पुणे : पुण्याच्या 'सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी लस संदर्भात एका महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, " ऑक्टोबर २०२१ मध्ये १२ वर्षांवरील मुलांसाठीची कोवोवॅक्स ही कोरोना प्रतिबंधक लस देशात उपलब्ध होणार आहे. या लससाठी आपत्कालीन वापराची परवानगी मागितली आहे."
पुढे त्यांनी म्हंटले आहे की, "१२पेक्षा कमी वयाच्या मुलांसाठीची लस २०२२च्या पहिल्या तिमाहीत मिळू शकेल" असा विश्वास पूनावाला यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीदेखील संसदेत भेट घेतली होती. त्यानंतर अदर पूनावाला यांनी सांगितले की, सरकार आम्हाला मदत करत आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आम्ही आभार मानतो.
लहान मुलांच्या लसीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, " 'कोव्होव्हॅक्स' ही लस प्रौढांसाठी ऑक्टोबरमध्ये उपलब्ध होईल. अर्थात ते भारताच्या औषध महानियंत्रकांनी परवानगी देण्याशी निगडित आहे. ही दोन मात्रांची लस असून तिची किंमत ती उपलब्ध करतानाच स्पष्ट होईल. मुलांसाठी ही लस २०२२ च्या पहिल्या तिमाहीत उपलब्ध होईल."