पथ मे शूल हो या फूल...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2021   
Total Views |

mahad_1  H x W:
 
महाड आणि चिपळूणमध्ये पुराने थैमान घातले. दरडी कोसळल्या. महाड आणि चिपळूणमधील विविध सेवाभावी संस्था आणि व्यक्तींना भेटले. चांगल्या किंवा वाईट परिस्थितीमध्ये समाजातले अंतरंग कसे असते? त्यातल्या बारकाव्यांचाही विचार करायला हवा? त्या अनुषंगाने महाड आणि चिपळूणमधील परिस्थितीचा घेतलेला हा आढावा.
मुंबई-गोवा हायवेवरच बुटाला हाऊसमध्ये रा. स्व. संघाचे महाड पूरग्रस्त परिस्थिती आपत्कालीन निवारण केंद्र. केंद्राच्या आत गेल्या गेल्या एक छोटा नोंदणी कक्ष. तिथे दररोजची दैनंदिनी, तपशिलाची नोंदच. सज्जन समाजशक्तीने महाड पूरग्रस्तांसाठी आणलेल्या मदतीची नोंद इथे केली जाते. प्रत्येक मदतीची, अगदी काड्यापेटीची सुद्धा इथे नोंद. आलेल्या वस्तूंचे वर्गीकरण आणि वितरणही व्यवस्था. त्यासाठी पूरग्रस्त गावांचे सर्वेक्षण. कुठे काय गरज आहे, त्यानुसार सेवाकार्य आणि मदतीचे व्यवस्थापन. इथले प्रचारक निलेश मुळीक, कार्यवाह विष्णू केंजाळे, विभाग कार्यवाह आणि इतर स्वयंसेवकांना भेटले. रा. स्व. संघाचे स्थानिक पदाधिकारी आणि स्वयंसेवकही इथे होतेच. त्यांना विचारले, “तुम्ही तर महाडचेच ना? तुमच्या घरात पूर आलेला का?” यावर कामावरून जराही लक्ष विचलित न करता जवळपास सगळेच म्हणाले, “हो, आलेला पूर,पण एक-दोन दिवसांत घरातला चिखल-कचरा साफ करून आम्ही इथे आलो. पहिल्या दिवशी रोह्यातील स्वयंसेवक बांधवांनी इथे महाडमध्ये खिचडी वाटप केले. दि. २४ जुलैपासून इथूनच अन्न तयार करून वितरण करायची व्यवस्था होती. ती आजतागायत सुरू आहे.” इथे सकाळ संध्याकाळ हजारो व्यक्तींसाठी अन्न तयार होते, ते स्वयंसेवक वाड्या-पाड्यात घेऊन जातात. अजून कितीतरी घरात अन्न शिजू शकत नाही, अशी परिस्थिती. यावर कार्यवाह विष्णू यांनी दोन घटना सांगितल्या. ते म्हणाले, काही महिन्यांपूर्वी वस्तीपातळीवर आम्ही सद्भावना बैठक घेतली होती. सधन गृहस्थाच्या घरी आम्ही होतो. बुद्धवंदना केली. त्यानंतर संवादही केला. अतिशय मेहनत करून हे गृहस्थ सधन, यशस्वी झालेले. ते अडलेल्या नडलेल्या समाजबांधवांना मदत करत. पूर आल्यानंतर ती वस्तीही पाण्याखाली गेलेली. पण भीषणता कळली नव्हती. त्या वस्तीसाठी वितरण करण्यासाठी काही सामान घेतले. तिथे काही महिला आल्या. त्या वस्तीत आल्यावर सेवाभावी गृहस्थाला बोलवावे, त्यांनाही मदत कार्यात सहभागी करावे, असे वाटले. त्यामुळे उपस्थितांकडे चौकशी केले. ते आहेत का? यावर त्या घोळक्यातील महिला म्हणाली,”मी त्यांची पत्नी. कुणाला एक कागदाचा कपटा द्यावा इतकंही घरात उरलं नाही. आम्ही सगळे नेसत्या कपड्यानिशी वाचलो. हेच नशीब.” हे सांगताना तिच्या डोळ्यांत आसवं होती. दुसरी घटना. गावातले एक सधन नामांकित वकील. संघातर्फे एका वस्तीत अन्नवितरण सुरू होते.
 
