उद्या, सोमवार, दि. ९ ऑगस्ट. हा दिवस ‘आदिवासी/मूलनिवासी दिन’ म्हणून साजरा केला जातो. तसेच दि. ९ ऑगस्ट हा दिवस भारतातील स्वातंत्र्यसंग्रामातील देखील महत्त्वाचा दिवस आहे. त्यानिमित्ताने या दोन्ही दिवसांचे महात्म्य जाणून घेऊया.
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,’ ही सिंहगर्जना अखंड भारताच्या अवकाशात दुमदुमली आणि या गर्जनेने भारतीय जनमानसात स्वातंत्र्याची ज्योत पेटविली. ही बाब १०० वर्षांहून जुनी असली तरी त्याची आठवण, त्याचा प्रभाव आजही जनमानसावर कायम आहे. या ज्योतीने स्वातंत्र्याची मशाल पेटविली आणि स्वातंत्र्य मिळालेसुद्धा, पण फाळणीची जखम झेलावी लागली.
९ ऑगस्टचा भारतीय इतिहास
दि. ९ ऑगस्ट हा स्वातंत्र्यसंग्रामातील महत्त्वाचा दिवस. ’चले जाव’ या महात्मा गांधींच्या स्फूर्तिदायी घोषणेने देशभर लोक रस्त्यावर उतरले. पुण्यामध्ये टिळक रोडवर असलेल्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये दहावीत शिकणार्या नारायण दाभाडे या विद्यार्थ्याने काँग्रेस भवन येथे झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला आणि पोलिसांच्या बंदुकींना न घाबरता तेथील ‘युनियन जॅक’ खाली फेकून देऊन तेथे तिरंगा झेंडा फडकवला. मात्र, ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत असताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो हुतात्मा झाला, तर ‘गवालिया टँक’ मैदानावर लाखोंच्या संख्येने जमलेल्या जमावावर पोलिसांनी निष्ठूरपणे लाठीहल्ला केला. त्याला न जुमानता अरुणा असफअली या युवतीने ‘वंदे मातरम्’च्या घोषणा देत तिरंगा फडकवला आणि नवा इतिहास रचला. ग. दि. माडगूळकर, कुसुमाग्रज यांसारख्या कवींनी, साहित्यिकांनी, तुकडोजी महाराजांसारख्या संत विभूतींनी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख अशा व्यक्तींनी ही क्रांतीची ज्योत गीते-पोवाडे रूपात खेडोपाडी पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य केले.
ही क्रांतीची मशाल हातात होती तेव्हा त्या धगीत भारतीयांमधील धर्म, जात, भाषा असे सर्व भेदभाव वितळून गेले होते. आपण फक्त भारतीय असल्याची जाणीव शिल्लक होती. हा आहे ९ ऑगस्ट चा भारतीय इतिहास आणि आता ९ ऑगस्ट रोजी साजरा होणार्या ‘आदिवासी दिना’चा इतिहासही समजून घ्यायलाच हवा.
मूलनिवासींची कथा आणि व्यथा
हा ’विश्व मूलनिवासी दिन’ भारतात ‘आदिवासी दिन’ म्हणून साजरा होऊ लागला आहे. भारतीय समाज उत्सवप्रेमी आहे. आपले सणवार निसर्गातील अनेक गोष्टींशी, पौराणिक कथांशी, घटनांशी जोडलेले आहेत. मग ती नागपंचमी असो, वटपौर्णिमा असो किंवा रामनवमी असेल. एवढेच नाही, तर पाश्चिमात्य देशातील ‘फादर्स डे’, ‘मदर्स डे’, ‘फ्रेंडशिप डे’लासुद्धा आपण सहज ‘आपले’ मानले आणि आता ’इंडिजिनस डे’ किंवा ‘मूलनिवासी दिन’, ‘आदिवासी दिन’ म्हणून साजरा करायला सुरुवात झाली आहे. या दिवसाच्या निमित्ताने जनजाती अथवा आदिवासी समाज एकत्र येत असेल व आपल्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असेल, तर निश्चितच कौतुकास्पद गोष्ट आहे. या समाजाने एकत्र येऊन एखादा सण साजरा केला, तर वावगं काहीच नाही. फक्त ९ ऑगस्ट हीच तारीख का निवडली आहे, यामागचे सत्य जाणून घेणे, हे षड्यंत्र का रचले गेले आहे, ते जाणून घेणे, नितांत आवश्यक आहे.
