निद्रा : आयुर्वेदिक दृष्टिकोन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

sleep_1  H x W:
 
 
 
आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य या गोष्टींना आयुर्वेदशास्त्रात खूप महत्त्व दिलेले आहे. हे तीन आरोग्याचे आधारस्तंभ आहेत. आयुर्वेदात या तिन्हींना ‘उपस्तंभ’ म्हटले आहे. ज्यावर आपले आरोग्य, आयुष्य टिकलेले आहे, असे हे तीन महत्त्वाचे ‘त्रयोपस्तंभ’ आहेत. आहाराबद्दल आपण या सदरातून वाचत असतोच. आज निद्रेबद्दल आयुर्वेदशास्त्रात काय सांगितले आहे, ते जाणून घेऊयात...
 
 
 
‘उपस्तंभ’ म्हणजे ‘सपोर्ट.’ जसे इमारतींमध्ये ‘पीलर्स’ असतात, मोडकळीस आलेल्या वास्तूला टेकू देऊन त्याचा अवधी वाढविला जातो, काहीशा त्याच पद्धतीने आरोग्याला या त्रयींचा आधार दिल्यास आरोग्य व आयुष्य उत्तम लाभते व टिकते. त्यातील एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे निद्रा-झोप. प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यापासून मरेपर्यंत रोज विशिष्ट वेळी ठरावीक काळासाठी झोपते. जन्माला आलेले बाळ २०-२२ तासही झोपू शकते. जसजसे बाळ मोठे होऊ लागते. तसतसे हे तास कमी होतात. शाळेत जाऊ लागल्यावर (वयाच्या तीन ते पाच वयोगटातील मुले) साधारण १०-१२ तास झोपतात. यातील काही तास ही दुपारची झोप असते. नोकरी-धंदा करणार्‍या मध्यवयीन व्यक्तींमध्ये सहा-आठ तास झोप पुरेशी आहे. वार्धक्यात चार-सहा तास झोप पुरते. हे सर्वसाधारपणे घडते. याव्यतिरिक्त काही अपवाद असू शकतात. वर सांगितलेला झोपेचा अवधी हा सर्वसाधारणपणे बघायला मिळतो.
 
 
 
‘निद्रा’ म्हणजे काय?
 
 
 
आयुर्वेदशास्त्रात असे सांगितले आहे की, जेव्हा शरीर आणि मन श्रमाने, कष्टाने थकते, तेव्हा पंचज्ञानेंद्रिये व पंचकर्मेंद्रिये आपापले कार्य नीट करण्यास असमर्थ ठरतात आणि अशा वेळेस मनुष्याला झोप (निद्रा येते) जेवढे शारीरिक कष्ट व मानसिक श्रम अधिक तेवढी झोप लगेच लागते, शांत लागते. शरीराच्या जागृत अवस्थेचे कारण सत्व गुण आहेत व निद्रेचे कारण तमो गुण आहेत, असेही शास्त्रात सांगितले आहे. तसेच, मनुष्यदेहाचा स्वभाव असल्याने हे कष्ट न करताही प्रत्येक मनुष्याला झोप लागते.
 
 
हल्ली ‘लॉकडाऊन’च्या काळात बरेचसे नियम धाब्यावर बसविले गेले आहेत. त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे झोपेचे ‘पॅटर्न.’ काही घरांमधून शाळकरी मुले ही १२ आणि १ वाजेपर्यंत जागत राहतात, अशी स्थिती शहरात बघायला मिळते. मग आठ तास झोप हवी म्हणून सकाळी उशिरा उठणे होते. बरेचदा या चुकलेल्या वेळांमुळेच विविध आरोग्याच्या तक्रारी सुरु होतात. झोपणे ही क्रिया शरीरातील झीज भरुन काढायचा काळ. शरीरातील मृत पेशींचा निचरा करणे, समतोल साधणे, पेशींची उत्तम नवनिर्मिती करणे इ. जरी उत्तम आहारामुळे होत असले तरी ते घडून येते जेव्हा मनुष्य शांत, गाढ झोपतो. म्हणजेच जेव्हा बाह्यसृष्टीशी संपर्क थांबतो, तेव्हा शरीराचे झीज भरुन काढण्याचे काम सुरू होते. पण, यासाठी रात्री १० ते सकाळी ६ ही आठ तासांची (मध्यवयीन, कुमारावस्था इ.) झोप अनिवार्य आहे.
 
