मिशन ऑलिम्पिक : वंदना, आम्हाला माफ कर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2021   
Total Views |

Vandana Kataria_1 &n

टोकियो (संदीप चव्हाण) : खेळाला जातपात, धर्मपंथ नसतो, असे लहाणपणापासून वाचत आलोय, ऐकत आलोय, पण आपल्या भारतात खेळाला जातही असते हे काल कळले. भारतीय महिला हॉकी संघ आजवरची सर्वोत्तम कामगिरी येते टोकियोत करतोय. इतिहासात पहिल्यांदा भारतीय महिला हॉकी संघ ‘ऑलिम्पिक’च्या ‘सेमी फायनल’ला धडकला होता. अर्जेंटिनाकडून आपण पराभूत झालो, तरी झुंज जबरदस्त होती. अर्थात, तरीही आपली ‘ब्राँझ मेडल’ची आशा शिल्लक होती. टोकियोत भारतीय पुरुष हॉकी संघाने ‘ब्राँझ मेडल’ जिंकल्याने आम्ही सगळेच येथे जल्लोष करत होतो आणि अचानक बातमी धडकली की, भारतीय महिला हॉकी संघाची ‘स्टार’ खेळाडू वंदना कतारियाच्या उत्तराखंडमधील हरिद्वार येथील घरासमोर उच्चवर्णींनी धिंगाणा घातला. का तर वंदना दलित आहे. दलितांमुळेच आपण हरतोय, असे सांगत त्यांनी वंदनाच्या घरासमोर फटाके फोडले. अश्लिल नृत्य आणि शेरेबाजी केली. खरेतर एखाद्या खेळाडूची एवढी अवहेलना झाल्यावर तो खेळाडू पुरता खचून जाईल. पण वंदनाने या सगळ्या जात्यांधाना आपल्या हॉकी स्टीकने उत्तर दिले. ब्रिटनविरुद्धची ‘ब्राँझ मेडल’ची मॅच आपण आज हरलो, पण त्यात लक्षात राहिला तो वंदना कटारियाने केलेला मैदानी गोल. या गोलमुळेच भारत या मॅचमध्ये ब्रिटनविरुद्ध ३-२ असा आघाडीवर गेला होता. या गोलनंतर बेंबीच्या देठापासून ओरडून तिने केलेला जल्लोष अवघ्या देशाने पाहिला. पण शेवटी बेंबीशी जोडलेली नाळ कोणत्या जातीची आहे, हे आपल्या देशातील काही जात्यांधाना महत्त्वाचे वाटते, याला काय म्हणावे. तिच्या त्या गोलनंतर स्टेडियममध्ये मी उडी मारून जल्लोष केला होता. डोळे पाण्याने ओलावले होते. माझा बाजूचा ब्रिटनचा पत्रकार माझ्या जल्लोषाकडे बघून हसतच मला म्हणाला, “वेट मॅन, इट्स हाफ टाईम, मॅच इज स्टील ऑन...” (इतक्यात जल्लोषाची घाई करू नकोस, अजून मॅच संपायची आहे.) मी त्याच्याकडे हसून नुसते पाहिले. माझा जल्लोष त्या मॅचमधील आघाडीसाठी नव्हताच मुळी, वंदनाने जातीपातीच्या विचारधारेवर मिळवलेला तो विजयी गोल होता. भारताच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या सर्व जातीधर्माच्या मुलींच्या महत्त्वाकांक्षेला सहस्त्र हत्तींचे बळ देणारा तो गोल होता. वंदनाच्या जिद्दीला, तिच्या कमिटमेंटला सलाम करणारा तो जल्लोष होता.
 
 
 
