माझा स्टॅन स्वामी होऊ देऊ नका - सचिन वाझे

    30-Aug-2021
Total Views |
sachin vaze_1  



मुंबई -
अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनआयएने माजी पोलीस अधिकारी सचिन वाजे आणि सुनील माने यांची कोठडी मागितली होती. मात्र, कोर्टाने ही परवानगी दिली नाही. याउलट न्यायालयाने वाझेला उपाचरासाठी खासगी रुग्णालयात भरती होण्याची परवानगी दिली आहे. यावेळी परवानगी मागताना वाझेने 'माझा स्टॅन स्वामी होऊ देऊ नका', अशी विनवणी न्यायालयाला केली.
 
 
अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान काही महत्त्वाचे पुरावे एनआयएच्या हाती लागलेले आहे. मनसुख हिरेनच्या हत्येमध्येही त्या संशयित आरोपींचा सहभाग असल्याचे पुरावे हाती लागले आहेत. त्यामुळे एनआयएने सचिन वाझे आणि सुनील माने ची कोठडी न्यायालयाकडे मागितली होती.एनआयनेने कोर्टाकडे सचिन वाझेची दोन दिवसांची, तर सुनील मानेच्या चार दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. या गुन्ह्यात ३० दिवस कोठडी मिळते. त्यानुसार सचिन वाझेची २८ दिवस कोठडी झालेली असून २ दिवसाची कोठडी बाकी आहे. तर सुनिल मानेची १४ दिवस कोठडी झालेली आहे. त्यामुळे मानेची चार दिवस कस्टडी मागण्यात आली आहे.
 
 
सोमवारी त्यावर सुनावणी झाली. यावेळी सचिन वाझे आणि सुनील माने या दोघांना ईडी कोठडी देण्यास सत्र न्यायालयाने नकार दिला. दोघांना न्यायलयीन कोठडी असली तरी वाझेला खाजगी सुराणा रुग्णालय या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारांची परवानगी देण्यात आली आहे. १५ दिवसात उपचाराबाबत कागदपत्रे न्यायलयात सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान सचिन वाझेची ओपन हार्ट सर्जरी करण्याची गरज आहे, असा रिपोर्ट जेजे रुग्णालयातर्फे देण्यात आला आहे. वाझेच्या वकिलांनी याआधी न्यायालयाला सांगितले होते की, मागील १४ दिवसांपासून त्याला जेजे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले जात आहे. तिथे त्याला ओपन हार्ट सर्जरी करण्याचा सल्ला मिळाला आहे. याबद्दलची परवानगी मागताना वाझे याने न्यायालयामध्ये 'माझा स्टॅन स्वामी होऊ देऊ नका, मला लवकरात लवकर खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी द्या", अशी विनंती केली.