या ’इंडिजिनस डे’ची कल्पना कोणी मांडली व अस्तित्वात आणली, तर ‘युनो’ने. या संघामध्ये सध्या १४ सदस्य असून यात एकही भारतीय सदस्य नाही व यापूर्वीही नव्हता. विश्वातील मूलनिवासींना हक्क मिळवून देण्यासाठी 'Working Group for Indigenous People', 'WGIP' ही संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेच्या संघामध्ये एकही भारतीय सदस्य नाही व पूर्वीही नव्हता. ही संस्था भारतातील आदिवासींना अथवा अनुसूचित जमाती समाजाला ‘मूलनिवासी’ मानत नाही.आता हा नवीनच प्रश्न उपस्थित झाला आहे व याचे उत्तर कोणाकडेही नाही आणि ते देण्याच्या भानगडीतही कोणीही पडणार नाही. कारण, या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्येक जण आपला स्वार्थ साधण्याचाच विचार करत आहे आणि हेच युरोपियन बाह्य शक्तींना अपेक्षित आहे, असे अनेक विचारवंतांना वाटते आहे.
९ ऑगस्टचे महत्त्व
हा ‘मूलनिवासी दिन’ साजरा करण्यासाठी ९ ऑगस्ट या तारखेची किंवा या दिवसाची निवड का केली गेली, हेही समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. याचे कारण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांचा इतिहास सांगतो. हा इतिहास बहुतांश भारतीय जनतेपर्यंत पोहोचलेला नाही, असे वाटते. आजचा अमेरिका देश जन्माला येऊन जेमतेम ६०० वर्षे झाली आहेत आणि भारतातील नागरिकांच्या पूर्वजांचा इतिहास हजारो वर्षांचा जुना आहे, प्राचीन, पुरातन आहे. आज विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की, आता कोणाचाही, कुठलाही धर्म, जात असली, तरी या सर्व भारतीयांचे पूर्वज भारतीयच होते. कुणीही भारताच्या बाहेरून आलेले नव्हते. सर्वच भारतीय आदिवासी आहेत, आदिनिवासी आहेत, मूलनिवासी आहेत. याउलट अमेरिकन जनतेचे पूर्वज कुणी इंग्लिश, स्पॅनिश, जर्मन अशा युरोपियन राष्ट्रांचे आहेत व गुलाम म्हणून अमेरिकेत आणल्या गेलेल्या कृष्णवर्णीय लोकांचे नाते आफ्रिकेतील देशांशी आहे. मग हे मूलनिवासी कोण आहेत, ते समजून घ्यायलाच हवे.
१४९२ मध्ये भारताचा, ‘इंडिया’चा शोध घेण्यासाठी एक धाडसी दर्यावर्दी कोलंबस निघाला व जेव्हा तो अमेरिकेच्या भूमीवर पोहोचला, तेव्हा त्याला आपण ‘इंडिया’त पोहोचलो असे वाटले आणि तेथे राहणार्या लोकांना तो ‘इंडियन पीपल’ समजला, त्यांना ‘रेड इंडियन’ संबोधले जाऊ लागले. तेथे राहणार्या मूलनिवासी समाजाची छोटी छोटी राज्यं होती, स्वतःची स्वतंत्र अशी संस्कृती होती, भाषा होती. यामध्ये चेरोकी, चिकासौ, चोक्ताव, मास्कोगी, सेमिनोल ही पाच प्रमुख राज्यं होती. या देशाचे क्षेत्र खूप मोठे होते व लोकसंख्या त्यामानाने कमी होती. मोठे क्षेत्र असल्याने जमिनीसाठी, पाण्यासाठी आपसात भांडायची गरज नव्हती. त्यांचे ते सुखशांतीने राहत होते. आज या मूलनिवासी समाजाची लोकसंख्या नगण्य आहे आणि त्यांना असलेले हक्क पण तितकेच नगण्य आहेत. आज ते दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून जगत आहेत. त्यांच्या स्वतःच्या मायभूमीत ते उपरे ठरवले गेले आहेत. ‘असुनी हाच मालक घरचा, म्हणती चोर त्याला’ अशी अवस्था आहे.
रक्तरंजित क्रौर्याने भरलेला इतिहास
युरोपियन व्यापार्यांना व्यापारासाठी व मिशनरी लोकांना ख्रिश्चन धर्माच्या प्रचारासाठी नवीन वसाहतींचा शोध लावणे आवश्यक वाटत होते. यासाठी या सर्वांना चर्चकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत मिळत असे. या येणार्या व्यापार्यांमध्ये इंग्रज लोक आघाडीवर होते. पोवहाटन कबिल्याबरोबर इंग्रजांचे पहिले युद्ध झाले, ती तारीख होती, ९ ऑगस्ट १६१०(या युद्धाची तुलना 1857च्या भारतीयांच्या स्वतंत्रता लढ्याबरोबर होऊ शकते).