या स्पर्धेत वंदनाने चार गोल केलेत. मैदानावरील तिचा वावर संघासाठी आजवर नेहमीच आश्वासक राहिला. खेळाच्या मैदनावर वंदनाने जगातील दिग्गज संघांना पराभूत केले, पण मायदेशी जातीपातीच्या मैदानावरील लढाई ती हरली. खेळ कोणताही असो तो आधी हृदयात आणि मग मेंदूत जिंकावा लागतो आणि मग प्रत्यक्ष मैदनावर ते डावेपेच अंमलात आणून डाव जिंकावा लागतो. काल त्या जात्यांध्यानी वंदनाच्या आधी हृदयावर घाव घातला आणि मग तिच्या मेंदूला दलित असल्याची आठवण करून दिली. एका उमलत्या गुणवत्तेचा हा दिवसाढवळा खून होता आणि हा खुन करणार्‍या प्रवृत्तीची नावे होती विजय पाल, अंकुर पाल आणि सुमित चौहान. कायद्याच्या पळवाटेवरून हे कदाचित पुराव्या अभावी निर्दोष सुटतील, पण त्यांनी केलेला हा आघात न भरून येण्यासारखा आहे. अशा प्रवृत्तींना वेळेत रोखले गेले पाहिजे. गावातील उच्चवर्णीयांचा विरोध पत्करून वंदनाच्या वडिलांनी तिला हॉकी खेळण्यास प्रोत्साहन दिले. तीन महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले. वंदना ‘ऑलिम्पिक’साठी ‘बायोबबल’मध्ये असल्यामुळे वडिलांचे अंतिम दर्शनही घेऊ शकली नव्हती. देशासाठी आपले सर्वस्व पणास लावणार्‍या वंदनाकडून तुम्ही यापेक्षा अधिक काय अपेक्षा ठेवू शकता...
 
 
 
लक्षात घ्या १९८० साली महिला हॉकीचा ‘ऑलिम्पिक’मध्ये समावेश करण्यात आला. त्यानंतरच्या ११ ‘ऑलिम्पिक’पैकी मॉस्को(१९८०), रिओ (२०१६) आणि टोकियो अशा तीनच ‘ऑलिम्पिक’ला भारतीय महिला हॉकी टीम पात्र ठरू शकली होती. १९८० साली भारतीय हॉकी संघ जेव्हा मॉस्कोला गेला तेव्हा संघासोबत फक्त एक कोच आणि एक मॅनेजर इतकेच जण होते. पण यंदा टोकियोमध्ये संघासोबत सात जणांचा ‘सपोर्ट स्टाफ’ आहे. हा खर्च कोण करतोय? भारतीय हॉकी टीमचे पुरस्कर्ते कोण आहेत ठाऊक आहे का ? उत्तर आहे ओडिशा राज्य सरकार. होय! भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाला तब्बल १५० कोटी रुपयांची ‘स्पॉन्सर्सशिप’ नवीन पटनाईक यांनी दिलीय. आज त्याची मधुर फळ आपण चाखतोय. भारतीय पुरुष हॉकी संघाने ४१ वर्षांनंतर ‘ब्राँझ’च्या रुपाने भारताला मेडल जिंकून दिले आहे, तर ‘सेमी फायनल’ गाठत भारतीय महिलांनीही ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवून दिले. एकीकडे भारतीय हॉकी संघाला आंतराराष्ट्रीय पातळीवर पुन्हा सन्मानाने पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच काहीजणांचा भारताला अश्मयुगाकडे नेण्याचा कुटील डाव सुरु आहे आपण सगळ्यांनीच तो हानून पाडला पाहिजे. या मॅचनंतर मी वंदनाशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावर ती काही सेकंद शांत होती. मनात शब्दांची जुळवाजुळव करत होती. “मी माझा फोन येथे आल्यापासून बंद केलाय. त्यामुळे मी घरच्यांशी अजून बोलले नाही. आम्ही सगळ्याजणी देशासाठी हॉकी खेळतोय, जो काही निकाल लागेल त्यामुळे काही वावगे करू नका. जसे मी थोडेबहुत जे ऐकले आहे, जातीपातीवरुन टीका कृपया कोणी करु नका. संघात खुप युवा खेळाडू आहेत. आपल्या सगळ्यांना एक झाले पाहिजे...” असे काहीसे ती अडखळत बोलली. भावाना व्यक्त करण्यासाठी भलेही तिला योग्य शब्द सापडत नव्हते, पण तिच्या पापण्यांमागे डोकावणारे अश्रू खूप काही सांगून जात होते. भारतीय संघ ‘ब्राँझ मेडल’ची मॅच हरला अन् अवघा महिला संघ भर मैदानात धाय मोकलून रडला. त्या अश्रूत आमचे अश्रू कधी सामील झाले कळलेच नाही. जड पावलांनी हॉकीचे मैदान सोडताना मनातल्या मनात वंदनाची माफी मागत होतो. खरचं वंदना आम्हाला माफ कर. आम्हाला तुझा आजही अभिमान आहे आणि यापुढेही राहील. तू फक्त अशीच झुंजारपणे लढत राहा...
 
 
@@AUTHORINFO_V1@@