नवी दिल्ली : अफगानिस्तानमध्ये तालिबानने संपूर्णपणे कब्जा केला असून याबद्दल जगभरामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने मात्र याला समर्थन करणारे वक्तव्य केले आहे. अनेकवेळा शाहीद आफ्रिदी हा त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो, आता त्याने म्हंटले आहे की, 'यावेळी तालिबान संघटना एक नवा आणि सकारात्मक दृष्टीकोन घेऊन पुढे आली आहे,' असे म्हणत कौतुकास्पद उदगार काढले आहेत. त्याच्या या भूमिकेची सर्वच स्तरांवरून टीका होत आहे.
सध्या शाहीद आफ्रिदीचा एक व्हिडियो सोशल मिडीयावर वायरल होत आहे. यामध्ये तो म्हणतो की, "तालिबानी एक जबरदस्त सकारात्मकता घेऊन आले आहेत. ते महिलांना काम करण्याची परवानगी देत आहेत. राजकारण व इतर नोकऱ्यांमध्ये महिलांना परवानगी देत आहेत. ते क्रिकेटला सर्मथन करतात. मला वाटत त्यांना क्रिकेटदेखील खूप आवडते." यावरून फक्त भारतातूनच नाही तर पाकिस्तानसह जगभरातून या वक्तव्याचा निषेध होत आहे. काहीनी तर त्याला 'तालिबानचा प्रवक्ता' असेदेखील संबोधले आहे. अनेकवेळा त्याने काश्मीरच्या मुद्द्यावरूनही आपले अकलेचे तारे तोडले होते.