पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : क्रीडा क्षेत्रासाठीचा भारत सरकारचा सर्वोच्च ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ आता हॉकीचे जादुगार ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ या नावाने ओळखला जाणार आहे. जनतेच्या आग्रहास्तव हा निर्णय घेतल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जाहिर केले आहे.
क्रीडा क्षेत्रामध्ये अत्युच्च कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना भारत सरकारतर्फे ‘खेलरत्न’ पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात येते. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ या पुरस्काराचे नाव ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ असे करण्यात आले होते. पुरस्कारामध्ये २५ लाख रुपये रोख आणि मानचिन्ह खेळाडूंना प्रदान केले जात असते.
आता या पुरस्कारास श्रेष्ठ खेळाडू, हॉकीचे जादुगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्यात आले आहे. तशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. घोषणा करताना ते म्हणाले, “देशाला अभिमान वाटावा अशी परिस्थिती असताना अनेक देशवासियांचा आग्रह आहे की ‘खेलरत्न’ पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद यांना समर्पित करण्यात यावे. जनभावनेचा आदर ठेवून या पुरस्काराचे नाव आता ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ असे करण्यात येत आहे”.