लेखिका मंगला खाडिलकर यांनी उलगडले दिवंगत मनोहर पर्रिकर
ठाणे : विस्मृतीत न गेलेला,धगधगता चैतन्यदायी माणसातला माणुस आणि राज्यकर्त्यातील समृद्ध माणुस म्हणजे दिवंगत मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रिकर उर्फ मनोहरभाई होय. अशा हृद्य आठवणी लेखिका मंगला खाडीलकर यांनी जागवत पर्रीकर यांच्या जीवनपटावर आधारीत 'एक मनोहर कथा' या पुस्तकाचे रविवारी ठाण्यात तिसऱ्यांदा लोकार्पण केले. खाडिलकरांनी उलगडलेले पर्रिकर ऐकुन माध्यम प्रायोजक असलेल्या दै.मुंबई तरुण भारतच्या महा एमटीबी वरील दर्शकांसह उपस्थित श्रोत्यांमध्येही हाऊ इज द जोश संचारला.
नवचैतन्य प्रकाशन आणि वीर सेनानी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ठाण्यातील ब्राह्मण सेवा संघ सभागृह येथे कोविड नियमांचे पालन करीत पार पडलेल्या या लोकार्पण सोहळ्याला भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष आ.निरंजन डावखरे,आ.संजय केळकर,ऍड. बाळ देसाई (सेक्रेटरी जनरल, फिन्स), नवचैतन्यचे शरद मराठे, वीर सेनानी फाऊंडेशनचे कार्यवाह स्वराधीश गायक डॉ. भरत बलवल्ली आदी उपस्थित होते.यावेळी पुस्तकाच्या लेखिका मंगला खाडिलकर यांनी पर्रीकर यांचा जीवनपट उलगडला.२००६ पासुन पुस्तकाच्या निर्मितीसाठी केलेल्या घटनांच्या आठवणींचा आलेख त्यांनी मांडला.अंशाअंशाने मिळवलेला 'मनोहर' नावाचा भन्नाट माणूस आठवणींच्या कवडशातून मांडत त्यांनी गोवाच नव्हे तर भारताच्या कानाकोपन्यात पोहचलेले पर्रिकर या पुस्तकात गूण दोषांसह मांडल्याचे सांगितले.
विरोधी नेता ते सुपरमॅन मुख्यमंत्री ते पूढे देशाचे सक्षम संरक्षण मंत्री या प्रवासातील पैलु उलगडताना खाडीलकर यानी, एकदा परदेशी राजकारण्याने पर्रिकराना फोन करून " भविष्यातील पंतप्रधानांशी बोलतोय का ? अशा व्यक्त केलेल्या भावनाही कथन केल्या. तसेच कुसुमाग्रजांच्या 'नट' या कवितेतील 'नटा'प्रमाणे त्यांची कारकिर्द असल्याचे सांगितले.प्रारंभी गायक भरत बलवल्ली यांनी इंग्रजीत संवाद साधताना पर्रिकरांच्या गोव्यापासुन ते थेट सीमेवरील आठवणीना उजाळा दिला. तर ध्वनी-चित्रफितीच्या माध्यामातून शुभसंदेश देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्तीमत्व, कतृत्व आणि नेतृत्व यांचा आदर्श परिपाक असलेले हे पर्रिकरांचे जीवनचरित्र तरुण पिढीसाठी मार्गदर्शक असल्याचे म्हटले. राज्यसभा खासदार सुरेश प्रभू यांनी, गोव्यासारख्या छोट्याशा राज्यातुन देशात ठसा उमटवणाऱ्या पर्रिकर यांच्यावरील पुस्तक येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे सांगितले.
आमदार संजय केळकर यांनी, मनोहर पर्रिकर यांच्या सहवासातील गोव्यातील निवडणुकीच्या आठवणी जागवुन बेदाग राजकारणी म्हणजे पर्रिकर अशा स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. आमदार डावखरे यांनीही 'एक मनोहर कथा' हे पुस्तक दीपस्तंभासारखे असुन साऱ्यांना दिशादर्शक ठरणारे असल्याचे म्हटले.या कार्यक्रमाचे प्रास्तविक शरद मराठे यांनी आणि सुत्रसंचालन प्रा.अमेय महाजन यांनी तर डॉ. अमेय देसाई यानी आभार प्रदर्शन केले.