समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘मेक अ विश...’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Aug-2021   
Total Views |

manse_1  H x W:

मळलेल्या वाटेवरून जातानाही आयुष्याचा स्वसूर्य गवसलेल्या स्मिता पाटील-घैसास त्यांच्या संवेदनशील कर्तृत्वाचा घेतलेला मागोवा...
जिंदगी भर उधार रहे ख्वाईशे
एक ख्वाईश ना पुरी हुई
जगात करोडो लोक आपल्या इच्छा, आकांक्षा, आवडी अक्षरशः मारून जगत असतात. त्यात जर ती व्यक्ती दुर्गम भागातील गरीब घरचे बालक असेल तर? आणि या बालकाला दुर्धर आजार असतील, त्यातच त्याचा अंत लवकरच होणार असेल तर? तर त्या बालकाच्या इच्छा कोण पूर्ण करणार? पण, अशा मृत्यूच्या दारात असलेल्या किंवा दुर्धर आजाराशी परिस्थितीशी लढत असलेल्या ८०० व्यक्तींच्या इच्छा पूर्ण करणारी एक स्नेहमयी ममतामयी मूर्ती आहे. तिचे नाव आहे स्मिता पाटील-घैसास. पुण्याच्या धायरीतल्या स्मिता यांचे आयुष्य म्हणजे संवेदनशीलता माणुसकी आणि संघर्षातून उमललेली सर्जनशीलता होय. ‘मेक अ विश’ या संस्थेशी जोडल्या गेलेल्या स्मिता गांजलेल्या-पिचलेल्या जनतेच्या आशास्थान आहेत.सध्या सरकारी माध्यमातून अनेक शस्त्रक्रिया होत असतात. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून लोक या शस्त्रक्रियेसाठी मुंबई-पुण्यात येत असतात. पण, इथे आल्यावर जगणे सोपे नसते. राहण्याखाण्यापासून ते योग्य माहिती मिळणे गरजेचे असते. आजारी बालकाची शस्त्रक्रिया तर सरकार करेल. पण, त्याला सकस अन्न हवे असते, औषधे हवी असतात, “तू घाबरू नकोस बरं, आम्ही आहोत ना?” असे म्हणणारे मायेचे लोक हवे असतात. या सगळ्यांचा विचार करत स्मितांनी या कामासाठी स्वतःला पूर्णतः झोकून दिले आहे.

 
दुसर्‍यांचे दुःख समजून घेऊन त्या दुःखाला आपले दुःख मानून दूर करणे, ही संवेदनशीलता सगळ्यात असते का? नसतेच. पण, कधी कधी काय असते की, ज्या व्यक्तींनी दुःख सहन केले, प्रश्नांना भेदून स्वत्व निर्माण केले, त्या व्यक्ती दुसर्‍याचे प्रश्न आणि अश्रू समजू शकतात. स्मिताचे वडील विश्वनाथ सावळे आणि विमल या मूळच्या सांगलीच्या. त्यांच्या कन्या स्मिता. लहानपणापासूनच मनस्वी. विश्वनाथ एसटीमध्ये कामाला होते. पण, आर्थिक परिस्थिती यथातथा. या परिस्थितीमध्ये गरिबाच्या लेकीच्या वाटेला जे काही येते, ते सारे स्मिता यांच्याही वाट्याला आलेच. पण, या सगळ्यात विश्वनाथ आणि विमल यांनी मुलांना सत्य आणि कष्टाचे श्रीमंत संस्कार दिले. नेहमी दुसर्‍याला मदत करायला शिकवले. चारचौघींसारखेच स्मिता यांचे आयुष्य होते. पुढे त्यांचा विवाह सदाशिव यांच्यासोबत झाला. सदाशिव यांनी स्मिता यांना स्वाभिमान आणि स्वावलंबन यांचा धडाच दिला. “भाकरीसाठीच नोकरी किंवा व्यवसाय करायचा नसतो, तर स्वत:चे अस्तित्व घडवण्यासाठीही उद्योग-व्यवसाय करावा,” असे सदाशिव यांचे मत. या विचारांनी समन्वय साधत स्मिता यांनी १९९९ साली पुण्याच्या धायरीमध्ये संगणक प्रशिक्षण क्लास सुरू केले. त्यावेळी संगणक क्षेत्र नवीन होते. धायरीचे हे काही शहरीकरण झाले नव्हते. या संगणक क्लासमध्ये शिकण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली. ‘स्मिता कॉम्प्युटर्स’ हे परिसरातील एक महत्त्वाचे केंद्रबिंदू झाले.