 
त्यावेळी ते वकील सोबत होते. संघ स्वयंसेवकांनी त्यांना विचारले,”तुम्ही जेवलात का?” त्यावर त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. म्हणाले, “काल सकाळपासून काही खाल्ले नाही. त्याही परिस्थितीत तो अन्नाचे पाकीट मागत नव्हता.” हे सांगून विष्णू म्हणाले,”या पुराने सगळ्यांचे होत्याचे नव्हते केले. कष्टाने उभारलेला संसार मोडला. भविष्यात अस्थिरता निर्माण झाली, पण लोकांनी त्यांची सभ्यता, त्यांचा सुसंस्कृतपण बिल्कूल सोडला नाही. मला नको, जो गरजू आहे त्याला द्या, असे सांगणारे लोक भेटले.” विष्णू यांच्या मनोगतातून मला संघ स्वयंसेवकांनी चालवलेल्या या अन्नयज्ञाचे महत्त्व कळले होते. कोरोनामुळे लोकांचे कामधंदे बंद पडले. आता कुठे पुन्हा कामाला सुरुवात झाली, तर पुराने पूर्ण कंबरडे मोडले. अशा वेळी काही बँकांच्या मदतीने व्यवसाय करणाऱ्यांना सवलतीमध्ये कर्ज मिळवून द्यायची योजनाही इथे साकारत आहे. गरजूंना अन्नपाणी, कपडे,औषधं, सफाईचे सामान,चपला आणि सर्वतोपरीची मदत या केंद्रातून होत आहे. स्वत:चे घर पाण्यात असताना तातडीने त्यावर नियोजन करून समाजासाठी सेवकार्यात सहभागी झालेल्या या स्वयंसेवकांसमोर आपोआपच नतमस्तक झाले. इतक्यात तिथे दादर सिद्धिविनायक परिसरातील विक्रम वालावलकर आणि त्यांच्यासोबत तरुण दिसले. स्वच्छता अभियानासाठी इथे ते आले होते. त्यांना विचारले,”तुम्ही इथे आलात? कामधंदे वगैरेचं काय?” तर त्यांचे उत्तर आम्ही स्वयंसेवक आहोत. नोकरी-व्यवसाय आहेच, पण समाजासमोर एवढा मोठी समस्या उभी राहिली असताना आम्ही घरात निवांत यासंबंधीच्या बातम्या कशा पाहू? प्रश्न आहेतच, पण ते सोडवण्यासाठी आम्ही पुढे यायलाच हवे ना? तिथेच बाजूला श्रमदानाची तयारी करणाऱ्या १८-२० वर्षांच्या तरुणांना विचारले,”तुम्हाला इथे येण्यासाठी आईबाबांनी परवानगी कशी दिली?” त्यावर त्यांचे म्हणणे,”आम्ही स्वयंसेवक आहोत. आईबाबांनी रा. स्व. संघाचे काम पाहिले आहे. आमचे शिक्षक आणि इतर प्रचारकांचे जीवन पाहिले आहे. अशा कठीण वेळी आम्ही पुढे येऊन समाजासाठी खारीचा वाटा उचलायलाच हवा ना?” तरुण आणि ज्या वयात मौजमज्जा करूया, असे स्वप्न पाहिले जाते त्या वयातले १५० ते १७५ तरुण वीज नसलेल्या, पाणी नसलेल्या, पुरेशी शौचालय व्यवस्था नसलेल्या परिस्थितीत समाजबांधवांसाठी झटत होते. रा. स्व. संघाच्या माध्यामतून इथे या तरुणांनी हजारो कुटुंबांना पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी मदत केली आहे. देशाचे आणि समाजाचे भवितव्य उज्ज्वल आहे. खरेतर मला वाटत राहिले की,‘संघ हैं तो मुमकिन हैं।’
 