२५० वर्षं मूलनिवासी लोकांबरोबर संघर्ष सुरू होता. नंतर इंग्रजांच्या मदतीला चर्चने मिशनरी लोकांना पाठविले. इंग्रजांनी या संघर्ष काळात भयावह हत्याकांड केले. ब्रिटिश सेना प्रमुख जेफ्री आमर्स्ट याने आयोजिलेल्या जगातील पहिल्या रासायनिक युद्धात जाणून बुजून टीबी, कॉलरासारख्या रोगांची साथ मूलनिवासींच्या वस्तीत पसरविली. मूलनिवासींसाठी हे रोगसुद्धा परके होते. अशावेळी ८० टक्के लोक अक्षरश: तडफडून मेले. त्यानंतर १८३० मध्ये ’इंडियन रिमूव्हल अॅक्ट’ पास झाला व जबरदस्तीने मूलनिवासींना मिसिसिपी नदीच्या पूर्वेला पाठविण्यात आले. या प्रवासात त्यांचे अतोनात हाल झाले व वाटेत ३० हजार लोक मृत्युमुखी पडले. या जीवघेण्या प्रवासाची 'Trails of Tears' दु:खाश्रूंची रेघ किंवा वाटचाल अशी इतिहासात नोंद आहे. यामध्ये एवढे लोक मृत्युमुखी पडले की, फक्त पाच टक्के लोक जीवंत राहिले.
असा हा ९ ऑगस्ट या दिवसाचा अमेरिकेच्या इतिहासातील रक्तरंजित क्रौर्याने भरलेला इतिहास आहे. एवढेच नाही, तर या युद्धात इंग्रजांच्या मदतीला मिशनरी लोक धावून आले, तो दिवससुद्धा 9 ऑगस्ट होता.जागतिक स्तरावर स्वतः ची प्रतिमा चांगली राखण्याच्या प्रयत्नात 'W'GIP' ही संघटना अस्तित्वात आली. या ‘डब्ल्यूजीआयपी’ची पहिली बैठक ९ ऑगस्ट रोजी झाली होती म्हणून १९९४ मध्ये ९ ऑगस्ट हा ‘जागतिक विश्व मूलनिवासी दिवस’, ‘वर्ल्ड इंडिजिनस डे’ साजरा करण्याबाबत घोषणा केली गेली.
दि. १२ ऑक्टोबर १४९२ रोजी कोलंबसाने अमेरिकेच्या भूमीवर पहिल्यांदा पाऊल ठेवले, त्याला ५०० वर्षे पूर्ण झाली. त्याची आठवण, त्याचा सन्मान म्हणून दि. १२ ऑक्टोबर, १९९२ रोजी मोठा कार्यक्रम साजरा करण्याचे ठरले. हा ‘कोलंबस डे’, ‘थँक्स गिविंग डे’ ला अमेरिकेतील आदिवासींनी म्हणजेच मूलनिवासींनी मोठा विरोध केला. ‘गो कोलंबस गो’च्या घोषणा देत लोक रस्त्यावर उतरले. त्यांच्या स्वरातील आक्रोश जगभर पोहोचला, अशा अशांत वेळी त्यांना शांत करण्यासाठी म्हणून अमेरिकन सरकारने काही योजना जाहीर केल्या व त्यांचा सन्मान म्हणून ‘वर्ल्ड इंडिजिनस डे’ घोषित केला.
‘ह्युमन राईट्स’च्या बड्याबड्या गप्पा मारणार्या अमेरिकेचा चेहरा तेथील मूलनिवासींना ’मुंह में राम बगल में छुरी’ असाच वाटत असणार.
यामध्ये ९ ऑगस्ट ही तारीख मूलनिवासींकरिता अपमानास्पद वाटते. कारणेही तशीच आहेत.
१) पोवहाटनच्या युद्धाची तारीख ९ ऑगस्ट.
२) या युद्धात चर्चने इंग्रजांच्या मदतीसाठी मिशनरी लोकांना पाठविले, ती तारीख होती 9ऑगस्ट.
३) ‘डब्लूआयजीपी’ची पहिली बैठक झाली ती तारीख होती ९ ऑगस्ट. कारण, ख्रिश्चन धर्मात हा शुभ दिवस मानला जातो, त्याला ’Saint Teresa benedicta of the cross (Edith Stain) feast day' म्हणतात. म्हणून अमेरिकन आदिवासी, मूलनिवासी लोक त्याला ‘आदिवासी दिन’ म्हणत नाहीत, मानत नाहीत. त्या दिवशी ते निदर्शनं करतात, त्यांच्या मरणाचा सोहळा साजरा केला जातोय, असा अपमान त्यांना वाटतो.
कृपया ही क्रौर्यकथा, ही सत्यकथा, सर्वांनी समजून घ्यावी व भारतीय जनजाती अथवा आदिवासी अथवा अनुसूचित जमाती समाजाने, ‘आदिवासी दिन’ दि. ९ ऑगस्टला साजरा करायचा, का स्वतःच्या संस्कृतीतील गौरवशाली दिवशी करायचा, याचा जरूर विचार करावा, अशी नम्र विनंती.आजकाल दि. १५ नोव्हेंबर हा भगवान बिरसा मुंडा, धरती के आबा बिरसा मुंडा यांच्या सन्मानार्थ त्यांच्या जन्मदिनी साजरा केला जातोय, ही मात्र अभिमानाची गोष्ट आहे.