भारत आणि पश्चिम आशियातील ‘इराणी दुवा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Aug-2021   
Total Views |
 estril_1  H x W 
 
 
पश्चिम आशियाचे क्षेत्र संपूर्ण जागतिक राजकारणासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. प्रामुख्याने पश्चिम आशियामधील देशांशी मजबूत संबंध प्रस्थापित करण्यासाठी भारत गेल्या अनेक दशकांपासून काम करीत आहे. त्यामध्ये आता यश येताना दिसत आहे. साधारणपणे २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून पश्चिम आशियाई देशांकडे विशेष लक्ष देण्यास प्रारंभ करण्यात आला. आजपर्यंत भारताला पश्चिम आशियाई देशांसोबत संबंध वाढविताना इस्रायलकडे दुर्लक्ष करावे लागत होते. मात्र, आता भारताने एकाच वेळी पश्चिम आशियाई देश आणि इस्रायल यांच्यासोबत अतिशय चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत. त्यातच आता अरब राष्ट्रे आणि इस्रायल यांच्यातही मैत्रीचे नवे पर्व सुरू झाल्याने भारताचा मार्ग अधिक सुकर होत आहे.
 
 
इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीच्या नेतृत्वाखालील अरब राष्ट्रांदरम्यान २०२०मध्ये ‘अब्राहम करार’ करण्यात आला आहे. याच कराराचा एक भाग म्हणून भारतीय हवाईदलाची एक तुकडी ऑक्टोबरमध्ये इस्रायलला जाण्याची शक्यता असून तेथे ही तुकडी बहुपक्षीय लष्करी सरावामध्ये भाग घेईल. त्यामुळे ‘अब्राहम करारा’चा भारत नेमका कसा वापर करून घेणार, हे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. भारताचे हवाईदल प्रमुख ‘एअर चीफ मार्शल’ आर. के. एस. भदोरिया यांनी इस्रायलला भेट दिली, त्याच आठवड्यात भारत-‘युएई’ नौदलांदरम्यान ‘झायद तलवार’ या नाविक सरावाचे आयोजन करण्यात आले. अबुधाबीच्या किनारपट्टीवर आयोजित केलेल्या या नाविक सरावाचा उद्देश दोन्ही देशांमधील सहकार्य वाढीस लावणे हा होता. डिसेंबर २०२०मध्ये भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी ‘युएई’ आणि सौदी अरेबियाला भेट दिली. या दोन्ही देशांना भेट देणारे ते पहिलेच भारतीय लष्करप्रमुख होते.
 
 
या भेटीचा पाया २०१७मध्ये ‘युएई’ आणि ओमानला भेट देऊन तत्कालीन भारतीय नौदलाचे प्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लांबा यांनी रचला होता. ओमानमध्ये असलेल्या दुकम पोर्टमध्ये आता भारतीय नौदलाच्या जहाजांना प्रवेश करण्याची तसेच दुरुस्तीतळ वापरण्याची मुभा मिळाली आहे. मस्कत आणि भारतादरम्यान तसा करार झाला आहे. या सगळ्या उदाहरणांमधून हेच दिसते की, संरक्षणविषयक आघाडीवर पश्चिम आशिया क्षेत्र आणि भारत यांच्यादरम्यान वेगाने घडामोडी होत आहेत.
 
 
या करारांमुळे भारतासमोरचा एक मोठा मुत्सद्दी अडथळा दूर झाला आहे. अरब खाडी आणि इस्रायल यांच्यादरम्यान गेली अनेक वर्षे सुरू असलेली भारताची तारेवरची कसरत आता थांबली आहे. इस्रायलने अबुधाबीत दूतावास सुरू केल्यामुळे स्थितिशीलतेत आता बदल होतो आहे. दोन्ही देशांदरम्यान थेट विमानसेवा उपलब्ध झाल्याने गेल्या काही महिन्यांमध्ये व्यापार आणि पर्यटनक्षेत्रालाही चालना मिळाली आहे. या करारांचे भारताने स्वागत केले आहे. या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राखण्याची भारताची भूमिका यातून अधोरेखित झाली आहे.
 
 
भारताच्या पश्चिम आशियामधील रणनीतीमध्ये सर्वात महत्त्वाचा ठरत आहे तो इराणी दुवा. इराणच्या युद्धनौकांनी २०१८मध्ये भारताला भेट दिली. भारताच्या रणनीतीत पर्शियन खाडी, अरबी समुद्र आणि विस्तारित हिंदी महासागर क्षेत्रातील महत्त्वाच्या समुद्री मार्गांची सुरक्षा याला नेहमीच महत्त्वाचे स्थान आहे. त्याचप्रमाणे सध्या अफगाणिस्तानमधील जटील परिस्थितीमध्येही भारत आणि इराण संबंध अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. कंधारमध्ये अडकून पडलेल्या भारतीय दूतावासातल्या कर्मचार्‍यांची सुटका करण्यासाठी भारताने इराणी हवाईहद्दीचा वापर केला, यावरून इराण भारतासाठी किती मोक्याचा आहे हे लक्षात येते.
 
 
त्यामुळेच सध्या चर्चा सुरू असलेले चाबहार बंदर आणि चाबहार-जाहिदान रेल्वेमार्ग हे प्रकल्प खूपच महत्त्वाचे आहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांशी संबंध मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी इराणला अनेकदा भेटी दिल्या आहेत. त्यानंतर इराणचे संरक्षणमंत्री ब्रिगेडिअर जनरल अमीर हातामी यांनीही भारताला भेट दिली. त्यामुळे भारताच्या पश्चिम आशियातील राजकारणासाठी इराणसोबतचे वाढते सहकार्य अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@