विश्व हिंदू परिषद, ठाणे आणि ‘भारतमाता सेवा प्रतिष्ठान’ने आपले केंद्र भावे गावच्या बौद्धवाडीत सुरू केले. वीज नाही, पाणी नाही. पावसाचे पाणी साचून किंवा नदीचे पाणी दैनंदिन वापर करून मुंबई, ठाणे परिसरातील तरुण मुलं इथे सेवाकार्य करायला. मुंबईच्याच डॉ.प्रतिभा बोथारे यासुद्धा काही महिला डॉक्टरांसमवेत इथे आलेल्या. कारण, पावसापाण्यात सगळेच वाहून गेले. चिखल, दलदलीत आयाबायांना काय सोसावे लागले असेल, ते त्याच जाणो. त्याबाबत विचार करूनच या महिला डॉक्टरांचा संच इथे आलेला. विश्व हिंदू परिषदेचे बौद्धवाडीतले सेवाकार्य पाहून वाडीच काय पूर्ण भावे गाव केंद्रासोबत होते. याबाबत अनुभव कथन करताना ‘भारतमाता सेवा प्रतिष्ठान’चे गणेश शिवाजी बोरगे यांनी सांगितले की,‘भारतमाता सेवा प्रतिष्ठान’सोबतच ‘विश्व हिंदू परिषदे’चे अनेक सदस्य आम्ही सगळे एकत्र या मोहिमेसाठी बुधवार,दि. २८ जुलैला सकाळी ११ वाजता पोहोचलो. ‘भारतमाता सेवा प्रतिष्ठान’चे सचिव अजयजी जगताप आणि विश्व हिंदू परिषदेचे ठाणे जिल्हा मंत्री विश्वास सावंत यांनी आदल्या दिवशीच या भागाचा दौरा करून शेवटी खरवली हे गाव ठरवले होते आणि त्यासाठी श्रमदानासाठी पहिल्यांदा पोहोचलो, महाड तालुक्यातील खरवली गावात. त्यासाठी गावचा तरुण शुभम जाधव हा सोबत होता. प्रत्यक्ष नियोजनाची सर्व जबाबदारी माझ्यावर आणि स्वप्निल मायदेव यांच्यावर सोपविली होती. पहिल्या दिवशी १४ जणांचे पथक गावात खोरे, खराटे, पाट्या, गमबूट आणि इतर साहित्यासोबत हजर झाले. शुभमने सुचवल्याप्रमाणे जिथे जेसीबी जाऊ शकत नाही. परंतु, स्वच्छता खूप गरजेची आहे, अशा श्रीदत्त मंदिरात स्वच्छता सुरू केली. गावचे सरपंच, मंदिराचे अध्यक्ष यांच्या डोळ्यांत स्वयंसेवकांचे धन्यवाद करताना डोळ्यात अश्रू तरळत होते. अशा प्रकारे गुरुवारच्या आरतीत येणारा अडथळा दूर झाला आणि गावकरी सुखावले. दि. २९ जुलैच्या पहाटे स्वप्निल मायदेव यांच्या नियोजनाखाली दुसऱ्या पथकाने शाळेचा वर्ग स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले. महत्त्वाचे म्हणजे या पथकात महाविद्यालयीन विद्यार्थी जास्त होते. दि. ३१ जुलै शनिवारी चौथे पथक श्रमदानासाठी हजर झाले. यादिवशीदेखील श्रमदान व खाद्यपदार्थ, वस्तूंचे वर्गीकरण अशा दोन तुकड्या करण्यात आल्या. समस्यांना पुरून उरण्यासाठी तरुणाई सेवाकार्यात उतरली होती.‘भारतमाता सेवा प्रतिष्ठान’ आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्य प्रत्यक्ष अनुभवले. तीथे अजय जगताप, विश्वास सावंत, गणेश बोरगे, विजय माने, अवधुत शेलार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना भेटलेही होते. त्यामुळे गणेश यांचे मनोगत आधीच माझ्या मनात तयार होते.
 
