उपास, जागरण आणि ‘सिल्व्हर मेडल’...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2021   
Total Views |

RAVI KUMAR DAHIYA _1 
 
 
 
टोकियो : टोकियो ‘ऑलिम्पिक’मधील ५७ किलो वजनी गटाच्या ‘फायनल’ला २४ तासांचा अवधी शिल्लक... ‘गोल्ड मेडल’ जिंकण्याची १२५ कोटी देशवासीयांची जबाबदारी खांद्यावर आहे आणि तुमचे वजन तब्बल चार किलोने जर जास्त असेल तर... रवीकुमारने आदल्या रात्री ८ वाजता वजन केले तेव्हा ते चार किलो जास्त भरले होते. त्याने तत्काळ जिममध्ये धाव घेतली. उपाशी राहिला. सकाळी वजन होईपर्यंत रात्र तळमळत काढली. मॅचसाठीचे वजन झाले आणि मग त्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. फायनल आधीची रवीकुमारची रात्र अशी तळमळण्यात गेली होती. मी त्याला म्हटले, अवघा भारतही रात्रभर असाच तळमळत होता. त्यावर काहीसा खिन्नपणे हसत रवी म्हणाला, “सरजी, इतना दूर तक आया था, ‘गोल्ड’ही लेके जाना था... ‘सिल्व्हर’से दिल खुश नही...”
 
 
स्वप्न आणि सत्य यातील वास्तव रवीकुमारने बोलून दाखवले. ‘ऑलिम्पिक गोल्ड मेडल’ जिंकणारा पहिला खेळाडू ही ओळख जास्त आवडली असती, ही त्याची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी. ‘गोल्ड मेडल’चे स्वप्न घेऊन भारतीय कुस्ती संघ टोकियोत दाखल झालाय. पण आता बजरंग पुनीया हा एकमेव कुस्तीपटू रिंगणात आहे. त्यानंतर भालाफेकीत नीरज चोप्रा हीच काय ती भारताची शेवटची आशा असेल. नीरजचा उंच झेपवणारा भाला ‘गोल्ड मेडल’चा वेध घेईल का? हे येत्या दि. 7 ऑगस्टला स्पष्ट होईल. पण कुस्तीत रवीकुमार दहियाला ‘सिल्व्हर मेडल’वरचं समाधान मानावे लागले. दोन वेळेचा जगज्जेता रशियाच्या युगेव्हने त्याचा पराभव केला. या ‘ऑलिम्पिक’पूर्वी झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेतही रवीकुमारला याच युगेव्हने ६-४ असे गुणांवर पराभूत केले होते. आज त्याचा वचपा काढायची रवीला चांगलीच संधी होती. पण युगेव्हच्या ताकदी खेळापुढे रवीकुमार निष्प्रभ ठरला.
 
 
दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर रवीने सुशीलकुमारसोबत कुस्तीचा सराव केला. ‘ऑलिम्पिक’मध्ये ‘सिल्व्हर मेडल’ जिंकणारा तो सुशीलनंतरचा अवघा दुसरा खेळाडू ठरलाय. ‘ब्राँझ मेडल’ची अपेक्षा असणार्‍या दीपक पुनीयालाही आज पराभव पत्काराव लागला. हॉकीत आज भारताने संघर्षपूर्ण विजय मिळवत ‘ब्राँझ मेडल’ जिंकून दिले. आयुष्यात काही दिवस असे असतात की, तुम्ही ते जगता. हॉकीतील आजचा दिवस हा त्यापैकीच. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ. तरीही ४१ वर्षांत पहिल्यांदा भारत ‘सेमी फायनल’ खेळत होता. २००८ सालच्या बीजिंग ‘ऑलिम्पिक’ला भारत पात्र ठरु शकला नव्हता. हॉकीच्या ‘ऑलिम्पिक’ इतिहासात आजवरची ही सर्वाधिक लाजिरवाणी कामगिरी होती. त्यानंतर लंडन ‘ऑलिम्पिक’मध्ये एकही सामना जिंकता न आल्यामुळे भारतीय संघाला शेवटच्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. ‘ऑलिम्पिक’चे आठ ‘गोल्ड मेडल’ जिंकणारा भारतीय हॉकी संघ असा झगडत होता. पण नव्या दमाच्या मनप्रित सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ‘ब्राँझ मेडल’वर आपले नाव कोरले.
 
 
भारताचे ‘ऑलिम्पिक’मधील हे आजवरचे तिसरे ‘ब्राँझ मेडल’ ठरलेय. याशिवाय भारताने आठ ’गोल्ड’ आणि एक ‘सिल्व्हर’ अशी आता एकूण १२ ‘ऑलिम्पिक मेडल’ जिंकली आहेत. पुढील वाटचालीसाठी भारतीय हॉकी संघाचा हा विजय नक्कीच आश्वासक असेल. यंदाच्या ‘ऑलिम्पिक’मध्ये भारत आता दोन ‘सिल्व्हर’ आणि तीन ’ब्राँझ मेडल’ जिंकत पाच ‘मेडल’सह ६५ व्या क्रमांकावर आहे. यापूर्वी लंडन ‘ऑलिम्पिक’मध्ये भारताने सर्वाधिक सहा ‘मेडल’ जिंकली होती. त्यात दोन ’सिल्व्हर’ आणि चार ‘ब्राँझ मेडल’चा समावेश होता. महिला हॉकीत भारत ‘ब्राँझ मेडल’साठी झुंजतोय आणि कुस्तीपटू बजरंग पुनीया आणि भालाफेक पटू नीरज चोप्राचे आव्हान अजून शिल्लक आहे. त्यामुळे लंडन ‘ऑलिम्पिक’मधील मेडलचा विक्रम मागे टाकण्याची भारताला चांगली संधी आहे.

@@AUTHORINFO_V1@@