 
बरेचदा रुग्ण दवाखान्यात येऊन सांगतात, रात्री झोप उशिरा लागते म्हणून सकाळी जाग येत नाही. उठल्यावर फ्रेश वाटत नाही. झोपून राहावसे वाटते. याचाच अर्थ शरीराला त्यांचे कार्य नीट करण्यासाठी संधी मिळाली नाही. रात्रीचे जेवण हे पचायला हलके तर हवेच, पण त्याचबरोबर ते सूर्यास्ताला झाल्यास उत्तम. जेवणामध्ये व झोपण्यामध्ये तीन-चार तासांचे अंतर असल्यास खाल्लेले नीट पचते व त्यानंतर शरीर आपले ‘विअर अ‍ॅण्ड टीअर’ भरून काढल्याने कार्य नीट व जोमाने करू शकते. एवढे अंतर ठेवले नाही, तर अन्नपचनासाठी शरीर कार्यान्वित होते, हा झीज भरून काढण्याचे काम नीट होत नाही. तसेच उशिरा उठल्याने पित्ताचे व कफाचे विविध तक्रारी सुरू होतात, सर्दी, (वारंवार) शिंका, डोळा जड होणे, थकवा, ग्लानी, जळजळ-मळमळ, उलटी होणे इ. होते.
 
 
हल्ली झोप लवकर लागत नाही म्हणून गॅझेट्सवर मनोरंजनात्मक गोष्टी ऐकल्या वा बघितल्या जातात. पण, जर मन सतर्क (अलर्ट माईंड) असेल, तर ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रियांना कार्य करणे भाग पडते व झोप लवकर लागत नाही. झोपण्यापूर्वी किमान दोन तास भडक रंग, (ब्राईट लाईट, लाऊड म्युझिक) आणि थरारक कहाण्या बघू वा वाचू नयेत. या गोष्टींमुळे मन शांत न होता ‘एक्सायटेड’ होतं आणि आलेली झोप उडून जाते. ज्यांना शांत झोप लागत नाही, ज्यांना उशिरा झोप लागते, खूप विचित्रं स्वप्न पडतात, अशा सर्वांनी आवर्जून लवकर जेवावे व झोपण्यापूर्वी किमान एक तास मोबाईल, टीव्ही, टॅब, लॅपटॉप इ. वर सीरियल्स/गाणी इ. बघू नयेत. एखादं शांत रंगीत, मिणमिणता दिवा, हलका वारा येईल अशा खोलीत बसावे. थोडं वाचन केल्यास चालेल, पण पुस्तक वाचावे. टॅब्लेट, मोबाईलचा प्रकाश डोळ्यांवर पडणार नाही, याची काळजी घ्यावी.
 
 
 
काही वेळेस रात्री झोप अपूर्ण झाल्यामुळे दिवसा झोपले जाते. यामुळे काय होते, तर शरीराची विश्रांती होते, पण झीज भरून काढणे तेवढे नीट होत नाही. जर तारूण्य, आरोग्य व स्वास्थ्य टिकवायचे असेल, तर रात्रीच्या झोपेला अपवाद नाही. म्हणूनच निद्रेला ‘ब्युटी स्लीप’ असेही म्हटले आहे. काही वेळा कुठल्या तरी महत्त्वाच्या कारणांमुळे रात्री जागरण घडते. मग अशा वेळेस दुसर्‍या दिवशी दिवसा, दुपारी झोपल्यास चालेल, पण जेवणानंतर लगेच आडवे पडू नये, झोपू नये. आयुर्वेेदात यासाठी एक नियम सांगितला आहे. रात्री जेवढे तास झोप कमी होईल, त्याच्या निम्म्याने दिवसा दुपारच्या जेवणाआधी उपाशीपोटी झोपावे. अडीच तासाने थोडी डुलकी घेतल्यास हरकत नाही. आयुर्वेदात जेवणानंतर वामकुक्षी डाव्या कुशीवर झोपणे सांगितले आहे. ही वामकुक्षी १५ मिनिटांची असावी, जास्त नाही. डाव्या बाजूला पोट असल्याने डाव्या कुशीवर झोपल्यामुळे पचनास मदत होते. पुढील लेखात निद्रेचे विविध प्रकार अतिनिद्रेने होणारे त्रास इ. मुद्द्यांवर बघूयात. (क्रमशः)
 
@@AUTHORINFO_V1@@