असो. विषयांतर झाले. चिपळूण गद्रे हायस्कूलमध्ये गेले. तिथे रा. स्व. संघ परिवारातल्या भगिनी भेटल्या. चिपळूण शहराला पाण्याने वेढले, दरडी कोसळल्या. तेथील गावाचे सर्वेक्षण करून नक्की काय मदत हवी आहे, याचा तपशील या भगिनींनी बनवला. केलेल्या आवाहनानुसार आलेल्या वस्तूंचे वर्गीकरण करणे, त्यांचे किट्स तयार करणे, त्यांचे वितरण करणे अशी कामे या भगिनींनी केली. यातील काहीजणींच्या घरीही पुराचा तडाखा बसलाच होता. पण घरचं आवरून त्या इथे सेवेसाठी आल्या होत्या. चिपळूणच्या केंद्रात एका बाजूला गोण्यांचा ढिग पडला होता. त्यांचे वितरण होणार नव्हते. का? तर मदतीसाठी आलेले कपडे जुने आणि व्यवस्थित नव्हते. देताना शक्यतो नवे कपडे द्यावेत, नवे नसतील, तर जुने, पण सुस्थितीतले स्वच्छ कपडे द्यावेत, असे या भगिनींचे पर्यायाने रा. स्व. संघाचे,परिवाराचे मत. हा जुन्या कपड्याचा ढिग काय करणार? यावर इथल्या व्यवस्थेत असलेल्या भावना आंबेटकर, प्राजक्ता ओक,सुचिता भागवत, वैशाली गाणू, जाई वैशंपायन म्हणाल्या, “आम्ही हे कपडे टाकून देणार नाही. या कपड्यापासून गावातल्याच महिलांकडून गोधडी पायपुसणी बनवून घेऊ. त्यांना ते प्रशिक्षणही देऊ. त्यांना चार पैसे मिळतील ना?” कोरोना आणि पुराने घराचे आर्थिकचक्र विस्कटले आहे. एक गृहस्वामिनी सामाजिक कार्यातही कसा नियोजनपूर्ण विचार करते, याचे हे उत्तम उदारहण होते. या भगिनीशी बोलताना त्यांनी अनेक घटना सांगितल्या. म्हणाल्या, “येथील मदतकेंद्र सुरू होणार होते. आम्ही इथे नुकत्याच आलो. सोबत गरज पडली, तर ‘सॅनिटरी पॅड’ हवे म्हणून स्वत:पुरते तेही घेतलेले. अचानक त्याच दिवशी १२-१३ वर्षांच्या दोन मुली धावत धावत आल्या.त्यांच्याकडे पाहूनच वाटत होते की,त्या पूरग्रस्त आहेत. काही विचारण्याआधीच त्या म्हणाल्या,”सॅनिटरी पॅड किंवा जुनेरं द्या. आम्हाला पाळी आली आहे.” त्यांच्या डोळ्यात पाणी होते. हतबलता होती. त्यांचे म्हणणे एकून चटकन कळले की, आज अत्यावश्यक गोष्टीच्या वितरणात महिलांशी निगडित कपडे आणि वस्तू यांचाही विचार करायलाच हवा. आम्ही सर्वेक्षण करताना गरोदर महिला, आजारी महिला अणि वृद्ध महिला असे वर्गीकरण केले. त्याच निकषावर काय गरज आहे, याचं नियोजन केलं. इथेच स्वयंसेवक बंधूही भेटले. प्रचारक विवस्वान भेटले. सूक्ष्म स्तरावर नियोजन करून युद्धपातळीवर सेवाकार्य सुरू होते. इथे मुख्यत: जीवनावश्यक वस्तूंचे वितरण, वस्ती-रस्ते स्वच्छता करणे, आरोग्य शिबीर आयोजित करणे हे काम सुरू होते. रा. स्व. संघ आणि परिवारातील प्रत्येक संस्था यात सहभागी झाली होती. जणे वटवृक्षासह पारंब्याचं.? रा. स्व. संघाचे हे काम कुणासाठी सुरू होते? तर शोषित-वंचित वस्त्यांतील अत्यंजापर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी हे सगळे प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते.
 
