‘मनीषा’ वैज्ञानिक जागृतीची...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2021   
Total Views |

Manisha Choudhary_1 
 
 
वैज्ञानिक जागृतीसाठी अविरत कार्यरत असणार्‍या नाशिक येथील मनीषा चौधरी यांच्या कार्याविषयी...
 
भारतीय वैज्ञानिक क्षेत्रातील सर्वात आदराचे नाव म्हणजे डॉ. एपीजे अब्दुल कलाम. कलाम यांनी पाहिलेले स्वप्न आणि त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात विशेषत: शालेय मुलांत रुजविणे नक्कीच आवश्यक आहे. ही वैज्ञानिक जागृती व्हावी, यासाठी नाशिक येथे वास्तव्यास असणार्‍या मनीषा चौधरी या निष्ठेने प्रयत्नरत आहेत. ‘राज्यशास्त्र’ विषयात पदवीधर असलेल्या चौधरी यांनी सामाजिक कार्यात विज्ञानधिष्ठ भूमिका घेत आपले कार्य सुरू ठेवले आहे.
 
 
 
सुमारे साडेतीन वर्षांपासून ‘डॉ. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन’चे कार्य महाराष्ट्रात सुरू आहे. त्याचे ‘महाराष्ट्र राज्य समन्वयक’ म्हणून चौधरी या दायित्व सांभाळत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून चौधरी या शिक्षण, पर्यावरण, महिला सशक्तीकरण क्षेत्रात सामाजिक कार्य करत आहेत. तसेच, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे ‘व्हिजन २०२०’ आणि आता ‘बियाँड व्हिजन २०२०’ नुसार डॉ. कलाम यांच्या स्वप्नातील सामर्थ्यवान, समृद्ध भारत घडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. चौधरी यांना शालेय जीवनापासून डॉ. कलाम यांचे विचार प्रेरित करत होते. चौधरी यांचे गुरू मिलिंद चौधरी यांच्या प्रेरणेने या संस्थेसोबत त्यांनी सामाजिक क्षेत्रात पदार्पण केले.
 
 
 
संस्थेच्या माध्यमातून जगातील सर्वात कमी वजनाचे १०० उपग्रह एक हजार विद्यार्थ्यांकडून बनवून यशस्वीरीत्या त्यांचे प्रक्षेपण रामेश्वर येथून करण्यात आले. या माध्यमातून जागतिक स्तरावरील अनेक विक्रम विद्यार्थ्यांनी स्थापित केले आहे. त्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असून ३७९ विद्यार्थी आणि ३८ उपग्रहांचा यामध्ये समावेश होता. ‘इनोव्हेशन बाय यंग माईंड्स’ या प्रकल्पावर आता महाराष्ट्रात कार्य सुरू असून, बालवैज्ञानिकांना घडविण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रात मराठी आणि इंग्रजी भाषेतून राबविण्यात येत आहे. शालेय शिक्षणाव्यतिरिक्त मुलांमध्ये असलेल्या अनेक कलागुणांचा विकास होण्यासाठी आणि सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध शाळांमध्ये वक्तृत्व, चित्रकला, मिसाईल मॉडेल्स, निबंध, रांगोळी अशा विविध स्पर्धांचे आयोजन चौधरी व संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत असते.
 
 
 
मुलांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण होऊन त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून विविध ठिकाणी आयोजित प्रदर्शनात ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन’तर्फे परीक्षक म्हणूनही चौधरी यांनी काम केले आहे. मुलांमध्ये वाचनाची आवड वृद्धिंगत होण्यासाठी ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम वाचन कट्ट्या’ची चार शाळांमध्ये चौधरी व संस्था यांच्या माध्यमातून स्थापना करण्यात आली आहे. तसेच विविध संस्थांचे महिला सशक्तीकरण उपक्रमात सक्रिय सहकार्य आणि मार्गदर्शन, महिलांसाठी ‘ऑनलाईन वेबिनार’चे आयोजनदेखील चौधरी यांनी केले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी ‘सायन्स मॉडेल्स’च्या माध्यमातून प्रशिक्षण, ‘रोबोटिक्स’चे प्रशिक्षण यावर चौधरी यांनी विशेष भर दिला आहे.
 
 
 
कोरोनाकाळात विद्यार्थी शाळांपासून दूर गेल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमावर आधारित विज्ञानाच्या मॉडेल्सद्वारे कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करीत विविध सोसायटींमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची कार्यशाळादेखील चौधरी यांनी आयोजित केली होती. पर्यावरण रक्षणकामी नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत १८ वृक्षारोपणाचे कार्यक्रम शाळा आणि इतर सामाजिक संस्थांसोबत चौधरी यांनी आयोजित केले. ‘कोविड-१९’साठी ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन’तर्फे ‘होम मास्क मेकिंग मिशन’, ‘मिशन करुणा’ आणि ‘मिशन देवदूत’ यशस्वीपणे राबविण्यातही चौधरी यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
 
 
प्रत्येक क्षेत्रात आता विज्ञान आणि तंत्रज्ञान वापरले जात आहे. त्यामुळे भविष्यात अनन्यसाधारण महत्त्व विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रास प्राप्त झाले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान आत्मसात केल्याशिवाय उज्ज्वल भविष्य नसल्याचे चौधरी सांगतात. “यासाठी देशात संशोधनाचा पाया सर्वच क्षेत्रांत भक्कम करणे गरजेचे आहे. महासत्ता बनण्यासाठी भावी पिढीला योग्य दिशा आजच द्यावी लागेल. आपल्याला भारतीय बनावटीच्या प्रत्येक वस्तूला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. प्रत्येक भारतीयाने, मी फक्त ‘मेड इन इंडिया’ वस्तूंनाच प्राधान्य देईन!, याचा चंग बांधणे आवश्यक आहे,” असे मत त्या व्यक्त करतात.
 
 
 
डॉ. कलाम शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थ्यांसोबत बोलत होते आणि सामर्थ्यवान भारताचे जबाबदार नागरिक घडविण्याचे कार्य करीत होते, ते कार्य संस्थेच्या माध्यमातून सुरू ठेवले असून आपला खारीचा का होईना वाटा आपण देशाला देत असल्याची भावना चौधरी बोलून दाखवतात. आज महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक तालुक्यात समन्वयक आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात दहा हजारांपेक्षा अधिक कलाम अनुयायांचे जाळे पसरले असून, डॉ. कलाम यांच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वजण आपापल्या परीने हातभार लावत असल्याचे समाधान असल्याचे चौधरी आवर्जून नमूद करतात. डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे खर्‍या अर्थाने भारताचे रत्न होते. किंबहुना, आजही आहेच. त्यांचे कार्य हे केवळ त्यांच्या विचारांचा जागर करून पुढे नेणे एवढ्यापुरते मर्यादित न ठेवता, त्यांच्या कार्याप्रमाणे इतरांनीदेखील कार्य करावे, यासाठी चौधरी कार्य करत आहेत. वैज्ञानिक जागृतीची आस मनाशी बाळगत सुरू असलेल्या या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@