा, कणव असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. गेली अनेक वर्षे ते गतिमंदांसाठी काम करणार्‍या एका संस्थेला मदतही करत आहेत. अनेक सामाजिक प्रश्नांवर त्यांनी न्यायनिवाडे दिले. कदाचित, ते अनेकांना पटलेही नसतील. परंतु, तरी त्यावरून असलेले वैचारिक मतभेद त्यांनी आपल्या संबंधांच्या आड कधी येऊ दिले नाहीत.न्यायमूर्ती म्हणून काम करताना त्यांनी कधीही सुट्टी घेतली नाही. इतकेच नव्हे, तर त्यांच्या वडिलांचे निधन झाले, तेव्हाही केवळ एकच दिवस न्यायालयात गैरहजर राहिले. असे आदर्श न्यायमूर्ती अभय ओक यांना पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@