अबू आझमींच्या उपस्थितीत ‘कोरोना’ नियमांचा धुव्वा

    09-Aug-2021
Total Views |

abu azmi_1  H x
 
मुंबई (ओम देशमुख) : राज्यात कोरोना संसर्गामुळे सरकारने भली मोठी नियमावली लावली आहे. सर्वसामान्य नागरिकांना राज्यात संचारावर आणि अन्य अनेक बाबींवर राज्य सरकारने निर्बंध लावले आहेत. मंदिरे अद्यापही पूर्णपणे बंद आहेत. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या वाढदिवसानिमित्त गोवंडीतील शिवाजीनगर भागात रविवारी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जंगी रॅली काढण्यात आली. यावेळी राज्य सरकारने लावलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांना अक्षरश: पायदळी तुडविण्याचे काम समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आले. विशेष म्हणजे, या रॅलीला आमदार अबू आझमी हे स्वत: उपस्थित होते.
 
 
नियम फक्त सामान्यांनाच का?
 
 
राज्य सरकारच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक जाचक अटी आणि नियमांचे साखळदंड अडकविण्यात आले आहेत. राज्यात सार्वजनिक कार्यक्रम, लग्नसमारंभांवर निर्बंध लादले गेले आहेत. पण, अबू आझमींसारख्या मंडळींना हे नियम लागू होत नाहीत का? की, हे नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांच्याच माथी मारण्यासाठी बनवण्यात आले आहेत? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
 
 
लोकलप्रवासावर निर्बंध, मग रॅलीला परवानगी का?
 
 
रविवारी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार लसीकरण झालेल्या लोकलप्रवासासाठी नागरिकांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे लोकलप्रवासावरील निर्बंध अद्यापही पूर्णपणे काढण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पण, दुसरीकडे आझमींसारख्या आमदाराला शेकडोंच्या उपस्थितीत रॅलीची परवानगी कशी देण्यात आली, हे मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
 
 
पोलिसांची बघ्याची भूमिका
 
 
एकीकडे समाजवादी पक्षाच्या या कार्यकर्त्यांचा रस्त्यावर नंगानाच सुरू असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेले पोलीस मात्र या सगळ्याकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष करत होते. उलटपक्षी काही पोलीस हे जणू त्या रॅलीला संरक्षण देत असल्याच्या अविर्भावात रॅलीसोबत चालत होते. शिवाजीनगर ते ‘डम्पिंग ग्राऊंड’ या रस्त्यावर हा तमाशा होत असताना पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे दुर्दैवाने दिसून आले.
 
 
जमावबंदीच्या नियमांचे उल्लंघन
 
 
राज्य सरकारने कोरोनास्थिती लक्षात घेता राज्यात अनेक ठिकाणी जमावबंदी लावली आहे. मात्र, आमदार आझमी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तमाशामध्ये शेकडो कायकर्ते सामील होते. त्यामुळे राज्य सरकारने लावलेल्या जमावबंदीच्या नियमालादेखील आमदार आझमी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने हरताळ फासण्यात आला आहे.
 
रॅलीमध्ये तलवारी नाचवल्या
 
 
अबू आझमींच्या वाढदिवसानिमित्त काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये चक्क नंग्या तलवारीही नाचविण्यात आल्या. कायद्याचे कुठल्याही प्रकारचे भय समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नसल्याचे यानिमित्ताने दिसून आले. विशेष म्हणजे, आमदार अबू आझमी यांनी या रॅलीमध्ये रथावर बसून नंग्या तलवारी नाचविल्या आहेत. आमदार अबू आझमींच्या या बेजबाबदार आणि बेकायदेशीर कृत्यामुळे ‘आर्म्स अ‍ॅक्ट‘चे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे आता पोलीस आझमींच्या या बेकायदेशीर वर्तणुकीवर काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
 
हे बेशरम सरकार : आ. भातखळकर
 
 
“वाढदिवसाच्या दिवशी अबू आझमीने गर्दी जमवली, तलवारी नाचवल्या. कुठे आहेत सरकारी निर्बंध? ठाकरे सरकारला समर्थन दिले की, हे मुजोर वाटेल तो तमाशा करायला मोकळे. हे बेशरम सरकार निर्बंध फक्त हिंदू सणवारांवर लावणार. श्रावण उद्यापासून सुरू होतोय. पण, मंदिरे बंद. हे तर हिंदूद्रोह्यांचे सरकार," अशी टीका मुंबई भाजपचे प्रभारी आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.