ममतांना शह देण्यासाठी राहुल गांधींची ‘ब्रेकफास्ट मिटींग’; विरोधी आघाडीच्या नेतृत्वाचा झगडा ठळक

    03-Aug-2021
Total Views |
raga_1  H x W:

काँग्रेस सहजासहजी नेतृत्व सोडणार नसल्याचे स्पष्ट आहे
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत येऊन विरोधकांचे नेतृत्व करण्याची आकांक्षा दाखवून दिली. त्यानंतर जागे झालेल्या काँग्रेस पक्षाने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विरोधी पक्षांसाठी ‘ब्रेकफास्ट मिटींग’ आयोजित केली. त्यामुळे विरोधी पक्षांचे नेतृत्व काँग्रेस सहजासहजी अन्य पक्षाकडे देणार नसल्याचा हा स्पष्ट संकेत आहे.
 
 
काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्यातर्फे विरोधी पक्षांना ‘ब्रेकफास्ट मिटींग’चे निमंत्रण देण्यात आले होते. संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रफी मार्गावरील ‘कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया’मध्ये १४ पक्षांचे नेते न्याहारीसाठी आणि मोदी सरकारविरोधात एकजुट दाखविण्यासाठी जमले होते. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, डाव्या पक्षांसह अन्यांचा समावेश होता. या बैठकीत मोदी सरकारविरोधात इंधन दरवाढीसह अन्य विषयांवर एकजुट दाखविण्याचे ठरविण्यात आले.
 
 
 काँग्रेसच्या या बैठकीते टायमिंग बघितल्यास त्यातून काँग्रेसच्या पुढील धोरणाविषयी समजू शकते. प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी या गेल्या आठवड्यात दिल्ली दौऱ्यावर आल्या होत्या. आपल्या दौऱ्यात त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याचे स्पष्ट संकेत दिले. काँग्रेससह अन्य पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांनी “आपणच कसे मोदी विरोधासाठी पुढाकार घेत आहोत”, असेही दाखविण्याचा प्रयत्न केला. पुढे आता दर दोन महिन्यांनी आपण दिल्लीत येत राहणार असल्याचे सांगून प्रसारमाध्यमांचे लक्षही वेधून घेतले. ममता दिल्लीत असतानाच संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळ घालण्यातही तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी पुढाकार घेतला. एकूणच, काहीही करून “ममता बॅनर्जी याच विरोधी आघाडीच्या नेत्या होण्यास लायक आहेत”; असा संदेश देण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला.
 
 
या सर्व घडामोडींमुळे अद्यापही विरोधी पक्षांचे नेतृत्व केवळ आपल्याकडेच आहे, असे समजणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाचे कान टवकारले केले. पक्षांतर्गतदेखील गांधी कुटुंबाशिवाय नवे नेतृत्व उभे न करण्याचे धोरण असलेल्या काँग्रेस पक्षाने विरोधी आघाडीचे नेतृत्व प्रादेशिक नेत्याकडे देणे शक्य नाही. त्यामुळेच एरवी केवळ ट्विट करण्यापुरते सक्रिय असणाऱ्या राहुल गांधी यांनी “आपण अद्यापही मोदींना आव्हान देऊ शकतो”, हे दाखविण्यासाठी ब्रेकफास्ट मिटींगचा फंडा शोधून काढला. मात्र, अशा प्रकारच्या बैठकींमुळे प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेण्याशिवाय फार काही साध्य होण्याची शक्यता धूसर आहे. कारण, बैठकीत सहभागी पक्षांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी हे राहुल गांधी यांच्या नेतृत्वास मान्यता देण्याची शक्यता नाही. अन्य पक्षांची उपयुक्तता आणि उपद्रवमूल्य हे अगदीच किरकोळ आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमामुळे विरोधी आघाडीच्या नेतृत्वाचा झगडा पुढील काळात अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 
 
gandhi_1  H x W
 
३०१ विरूद्ध ११६
 
 
ब्रेकफास्ट मिटींगमध्ये १४ पक्ष सहभागी झाले होते. त्यामध्ये त्यामध्ये काँग्रेस (५२ खासदार), राष्ट्रवादी काँग्रेस (५), शिवसेना (१८), राजद (०), समाजवादी पार्टी (५), माकप (३), भाकप (२), इंडियन युनियन मुस्लिम लीग (३), रिव्होल्यूशनरी सोशालिस्ट पार्टी (१), केरळ काँग्रेस – एम (१), झारखंड मुक्ती मोर्चा (१), नॅशनल कॉन्फरन्स (३), तृणमूल काँग्रेस (२२), लोकतांत्रिक जनता दल (0) या १४ पक्षांनी सहभाग घेतला. विरोधी ऐक्यासाठी ही बैठक होती, त्यामुळे भाजप विरोधात हे १४ पक्ष असे आकडेवारीनुसार बघितल्यास भाजपचे ३०१ खासदार आणि या १४ पक्षांचे मिळून फक्त ११६ खासदार; अशी स्थिती आहे. त्यातही ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांसह अनेक नेते आपली भूमिका बदलू शकतात. त्यामुळे या बैठकीतून नेमके काय साध्य झाले, हा प्रश्न अनुत्तरीतच राहणार आहे.