‘आत्मनिर्भर सिंधुदुर्ग’साठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Aug-2021   
Total Views |

dr_1  H x W: 0
 
सिंधुदुर्ग जिल्हा आत्मनिर्भर व्हावा, या एकाच ध्येयासाठी आयुष्य वेचणारे निरलस सेवाव्रती म्हणजे डॉ. प्रसाद देवधर. त्यांच्या भगीरथ कार्याचा आणि विचारांचा घेतलेला हा मागोवा.
 
 
“चांगलं कणीस घडायचं असेल तर त्याआधी जमिनीत चांगल्या दाण्याला गाडून घ्यावे लागते,” असे अभाविपचे यशवंतराव केळकर म्हणायचे, तर “हा विचार माझ्या आयुष्यात महत्त्वाचा आहे,” असे प्रसाद देवधर म्हणतात. डॉ. प्रसाद देवधर म्हणजे आत्मनिर्भर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अविरत कार्य करणारे निरलस सेवाव्रतीच! ‘कोकण मनिऑर्डरवर जगते,’ असे लोक म्हणतात. पण, प्रसाद यांचे स्वप्न नव्हे निर्धार आहे की, सिंधुदुर्गातून रोजगार आणि स्वावलंबनाची गंगा विकसित व्हावी. जेणेकरून सिंधुदुर्गातून इतरत्र मनिऑर्डर जाव्यात. इथली बुद्धिवंत क्रियाशील तरुणाई इथेच राहावी आणि त्यांच्या सहभागातून सिंधुदुर्ग पूर्णतः विकसित व्हावा. सिंधुदुर्गला लागणार्‍या प्रत्येक गोष्टीची पूर्तता सिंधुदुर्गात व्हावी, असा भगीरथ विचार करून त्यावर प्रसाद यांनी कामही सुरू केले. त्यासाठी त्यांनी स्वत:ला अक्षरशः कामात गाडूनच घेतले, अगदी त्या चांगल्या कणसासाठीच्या चांगल्या दाण्यासारखे.
 
 
 
प्रसाद यांच्या निळ्या क्रांतीने सिंधुदुर्गात विकासाची गंगा अवतीर्ण झाली. ‘निळी क्रांती’ म्हणजे बायोगॅस प्रकल्पातून घरोघरी पेटणारी चूल. त्या चुलीतली निळी ज्योत. ही निळी ज्योत सिंधुदुर्गात घरोघरी आयाबायांना जगणे सुकर करत आहे. जवळ-जवळ नऊ हजार बायोगॅस प्रकल्प सिंधुदुर्गात त्यांनी उभारले. प्रत्येक बायोगॅस उभारणीची किंमत २३ हजार रुपये होती. लोकांच्या प्रश्नांना समाधानपूर्वक उत्तर देत, त्यांना बायोगॅस प्रकल्पनिर्मिती उभारणीसाठी सहभागी करून घेण्याचे महत्त्वाचे काम प्रसाद देवधर यांनी केले. शेणमाती आणि कचर्‍यापासून बनवल्या जाणार्‍या या बायोगॅसमुळे गाईगुरांचे महत्त्व वाढले. याच जोडीला गावकर्‍यांनी जोडउत्पन्न सुरू करावे, यासाठीही प्रसाद यांनी जागृतीयज्ञच सुरू केला. कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय सुरू झाले. लोकांच्या हातात चलता पैसा आला. महत्त्वाचे म्हणजे स्वयंपाक घरात राबराब राबणार्‍या माताभगिनींचे कष्ट कमी झाले. सिंधुदुर्गवासीयांची वाटचाल प्रगतिपथावर सुरू झाली. या सगळ्यापाठी प्रसाद देवधर यांचे भगीरथ सेवाकार्य महत्त्वाचे आहे.
 
