‘क्झोकलेंग’ समुदायाच्या जमिनी....

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2021   
Total Views |
BRA_1  H x W: 0
सध्या जगात भरपूर काही सुरू आहे. तालिबान्यांची क्रूरता, चीन आणि पाकिस्तान्यांची लबाड विकृतता. पण, या सगळ्यांच्या सोबतच जगात नरसंहाराचा मुद्दा पुन्हा एकदा इतिहासाच्या पेटार्‍यातून बाहेर येत आहे. तर मुद्दा असा आहे की, जग कितीही पुढे गेले तरी माणूस आपली त्या-त्या भौगोलिक स्तराची आदिमता अजूनही विसरला नाही, तसेच जागतिक स्तरावरचा आपला इतिहासही विसरू शकत नाही. ब्राझिल या दक्षिण अमेरिकेतील देशाबाबतही हेच सत्य आहे.
 
 
ब्राझिलमध्ये कोरोनाकाळात गुन्हेगारी वाढली. याविरोधात ब्राझिलमध्ये पोलिसांनी कारवाईही केली. एका अहवालानुसार २०२० सालच्या शेवटच्या सहा महिन्यांत ब्राझिलमध्ये दररोज १७ जण पोलीस कारवाईमध्ये मृत्युमुखी पडले, तर पोलिसी कारवाईमध्ये गंभीर होणारे हजारो युवकही होते. पोलिसांचे म्हणणे होते की, कायदा सुरक्षेसाठी हे पाऊल उचलावे लागले. मात्र, या पार्श्वभूमीवर सध्या एक वेगळेच वातावरण ब्राझिलमध्ये तयार झाले आहे. ब्राझिलमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी-अभ्यासकांनी निष्कर्ष काढला आहे की, ब्राझिल पोलिसांनी ज्यांच्यावर कारवाई केली, जे मृत्युमुखी पडले, त्यातले ९५ टक्के व्यक्ती या ब्राझिलमधील आदिम जमातीच्या किंवा अश्वेतवर्णीय होत्या. मृत पावलेली मुले १५ ते १७ वर्षांची होती. त्यांनी चांगले ब्रॅण्डेड कपडे किंवा शूज घातलेले होते. परंपरागत पोषाखापेक्षा वेगळे, मूळ प्रवाहात येण्यासाठी हे युवक प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांच्यावर मृत्युमुखी पडण्याची वेळ आली, असेही ब्राझिलमध्ये मतप्रवाह सुरू आहेत. अर्थात, प्रत्येक गोष्ट जात किंवा वर्ण यानुसारच मांडण्याची पद्धत जगात सुरूच आहे. आदिम समाजाचे म्हणून या युवकांना मारलेही नसेल किंवा मारलेही असेल. सत्य तथ्य बाहेर आले नाही. हे केवळ मतप्रवाह आहेत. मात्र, याच अनुषंगाने ब्राझिलमध्ये आता ‘क्झोकलेंग’ या आदिम समाजाने आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी इतिहासाची पानं पुन्हा पालटवली आहेत. त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची पुन्हा जगाला जाणीव करून दिली आहे.
 
 
कारण ब्राझिल सरकारने काढलेला नवा नियम. या नियमानुसार १९८८ सालापूर्वीच्या जमिनीवर आदिम समाज आपला ताबा सांगू शकत नाही. कारण ब्राझिलची राज्यघटनाच १९८८ साली निर्माण झाली. ब्राझिलमध्ये सुमारे नऊ लाख लोक आदिम समाजाचे असून, ते ३०८ विविध गटांत, पोटगटात मोडतात. त्यापैकीच एक ‘क्झोकलेंग’ समाज. हा समाज स्वतःला ब्राझिलचा सर्वात आधीचा रहिवासी मानतो. या समाजातील माणसांची त्वचा साधारण लालसर काळसर. हेच त्यांचे वेगळेपण. बहुतांश समाजाने स्वत:चे राहणीमान बदलण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, तरीही त्वचेच्या विशिष्ट रंगामुळे त्यांना वेगळे समजले जाते. तर अशा ‘क्झोकलेंग’ समाजाने आता ब्राझिलच्या सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्यांनी सांगितले की, आमच्या समुदायाला १९८८ सालच्या जमिनीचा ताबा हा नियम लागू होत नाही. कारण आम्ही इथे हजारो वर्षांपासून राहतो. ‘क्झोकलेंग’ समुदायातील अभ्यासकांनी त्यांचे मत मांडले आहे. ते म्हणतात की, फार वर्षांपूर्वी नाही, तर १९व्या शतकातही आम्ही देशभरात राहायचो. पण, गोरे आले आणि त्यांनी आमचा नरसंहार केला. आम्हाला मारण्यासाठी स्वतंत्र पथके तयार केली. आमच्यावर अत्याचार केला. आम्हाला आमच्या जमिनीवरून पळवून लावले. आम्ही नाही गेलो, तर आम्हाला मारून टाकले. आम्हाला मारून टाकले हा पुरावा हवा म्हणून आमच्या लोकांचा खून केल्यानंतर कान कापून त्याच्या जोड्या हे पथक घेऊन जात. आमच्याच जमिनीवरून आम्हाला क्रूरतेने हाकलून लावले. १९८८ सालापूर्वी ब्राझिल ‘नो मॅन लॅण्ड्स’ होता का? गोरे येण्यापूर्वी इथे कोण राहायचे? आम्ही राहायचो तर ती जागा आमच्या मालकीची का नाही?
 
 
‘क्झोकलेंग’ समुदायाने ब्राझिल सरकारला हा प्रश्न विचारला आहे. त्याचबरोबर ‘क्झोकलेंग’ समुदायाच्या शेकडो लोकांनी १९५० सालापूर्वी ते जिथे राहायचे त्या जागेचा ताबा मिळावा, यासाठी न्यायालयात याचिका केल्या आहेत. या समुदायाने आता संघटित कायदेशीर लढा उभारला आहे. असो. अमेरिकेतील गुलामगिरी कायदेशीररीत्या संपावी, यासाठी सर्वात शेवटी मान्यता देणारा देश ब्राझिल होता. गुलामगिरी प्रथेचे समर्थन या देशात कायदेशीररीत्या आतापर्यंत होते. त्यामुळे ‘क्झोकलेंग’ समुदायाला त्यांचा हक्क मिळेल का? जगाचा भूत आणि वर्तमान दहशतवाद आणि नरसंहाराच्या गर्तेत आहे. त्यातून जग बाहेर पडेल का?
 
 
@@AUTHORINFO_V1@@