आव्हान इराणसमोरील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2021   
Total Views |

iran_1  H x W:
 
अन्न, वीज, पाणी, शिक्षण आणि आरोग्य या मानवाच्या मूलभूत गरजा. मात्र, आधुनिक युगात वीज आणि पाणी या महत्त्वाच्या गरजांची पूर्तता होत नसल्याने एखादे राष्ट्र समस्यांच्या गर्तेते सापडले असल्याचे खचितच समोर येते. मागील काही दिवसांपासून इराणमधील नागरिक रस्त्यावर उतरले असल्याचे दिसून येत आहे. त्याचे कारण तेथील दुष्काळ आणि विजेची टंचाई हे आहे. तज्ज्ञांनी असा इशारा दिला आहे की, जलसंकट दूर केले नाही, तर इराणमधील नागरिकांचे स्थलांतर होणे अटळ आहे.

इराणमध्ये कच्च्या तेलाचे साठे खूप आहेत. त्यांची अर्थव्यवस्था या तेलावरच अवलंबून आहे. तेल भरपूर, परंतु पिण्यासाठी पाणीच नाही, अशी स्थिती तेथे असून वीज आणि पाणी यांच्या गर्तेत सध्या इराण अडकला आहे. इराणमध्ये पाण्यावरून अनागोंदी होत असल्याचे दिसते. इराणला दीर्घकाळ दुष्काळाचा सामना करावा लागल्यास तेथील उरमिया सरोवर कोरडे पडण्याचादेखील धोका आहे. देशातील गंभीर जलसंकटाकडे तज्ज्ञ लक्ष वेधत आहेत. तज्ज्ञांनी अनेक वर्षांपासून बिघडत चाललेल्या पाण्याच्या परिस्थितीकडे लक्ष वेधले होते. इराणच्या हवामान विभागाने एप्रिलमध्येच अभूतपूर्व दुष्काळ पडेल, असा इशारा दिला होता. तिथे पावसामध्ये लक्षणीय घट झाली आहे. सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे. खुझेस्तान या तेल उत्पादक प्रांतात लोक पाण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आणि इतर शहरांमध्ये विजेच्या टंचाईच्या विरोधात निदर्शने करण्यात आली आहेत. ते सरकारी मदतीवर समाधानी नाहीत.
वाढती उष्णता, प्रदूषण, पूर आणि तलाव कोरडे पडणे, यासह इराणला सध्या विविध पर्यावरणीय आव्हानांचा सामना करावा लागत आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या वेबसाईटवरून मिळालेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२० ते जुलै २०२१ दरम्यान गेल्या वर्षीच्या याच कालावधीत झालेल्या पावसापेक्षा अतिशय कमी पाऊस तेथे झाला आहे. अमेरिकेतील संशोधकांनी उपग्रहाद्वारे डेटा संकलित केला आहे. या आकडेवारीनुसार, मार्चमधील पावसाची तुलना गत ४० वर्षांच्या सरासरीशी केली गेली आहे. ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया आर्विन्स सेंटर फॉर हायड्रो मेटेरॉलॉजी’च्या मते, यावर्षी पहिल्या तीन वर्षांच्या पहिल्या तीन महिन्यांत पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. इराणमध्ये १९८३ नंतर जानेवारी हा सर्वांत कोरडा महिना राहिला आहे. मार्चदेखील सर्वात निरंक होता. गेल्या वर्षाच्या नोव्हेंबरमध्ये थोडा पाऊस झाला. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने असा अंदाज लावला आहे की, इराणमध्ये ३५  टक्के पिकांना सध्या पाण्याची गरज आहे. पाऊस नसल्याने तिथे अन्नधान्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो. ‘स्टटगार्ट’ विद्यापीठाच्या संशोधकांच्या आकडेवारीनुसार ज्या भागात पूर्वी भरपूर पाणी होते, त्या भागात आता पावसाचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. करून नदी आता कोरडी आहे. हवामानबदलामुळे पाण्याची पातळी गेल्या काही वर्षांत झपाट्याने खाली आली आहे. खुझेस्तान प्राधिकरणातील स्रोतांकडून मिळालेले नकाशे जुलै २०२१ पर्यंत या प्रदेशातील धरणांच्या पाण्याची पातळी दर्शवतात. अनेक महत्त्वाच्या धरणांमध्ये पाणी अजूनही खूपच कमी आहे आणि सतत पाणी सोडण्याची मागणी जनतेतून होत आहे. धान्य उत्पादक आणि पशुपालकांच्या समस्या सोडवण्यासाठी पाणी अतिशय महत्त्वाचे आहे. काही लोक स्थानिक पर्यावरणीय संकटास तेथील तेलउद्योगाला जबाबदार धरत आहेत.
खराब व्यवस्थापन, खराब पर्यावरण व्यवस्था, दूरदृष्टीचा अभाव आणि या परिस्थितीसाठी पूर्वतयारी न करणे, यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली असल्याची बाबदेखील समोर येत आहे. इराणच्या जलसंकटाची कारणे शोधून त्यावर मात केली नाही, तर लाखो लोकांवर स्थलांतर करण्याची वेळ येऊ शकते. इराणमध्ये ५ ऑगस्टला हसन रुहानी यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाला. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी पदभार स्वीकारला. एकीकडे आण्विक कराराचा दबाव, दुसरीकडे इस्रायलबरोबर होणारे ‘प्रॉक्सी वॉर’. शेजारील अरब राष्ट्रांशी वैरभाव, आयात-निर्यातीवर परिणाम या संकटात आता देशांतर्गत वीज-पाणी यासारख्या जीवनावश्यक प्रश्नांची भर पडली आहे. शिवाय, त्यातून निर्माण होणारा लोकक्षोभ आहेच. नूतन राष्ट्रपती या सर्व संकटांचा कसा सामना करतात, याकडे इराणी जनतेचे लक्ष लागलेले आहे.









 
 


 
 
@@AUTHORINFO_V1@@