चिपळूणच्या पुढे पोसरा खुर्द या गावावरही दरड कोसळलेली. बौद्धवाडीतले १७ जण आणि मराठावाडीतले ६ जण मृत्युमुखी पडलेले. ग. बौद्धवाडीतील १९ कुटुंबानी ग्रामपचांयतीमध्ये आसरा घेतलेला, तर मराठी कुटुंबांनी एका शाळेत. मात्र, कुणाचे काय आणि कुणाचे काय? इथे काही पुरोगामी निधर्मी मानवातावादी कार्यकर्ते पोहेचलेले. बौद्ध समाजातील लोकांना मदत पोहोचली नाही, कसा जातीयवाद होतो? इथे केवळ वंचित किंवा मुस्लीम राजकीय पक्ष किंवा आंबेडकरी चळवळीचेच लोक बौद्धवाडीतील लोकांना मदत करत होते, असा यांनी धोशा लावला.अशा प्रकारचे व्हिडिओ प्रसारित केले. स्थानिक माणसाला असे बोलण्यासाठी तयार केले. यांना जेव्हा भेटायला गेले. तेव्हा एक माणूस म्हणत होता,”बौद्ध समाजाचा अपमान आम्ही सहन करणार नाही. आम्हाला मुद्दाम मदत केली नाही. कारण आम्ही बौद्ध आहोत. मनुवादी लोक आहेत.” वगैरे वगैरे विशेषणयुक्त त्याचे ओरडणे सुरू होते. त्याला विचारले, बाजूच्या मराठा वाडीतल्या लोकांना मदत पोहोचली का? तर तो गांगरून म्हणाला, नाही. मग त्याला विचारले, त्यांनाही मदत मिळाली नाही आणि इथेही मदत मिळाली नाही. याचाच अर्थ कुणालाच मदत मिळाली नाही. मग इथे बौद्ध समाजालाच मदत मिळाली नाही, असे कसे म्हणू शकतो. तो म्हणाला,”इथे फक्त समाजाचे लोक येऊन मदत करतात.
 
यावर इथल्याच एका माणसाने सांगितले की, “इथे येणाऱ्या प्रत्येक संघटनेचे आम्ही नाव-गाव-संपर्क लिहून घेतो. आजपर्यंत ८९ संस्था इथे आल्या आणि मदत केली आहे.” ते रजिस्टर पाहिले होते. त्यात अनेक समाजाची मंडळ,गणेशोत्सव मंडळ ते अगदी रा. स्व. संघाचे लोकही येऊन गेले आणि मदत केली, हे स्पष्ट होते. त्यातच एक आजी म्हणू लागल्या.” आम्हाला तर सगळ्यांनी मदत केली. पार मराठा वाडीतल्यांनी पण केली. पण ते तरी काय मदत करणार? ज्यावेळी आमच्या घरातले मरत होते. त्यावेळी त्यांच्या घरातलेही मरत होते. गावातल्या सगळ्या वाड्या संकटात होत्या. साधा एक जेसीबी इथे येऊ शकत नव्हता. मग त्यावेळी कोण कशी मदत करेल? पण पूर ओसरल्यावर लांबून लांबून लोक आले मदतीला.” आज्जीचे म्हणणे ऐकून मग काही पुरोगामी मानवतावाद्यांनी तेथून पोबारा केला. इथे बौद्ध विरूद्ध गाव असा आखाडा तयार करावा, अशा प्रयत्नात काही लोक शहराबाहेरून आले होते. यातीलच एक जण म्हणाला, “आमच्या गावची सरपंच वयाने लहान आहे. ती आहे जन्माने बौद्ध, पण लग्न मुसलमानाशी केलं, तर गावातले सगळे म्हणाले, ती नको, कुणी दुसरी महिला सरपंच करूया. पण आम्ही त्यांच्या नाकावर टिचून ‘जय भीम जय भीम’ म्हणत आम्ही तिला सरपंच केले.” त्या सरपंच बाईंना पण भेटले. समाजावर कोसळलेल्या भयानक आपत्तीत त्यांनी काहीतरी करावे, असे बौद्धवाडीतल्या लोकांचे म्हणणे. पण प्राथमिक मदतही येथे पोहोचली नव्हती. या सगळ्या प्रकारात ‘जय भीम जय भीम’ म्हणत आम्ही तिला सरपंच केले, हा शब्द आताही कानावर आदळतोय. पुराच्या आड महाड चिपळूण येथे बऱ्यापैकी राजकारण आणि समाजकारणाचा अंतरंग बदलवण्याचा प्रयत्न होत आहे, हे नक्की. सेवाकार्य किंवा समाजाचे उत्थान हा भाव असणाऱ्या संघटना संस्था इथे रक्ताचं पाणी करून झिजत आहेत. त्याचवेळी आलेल्या परिस्थितीत समाजात दुही कशी माजवता येईल, यासाठीही काही समाजविघातक पुढे सरसावले आहेत. मात्र, असे जरी असले तरी महाड चिपळूणच्या बांधवांच्या या संकटकाळी धावून येणारी छोटी छोटी मंडळ, गावकी, भावकी, संस्था, देवस्थान प्रतिष्ठान आणि मुख्यत: रा. स्व. संघाचे काम पाहिले की वाटते,
 
पथ में शूल हो या फूल
हम निरंतर सेवा पथ लक्ष चलेंगे।
समाज उत्थान के लिये जियेंगे...!
 
