चीनच्या चलाखीवर शिक्कामोर्तब!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2021   
Total Views |

China_1  H x W:
 
 
 
जवळपास ४.४ दशलक्ष नागरिकांचे जीव घेणारा, २०० दशलक्ष नागरिकांना संसर्गित करणारा ‘कोविड-१९’चा विषाणू हा चीनमधल्या ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’मध्येच तयार करण्यात आला, या वारंवार केल्या जाणार्‍या दाव्यावर अखेरीस शिक्कामोर्तब झाले आहे. अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या अहवालातून चीनच्या या जागतिक षड्यंत्राचा पर्दाफाश झाला आहे.
 
 
 
चीनमधील ‘वुहान इन्स्टिट्यूट’ आणि तेथील मार्केटभोवती कोरोना विषाणूची उत्पत्ती झाल्याच्या थेअरीज अगदी गेल्या वर्षीपासूनच समोर येत होत्या. परंतु, चीनने यासंबंधी कोणतीही सत्य माहिती जगाला तर सोडा, ‘जागतिक आरोग्य संघटने’लाही न देण्याचा उद्दामपणा दाखवला. तसेच कोरोना विषाणू मानवनिर्मित नसून, तो कसा निसर्गत: जन्माला आला आहे, हे जगाला पटवून देण्याचा खटाटोप तर चीन आजही विविध माध्यमातून करताना दिसतो. परंतु, अमेरिकेतील या नव्या अहवालात असा स्पष्ट दावा करण्यात आला आहे की, वुहानच्याच प्रयोगशाळेत या विषाणूवर प्रयोग सुरू होते. या विषाणूमध्ये बदल करून तो मानवामध्ये कशाप्रकारे संक्रमित करता येईल, यासंबंधीच्या प्रयोगादरम्यानच हा विषाणू प्रयोगशाळेतून लीक झाला आणि नंतर वुहानपासून ते व्हॅनकुवरपर्यंत त्याने अक्षरश: जगाच्या कानाकोपर्‍यात थैमान घातले.
 
 
अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाचे खासदार आणि पक्षाच्या विदेशनीतीचे जाणकार माईक मेकॉल यांनी यासंबंधीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. परंतु, अजूनही अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने या अहवालाची पुष्टी केलेली नाही. त्यामुळे बायडन सरकार याविषयी नेमकी काय भूमिका घेते, ते आगामी काळात स्पष्ट होईलच.
 
 
 
या अहवालात हा विषाणू नेमका कधी वुहानच्या प्रयोगशाळेतून लीक झाला, ती तारीखही अगदी स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे. त्यानुसार दि. १२ सप्टेंबर, २०१९पूर्वी हा विषाणू प्रयोगादरम्यान प्रयोगशाळेतून पहिल्यांदा लीक झाला आणि वुहानमध्ये सर्वप्रथम पसरत गेला. परंतु, चिनी कम्युनिस्ट पार्टीने त्यांच्या देशवासीयांबरोबरच संपूर्ण जगापासून ही माहिती मुद्दाम लपवून ठेवली. एवढेच नाही, तर अख्ख्या ‘सीसीपी’बरोबरच शी जिनपिंग यांनाही या प्रकरणाची पूर्ण कल्पना असल्याचे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. चिनी अधिकार्‍यांची तर हा विषाणू आमचा नव्हेच, इथवर खोटे बोलण्यापर्यंत मजलही गेली. एका चिनी अधिकार्‍याने तर आपल्या लेखात कोरोनाचा विषाणू हा अमेरिकेच्या सैन्याने चीनमध्ये पसरवल्याचाही खळबळजनक दावा केला होता. त्याचबरोबर कोरोनाविषयी बातमी देणार्‍या चिनी आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांवरही चिनी सरकारने निर्बंध लादले. कोरोना आणि कोरोनाची बातमी चीनमधून हळूहळू जगभर पसरू लागल्यानंतर लगेचच गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये चीनमधील हवाई वाहतुकीवर कित्येक देशांनी बंधने आणली. त्यावरही चीनने आक्षेप घेत या देशांवर टीकेची झोडही उठवली. म्हणजे एकूणच काय, तर या महामारीशी फारकत घेण्याचा आटोकाट प्रयत्न चीन २०१९पासून ते आजतागायत करत असल्याचे लक्षात येईल.
 
 
हा संपूर्ण प्रकार लक्षात घेता, मेकॉल यांनी या प्रकरणाची अमेरिकेने खोलवर चौकशी करण्याची मागणी तर केली आहेच, शिवाय वुहानच्या प्रयोगशाळेतील सर्व संबंधित आणि ‘सीसीपी’मधील अधिकार्‍यांवर कडक कारवाईची मागणीही रिपब्लिकन पक्षाकडून केली गेली. त्यामुळे आता बायडन सरकार चीनवर काय कारवाई करते, ते पाहावे लागले. म्हणा, विरोधकांच्या अहवालावर बायडन विश्वास ठेवण्याची शक्यता तशी कमीच, म्हणूनच जो बायडन यांनी मे महिन्यामध्येच अमेरिकन तपास यंत्रणांना ९० दिवसांत या प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. तेव्हा, आता अमेरिकन तपास यंत्रणा नेमका या प्रकरणी काय अहवाल सरकारला सादर करतात, त्यावरून चीनला जबाबदार कसे ठरवायचे, याची रणनीती बायडन सरकार ठरवू शकते.
 
 
 
फक्त अमेरिकाच नाही, तर जगातील इतर शक्तिशाली देशांनीही चीनच्या या चुकीला कदापि विसरून, माफी देऊन चालणार नाही. तसे झाले तर आगामी काळात यापेक्षा शेकडो पटीने मानवजातीला घातक अशा जैविकशस्त्रांचा सामना चीनला करावा लागू शकतो. त्यामुळे संयुक्त राष्ट्राने केवळ ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या चीनपूरक माहितीवर अवलंबून न राहता, या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून चीनला त्याच्या कुकर्मांची शिक्षा ही दिलीच पाहिजे, तसे झाले तरच अशा मानवनिर्मित महामारीचे संकट भविष्यात टाळता येईल.
 
 
@@AUTHORINFO_V1@@