शिवबाचा शिलेदार विहंग भणगे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2021   
Total Views |

shivaji raje_1  
वयाच्या अवघ्या दीड वर्षाचा असताना कीर्तनकारांच्या भूमिकेत रंगमंचावर पहिले पाऊल टाकलेला डोंबिवलीतील विहंग भणगे सध्या ‘जय भवानी, जय शिवाजी’ या मालिकेत ‘कथा शिवबाच्या शिलेदारांची’मध्ये काम करीत आहे. त्यानिमित्ताने विहंगचा कलाक्षेत्रातील प्रवास जाणून घेऊया.
विहंगचे शालेय शिक्षण स. वा. जोशी या शाळेत झाले. त्यानंतर त्याने महाविद्यालयीन शिक्षण रूपारेल महाविद्यालयातून घेत वाणिज्यची पदवी मिळविली. विहंगचे वडील विवेक यांचा डोंबिवलीत फोटोग्रॉफीचा व्यवसाय आहे. त्यांची आई स्मिता गृहिणी आहे. विहंग दीड वर्षाचा असताना सोसायटीत नवरात्रोत्सवात त्याने कीर्तनकाराची भूमिका साकारली होती. त्यासाठी त्याच्या आईने त्याला एक श्लोकही शिकविला होता. विहंग अवघा दीड वर्षाचा असल्याने तो हा श्लोक रंगमंचावर जाऊन बोलू शकेल, अशी खात्री त्याच्या कुटुंबीयांना नव्हती. पण, तरीही ते शिवधनुष्य विहंगने लीलया पेलले अन् त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. शालेय स्पर्धा आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्याने सहभाग घेत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली. विहंग सहा वर्षांचा असताना ‘उठी उठी गोपाळा’ नावाच्या नृत्यनाटिकेत काम करण्याची संधी त्याला मिळाली. या नाटिकेचा 45वा प्रयोग भाईंदर येथे झाला. हा प्रयोग करीत असताना एका आर्ट डायरेक्टरने विहंगमधील गुण हेरले. त्यांनी लगेचच त्याला ‘मिसिंग’ या हिंदी मालिकेत काम करण्याची संधी दिली. या मालिकेनंतर एक एक काम त्याच्याकडे चालत आले. बालकलाकार म्हणून त्याने तब्बल १७ मराठी मालिका आणि चार हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.
'
विहंगला मालिकांनंतर पुढचा ब्रेक मिळाला तो चित्रपटात. ‘देवकी’ या मराठी चित्रपटात त्याने अभिनय केला. ‘नातं एका शब्दाचं’ आणि ‘सासू पाहून लग्न करा’, अशा दोन व्यावसायिक नाटकात त्याने काम केले. विहंगला सहावीत असताना ‘ई टीव्ही मराठी’वर ‘बालपण मोठ्यांचे’ या शोमध्ये काम करण्यास मिळाले. या शोमध्ये विहंगने २८ दिग्गज मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, विनय आपटे, महेश कोठारे, जयंत सावरकर, वंदना गुप्ते, उषा नाडकर्णी, गौतम राजाध्यक्ष यांचा समावेश होता. या दिग्गजांचा कलाप्रवास मुलाखतीतून उलगडताना विहंगलाही अभिनयातील अनेक खाचखळगे समजत होते. या दिग्गजांचे जादुई हात विहंगच्या गालावरून फिरले, ते रंगदेवतांचे आशीर्वाद आहे असेच विहंग समजतो. या दिग्गजांच्या मुलाखतीचा विंहगला त्याच्या कलाप्रवासात उपयोग झाला. विहंगमध्ये अभिनयाचे गुण हे उपजतच होते. त्यामुळे त्यासाठी या प्रवासात त्याने कुठे ही शिबिरात जाऊन अभिनयाचे धडे गिरवले नव्हते.

विहंगला त्याचे शिक्षण पूर्ण करायचे होते. त्यामुळे त्याने अभिनयाच्या क्षेत्रात ब्रेक घेतला. नववीपासून त्याने अभिनय बंद करून शिक्षणाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. पदवीपर्यंतचे शिक्षण त्याने पूर्ण केले. इतक्या वर्षात अभिनय क्षेत्रातही खूप बदल झाले होते. मनोरंजन क्षेत्रात दीड वर्षातही मोठ्या प्रमाणात बदल होत असतात. बालकलाकार साकारत असताना अभिनयाची पद्धत वेगळी होती. अभिनय क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आणि बदल आत्मसात करण्यासाठी विहंगने अभिनय क्षेत्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याचे ठरविले. मुंबई विद्यापीठातून ‘मास्टर्स इन थिएटर आर्ट्स’मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. अभिनयाच्या क्षेत्रातच करिअर करायचे विहंगने लहानपणापासूनच मनाशी पक्के केले होते. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सिनेसृष्टीत विहंगला पुन्हा कमबॅक करायचा होता. ‘बॉईज’ या मराठी चित्रपटातून त्याने आपला कमबॅक केला. ‘झी मराठी’वर ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ या मालिकेत ‘टेण्या भाऊजी’ची भूमिका त्याने साकारली. या भूमिकेमुळेच विहंग ‘लाईम लाईट’मध्ये आला. विहंग यशाचे एक एक शिखर चढत होता. ‘झी युवा’वरील ‘गुलमोहर’ आणि ‘सोनी मराठी’वरील ‘एअर डाऊन’ या मालिकेत त्याने काम केले. सध्या विहंग ‘जय भवानी, जय शिवाजी’ या मालिकेत ‘कथा शिवबाच्या शिलेदारांची’ यामध्ये काम करीत आहे. अभिनयासाठी दररोज असा तो कोणताही वर्कआऊट करीत नाही. कॅरेक्टर कसे मिळेल, त्यावर तयारी करणे हे सूत्र असते.

‘जय भवानी, जय शिवाजी’ या मालिकेसाठी विहंगने फेब्रुवारी महिन्यात घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतले होते. मार्चमध्ये शूटिंग झाले. एप्रिलमध्ये ‘लॉकडाऊन’ झाल्याने शूटिंगमध्ये गॅप पडला होता. विहंगची भूमिका असलेले शूटिंग नुकतेच संपले आहे. त्यामुळे विहंगला सध्या थोडासा मोकळा वेळ मिळाला आहे. आता मोठ्या महाराजांचे शूटिंग सुरू आहे. गोष्टी स्वरूपात ही मालिका आहे. ‘कथा शिवबाच्या शिलेदारांची’ ही टॅगलाईन आहे. त्यानंतर ‘फ्लॅशबॅक’मध्ये गेल्यावर पुन्हा विहंगचा रोल सुरू होणार आहे. “या क्षेत्रात जशा संधी येतील, तसे काम करीत राहणार आहे. अभिनयात जास्तीत जास्त भरीव आणि विशेष काम करणार,” असा विहंगचा मानस आहे.

विहंगला आर्ट फिल्म करण्यात जास्त रुची आहे. या चित्रपटात मसाला कमी आणि कलेवर भर दिला जातो. “आर्ट चित्रपटाच्या ऑफर आल्या तर त्या करणे जास्त आवडेल,” असे विहंग सांगतो. अशा या हरहुन्नरी कलाकाराला दैनिक ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.


 
 

@@AUTHORINFO_V1@@