मनीषा मंगेश राक्षे... महाड-चिपळूणकरांचे मानवी मूल्य जपणारे प्रातिनिधीक रूप
 
घरात पाणी भरलेले. छपरापर्यंत पसरलेला चिखल ती साफ करत होती. घरात एक भांड का एक कपडाही वाचला नव्हता. तिथे वस्तूंची काय कथा! इतक्यात संघाच्या महाड येथील बुटाला सेवा केंद्रातून संघ परिवाराशी संबंधित काही भगिनी तिथे आल्या. चार-पाच दिवस अंगावर एकच साडी असलेल्या या महिलेला प्रश्न पडला, ‘या कोण?’ आणि का आल्या बरं? तर या भगिनींनी महिलेला साडी आणि काही कपडे दिले, जेणेकरून तिची कपड्याची अडचण दूर होईल. महिला तिच्याशी संवाद साधून केंद्रात परतल्या. तासाभरात तीच महिला दिलेले कपडे घेऊन परत आली. त्या ताई आलेल्या, त्यांना हे परत द्यायचे आहे असे ती म्हणू लागली. केंद्रातल्या लोकांना प्रश्न पडला, ही अंगावर चिखल-पाणी आणि अतिशय थकलेली-भागलेली स्त्री हे कपडे घेऊन परत का आली? तर ती महिला म्हणाली, “तायांनो, दादांनो, मला साडी-कपडे हवेत. पण, साडीच्या घडीच्या आत दोन दागिन्यांनी भरलेल्या डब्या आहेत. त्या पण साड्यांसोबत आल्या आहेत. त्या परत घ्या.” या महिलेचा हा प्रामाणिकपणा सगळ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणून गेला. तिचे या नाव मनीषा राक्षे. तिचे पती मंगेश राक्षे हे कमल पतसंस्थेत शिपाई म्हणून कामाला. विश्व हिंदू परिषदेचे प्रांत गोरक्षा प्रमुख शरद गांगल राक्षे कुटुंबाला भेटले, तर मनीषा प्रणाम करून म्हणाल्या, “यांनी कष्टाने कमावलेले, ज्याची वस्तू त्याच्या ताब्यात दिली. यात काय मोठे?” मनीषा राक्षेंसारख्या भगिनी चिपळूण, महाडमध्ये घरोघरी आहेत.
 
हे मदतीची याचना करणारे कोण?
 
महाडहून चिपळूणला जात असताना रस्त्यारस्त्यावर लोकांचा घोळका उभा दिसला. ‘पाणी द्या, काही तरी खायला द्या’ सांगणारा. मुंबईहून किंवा इतरत्रहून आलेले ट्रक-टेम्पो थांबवून त्यातून ते वस्तू मागून घेत होते. ते स्थानिक तर वाटतच नव्हते. गावातील एक जण म्हणाला “अहो, घरादारातले पुराचे पाणी आणि चिखल काढण्यात वाचलेले कपडे, वस्तू पुन्हा धुवून काढण्यात काही वाचलंय का ते पाहण्यात गावातले लोक 24 तास व्यस्त आहेत. इथे रस्त्यावर उभे राहून येणाऱ्या-जाणाऱ्यांकडून काही मागण्याचा त्यांना वेळही नाही आणि त्यांची वृत्तीही नाही. रा. स्व. संघ तसेच काही सेवाभावी मित्रमंडळ, त्यातही आजूबाजूचे गाववाले, भावकी हे घराघरात जाऊन वस्तू वितरण करत आहेत. त्यामुळे घर सोडून कुणीही बाहेर पडलेले नाही. ते पार वरच्या कड्याला राहणारे वनवासी आहेत. कोणतीही मदत येते, तर वरच्या वस्तीपर्यंत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे वरचे कडेकपारीतील वनवासी लोक खाली आले आहेत. त्यांना पण मदतीची गरज आहे.”
 