 
 
 
त्यांच्या आयुष्याचा मागोवा घेऊया. मूळचे झाराप गावचे वामन आणि विजया देवधर दाम्पत्य. वामनराव हे पेशाने शिक्षक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रा. स्व. संघाचे बौद्धिक प्रमुख. त्यामुळे घरात संघ स्वयंसेवकांचे आणि प्रचारकांचे येणे-जाणे. प्रसादही बाल स्वयंसेवक. त्यावेळी प्रसाद एक वाक्य नेहमी एकत की “संघ काही करणार नाही. मात्र, तरीही सगळे होईल.” लहान वयात प्रसाद यांना वाटे संघ काहीच करणार नाही, तर मग जे अभिप्रेत आहे ते कसे होईल. पण, पुढच्या काळात ते उत्तर त्यांना स्वत:च्याच कृतीतून मिळाले. वामनराव आणि प्रसाद घरापासून काही अंतरावर असलेल्या ठिकाणी संघशाखेत जात. केव्हा केव्हा त्या शाखेत वामनराव आणि प्रसादच असत. यावर प्रसाद एकदा वामनरावांना म्हणाले, “बाबा, आपण दोघेच शाखेत जाणार असू तर इतक्या दूर का यायचे? आपण आपल्या अंगणातच शाखा लावू?” यावर वामनराव म्हणाले, “अंगणातच शाखा लावली तर ती आपल्या घरची होईल. आपण आपल्या स्वतःसाठी नाही समाजासाठी शाखा लावतो. आपण समाजासाठी आहोत.” वडिलांचे हे विधान प्रसाद यांच्या मनावर कायमच कोरले गेले. पुढे महाविद्यालयात असताना प्रसाद अभाविपशी जोडले गेले. किल्लारीत भूकंप आला असता, अभाविपच्या माध्यमातून ते लातूरला गेले. तिथे विवेकानंद रुग्णालयाचे काम पाहिले. डॉ. अशोकराव कुकडे आणि त्यांच्या मान्यवर सहकार्‍यांना भेटले. त्यांना भेटून प्रसाद यांना वाटले की, या सगळ्या असामान्य बुद्धिवंत व्यक्तींनी समाजासाठी आयुष्य पणाला लावले आणि त्यातून समाजासाठी यशस्वी लोककार्य उभे केले. हीच आज गरज आहे.
 
 
 
असो. म्हणूनच की काय, पुढे डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रसाद यांनी गावातच दवाखाना सुरू केला. त्यावेळी बहुसंख्य रुग्ण शेतकरी असत. ‘काय काम करतो?’ विचारल्यावर ते उत्तर देत, “काही काम करत नाही, शेती करतो.” त्यांच्या या उत्तराचे प्रसाद यांना वाईट वाटे. कारण, दिवसातले बहुसंख्य तास मातीत राबणार्‍या या बांधवाला आपल्या कष्टाची किंमतच माहिती नव्हती. यांचे जीवन सुखकर करायलाच हवे, या ध्येयाने प्रसाद यांना पछाडलेच. त्यांनी शेतीसंदर्भात अध्ययन चिंतन सुरू केले. त्यातूनच मग शेतकर्‍यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या गोष्टींच्या साहाय्याने त्यांचे अर्थकारण सुधरवायचे, हा विचार त्यांनी केला. त्यासाठी त्यांनी स्वत: आधी प्रयोग केले. ते गावातल्या शेतकर्‍यांना यशस्वी करून दाखवले. त्यामुळे गावातील लोकही शेतीभाती, पशूसंवर्धन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसायात प्रसाद देवधरांच्या सांगण्यानुसार बदल करू लागले. प्रसाद म्हणतात की, “बायोगॅस आणि प्रेशर कुकरमुळे सिंधुदुर्गातील ग्रामीण भागातील महिलांचे १८ हजार तास वाचले. ‘नरेगा’च्या नियमानुसार एका तासाचे २२ रुपये असतील, तर या १८ हजार तासांची संपत्ती आज वाचली आहे. या महिलाशक्तींना स्वयंरोजगाराकडे वळवण्याचे काम आम्ही करत आहोत. विचार करा की, आपल्या गाईच्या दुधातून आलेले पैसे शेअर बाजारात गुंतवणारा शेतकरी ग्रामीण भागात तयार झाला तर लोक गाव सोडून शहरात येतील का? गाव विकसित झाला, तर लोक शहरातून गावाकडे येतील. ‘आत्मनिर्भर सिंधुदुर्ग’ हाच माझा ध्यास आहे.”
 
 
 
‘आत्मनिर्भर सिंधुदुर्ग’ जिल्ह्यासाठी तन-मन-धन झिजवणार्‍या डॉ. प्रसाद देवधर यांचा विलक्षण ध्येयवाद, आशावाद आणि तितकीच कृतिशीलता आधुनिक जगातले भगीरथ पाथेय आहे नक्कीच.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@