असो. या काळात स्मिता आणि सदाशिव यांचा संसार फुलला होता. सागर आणि अमेय अशी दोन अपत्ये त्यांना झाली. सगळे चौकटीतले आयुष्य होते. मात्र, २००३ साली सदाशिव यांचा अपघाताने मृत्यू झाला. स्मिता यांच्यावर आकाशच कोसळले. आपण मध्येच सोडून जाणार म्हणून तर सदाशिव यांनी आपल्याला स्वावलबंनाचे धडे दिले असावेत, असे राहून राहून स्मिता यांना वाटत होते. अशातच कितीही सोंगे केली, तरी पैशाची सोंगे करता येत नाहीत. सदाशिव यांच्या मृत्यूच्या वेळी स्मिता यांचा एक मुलगा महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षी तर दुसरा मुलगा दहावीला होता. त्यांचे उच्चशिक्षण होणे गरजेचे होते. त्यामुळे स्मिता यांनी ठरवले की, ‘स्मिता कॉम्युटर्स’च्या माध्यमातून व्यवसाय वाढवायचा. तिथे मग ‘झेरॉक्स सेंटर’ उभे राहिले, ‘डीटीपी सेंटर’ आणि हो कुरिअर सुविधाही उभी राहिली. हे सगळे सांभाळताना स्मिता यांना उसंत मिळत नसे. कष्टकरी मुंगीसारखे कष्ट! कष्ट!! आणि कष्टच!!! २०-२० तास त्या काम करायच्या. यातूनच पुढे मुलांचे शिक्षण पूर्ण झाले. मुले त्यांच्या नोकरी व्यवसायात स्थिर झाली. मग स्मिता यांनी व्यवसायाला राम राम करण्याचा निर्णय घेतला. परिसरातील घरकाम करणार्‍या महिलांचे प्रश्न त्यांनी हातात घेतले. त्यांचे बचतगट बांधले. शेकडो महिलांना आर्थिक सक्षम केले. या सगळ्या घडामोडीत अनेक जण त्यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन येऊ लागले. महिला, बालक आणि वृद्धांच्या समस्या मोठ्या होत्या. स्मिता यांनी वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमासाठी सेवाकार्य करायला सुरुवात केली. त्यांच्या संपर्कातील प्रत्येकाचा यासाठी खारीचा सहभाग असेल, असा प्रयत्न केला. “वृद्धांना जोडीदार आणि अनाथ बालकांना पालक असणे ही गरज आहे,” असे स्मिता यांचे मत. त्या अनुषंगाने त्यांनी समाजात जागृती व्हावी, यासाठी काम केले. पुढे त्यांनी संदीप घैसास यांच्याशी विवाह केला. या सगळ्या आयुष्यपटात समाजाचे जे प्रश्न समोर येतील ते सोडवायचे, असा त्यांचा निर्धार होता.

कोरोनाकाळात तर समाजाचे सगळेच संदर्भ बदलले. अशा काळात विटभट्टी, ऊसतोड कामगारांच्या जगण्याचे हाल तर न बोललेले बरे. स्मिता आईच्या मायेने या कामगारांच्या प्रश्नांना समजून घेत आहेत. त्यांच्या बालकांचे शिक्षण सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न करत आहेत.स्मिता म्हणतात, “आयुष्यात केवळ माणूस म्हणून दुसर्‍यांच्या जगण्याचा विचार केला तर बरेच काही साध्य होते. समाजातील सज्जनशक्ती समाजातले सर्वच प्रश्न सोडवू शकते.”आयुष्यात अनेक प्रसंग आले. पण, प्रत्येक प्रसंगात सकारात्मकतेने उभ्या राहणार्‍या स्मिता यांच्यासारख्या महिला समाजाला निश्चितच नवा अर्थ प्राप्त करून देतात.








@@AUTHORINFO_V1@@