झेंडा होता का? बॅनर होता का? नाही ना? आम्हीच काम केले...
 
महाड-चिपळूणमध्ये माझ्यासोबत आंबेडकरी चळवळीत काम करणारी स्मिता कवडे आणि ‘ओबीसी आरक्षण हवेच’ यासाठी काम करणारी मंजू गिते-यादव होत्या. रा. स्व. संघाच्या बुटाला आणि गद्रे हायस्कूल सेवा केंद्रात त्या माझ्यासोबत होत्या. तिथे चालणारे अथक सेवाकार्य त्यांनी पाहिले होते. पुढे निघताना एका छोट्या हॉटेलमध्ये नाश्ता करायला थांबलो. तिथे एकजण फोनवर मोठमोठ्याने सांगत होता, “मदत येते पण अमूक अमूक लोकांना अमूक अमूक वस्तीमध्ये ती मदत मिळत नाही.” (हे अमूक अमूक म्हणजे जातीवाचक नाव तो घेत होता). ’शहर बुडत असताना ‘जय भिम जय मिम’च्या शक्तीने शहराला वाचवले. आम्हीच सगळे सेवा कार्य करतो. फक्त आम्ही बॅनर लावले नाही ना?’ त्यावर माझ्या सोबतच्या मंजू गितेने त्याला सांगितले की, “तू ज्या वस्तींचे नाव घेतलेस तिथे तर संघ स्वयंसेवकांनी सेवाकार्य वस्तू वितरण केलेले मी पाहिले होते.” तर त्याचे म्हणणे ’‘बॅनर होते का? झेंडा होता का? नाही ना? मग आम्हीच होतोे.” त्याचे म्हणणे ऐकून सगळ्या महिला विचारात पडल्या. असेही असते का? संघाने केलेले सेवाकार्य या माणसाने सरळ आपल्या खिशात टाकले? पुढे कळले की तो शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेणाऱ्या एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता होता. ‘वंचित’ म्हणून स्वत:ची ओळख सांगत होता.
 
उघडा डोळे, बघा नीट म्हणावं...
 
शहरातील मुस्लीम वस्त्यांनाही पुराचा तडाखा बसलेला. इथे मुस्लीम संस्थांनी मदतीचा ओघ सुरू केलेला. मात्र, आरोग्य सेवा उपक्रम राबवला तो रा. स्व. संघाने. इथे अभाविपच्या एका कार्यकर्त्याला विचारले, “तुझा अनुभव काय आहे?” त्याने जो अनुभव सांगितला तो लिहावा की लिहू नये? पण, जसे आहे तसे लिहायलाच हवेच, त्यामुळे लिहिते. गोवळकोट या मोठ्या मुस्लीम वस्तीत संघाने दिवसभर आरोग्य शिबिराचे आयोजन केले. वस्तीतील सगळ्यांनीच या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. स्वयंसेवकांनी आपल्या सोबतचे पाणी आणि अन्नही वितरण केले. अशी वेळ आली की त्यांच्याकडचे पाणी संपले. समोरच वस्तीचे प्रार्थनास्थळ होते. तहानेला पर्याय नव्हता. हा तरूण या प्रार्थनास्थळी गेला. तिथे वितरण करण्यासाठी पाण्याचे मोठे मोठे क्रेट ठेवले होते. त्याने पाणी मागितले, तर त्याला उत्तर आले की, “ते आमच्या कोमसाठी आलेले आहे. तुम्हाला पाणी देऊ शकत नाही.” हे सांगताना त्या तरूणाचा चेहरा बरेच काही सांगून जात होता. त्याला विचारले, “मग तिथे अजून सेवाकार्य बाकी आहे. तू करणार की नाहीस?” तर तो म्हणाला, “परिवारातले वरिष्ठ म्हणाले होते तसे आपण आपले उद्दिष्ट सोडायचे नाही. आरोग्य शिबीर आयोजित केले ना, तर ते पूर्ण करायचे.” हे ऐकून काय बोलावे हे मला सुचलेच नाही. मात्र, इतके नक्की वाटते की, पुरोगाम्यांनो, ऐकताय ना? आता तरी उघडा डोळे अन् बघा नीट!!!
 
@@AUTHORINFO_V1@@