नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) : “देशात सध्या भयाचे वातावरण आहे”, “मोदी सरकारच्या काळात प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे”; असा दावा २०१४ सालापासून करणाऱ्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कंत्राट घेतल्याप्रमाणे वागणाऱ्या एका खासगी वृत्तवाहिनीने जिहादी विचारसरणीच्या सरजिल उस्मानीपुढे सपशेल नांगी टाकल्याची घटना नुकतीच घडली आहे.
नकारात्मक वार्तांकनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या आणि भाजपच्या कथित फॅसिस्टवादाविरोधात लढण्याचा दावा करणाऱ्या एका खासगी वृत्तवाहिनीला जिहादी विचारसरणीने नुकताच तडाखा दिला आहे. सदर वृत्तवाहिनीने काही दिवसांपूर्वी “देशात ४४ हजार ६४३ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणे ही रुग्णवाढ कालच्यापेक्षा ४ टक्क्यांनी अधिक आहे”. अशी बातमी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून प्रसारित केली होती. त्यासाठी बातमीमध्ये प्रातिनिधीक स्वरूपात आरोग्य कर्मचारी दाढीधारी मुस्लिम व्यक्तीचा स्वॅब घेत असल्याचे छायाचित्र वापरले होते.
मात्र, ही बातमी प्रसारित करताच काही वेळाने आपल्या जिहादी विचारसरणीसाठी प्रसिद्ध असलेल्या आणि “हिंदू समाज सडका असल्याचे” भाषण करणाऱ्या सरजिल उस्मानी नामक तरुणाने त्या ट्विटला रिट्विट करून सदर वृत्तवाहिनीस धमकी दिली. “या वृत्तासोबत हे छायाचित्र वापरण्याचा निर्णय या वाहिनीमध्ये कोणी घेतला ?. कर्मचाऱ्यांची इच्छा असल्यास त्या व्यक्तीचे नाव ते उघड करू शकतात, माझ्या ट्विटर खात्याचा मेसेज बॉक्स नेहमीच खुला आहे”, अशा शब्दात सरजिल उस्मानी याने त्या वृत्तवाहिनीस धमकावले. त्यानंतर विशिष्ट समुदायाच्या अनेक व्यक्तींनी ट्विटवर संबंधित वृत्तवाहिनीविरोधात आक्रमक भाषा वापरण्यास प्रारंभ केला. या प्रकारामुळे एरवी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी फॅसिस्टवादाविरोधात लढण्याचा दावा करणाऱ्या आणि हिंदू समाजाविरोधात भूमिका घेणाऱ्या संबंधित वृत्तवाहिनीची पुरती घाबरगुंडी उडाली. त्यामुळे सरजिल उस्मानी नामक जिहादी विचारसरणीच्या तरुणाच्या धमकीला घाबरून संबंधित ट्विट हटविण्याचा निर्णय त्या वाहिनीतर्फे घेण्यात आला.
लोकशाहीला खरा धोका जिहाद्यांकडूनच
देशातील राज्यघटना आणि लोकशाही यास हिंदुत्ववाद्यांकडून धोका असल्याचा दावा संबंधित वृत्तवाहिनी आणि समविचारी मंडळींकडून नेहेमीच करण्यात येत असतो. हिंदू समाजाला दोष देणारे आणि हिंदुत्ववादास फॅसिस्ट ठरविण्याचा प्रयत्न करण्यात ही खासगी वृत्तवाहिनी हरतऱ्हेने प्रयत्न करीत असते. त्याचवेळी इस्लामी दहशतवाद आणि जिहादी विचारसरणीचा विरोध करण्याचे धैर्य सदर वृत्तवाहिनीमध्ये नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.