‘ईडी’ पिडा टळो!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2021   
Total Views |

parab _1  H x W






‘ईडी’ पिडा टळो!
आला आला फेरा,
साहेब, ‘ईडी’चा हा फेरा
कसं वाचू, काय सांगू,
सुचेना आम्हाला,
साहेब, सुचेना आम्हाला...

(चाल : आला आला वारा, संगे पावसाच्या धारा)
या चालीवर ‘ईडी’च्या फेर्‍याचे गाणे म्हणून मनातल्या मनात म्हणून म्हणून आम्ही थकून गेलो आहोत. आमच्या कोकणात मेली ‘ईडा पिडा टळो’ म्हणून नजर काढतात. पण, आता ‘ईडा पिडा’ पेक्षा ‘ईडी’ पिडा टळो म्हणून नजर काढण्याची वेळ आली आहे. आम्ही तर आम्ही, आमच्या सगळ्यांच्या आयकॉन ममतादीदी. त्यांना पण या ‘ईडी’चा राग राग येतो. त्यांच्याकडेही ‘ईडी’चा फेरा सुरू आहे. कारण त्यांची सत्ता इथे नाही ना? आम्हाला मुद्दाम त्रास देतात असं आम्ही आणि दीदी सारखं सारखं म्हणालो तरी आम्हाला माहिती आहे, असे म्हणण्याव्यतिरिक्त आमच्या तरी हातात काय आहे? बरं आठवले, या सगळ्या ‘ईडी’च्या रगाड्यात आम्ही आणि ते घड्याळवाले ‘ईडी’च्या रडारवर आहेत. पण, हातवाले त्यांच्या कक्षेत तसे येताना दिसत नाहीत. काय गोलमाल आहे? सरकार तर तिघांचे. वाटणी नव्हे, वाटणी शब्द चुकीचा आहे. पण, कामाची विभागणी तिघांची आहे. मग ‘ईडी’ची वारी आमच्याच द्वारी का? आता आम्ही म्हणतोय, आमच्यावर सूड उगवतात, तर त्यांच्याकडे पुरावे असणार. त्याशिवाय का सगळे त्यांना थरथर कापतात. याबाबतीत सगळ्यात अनुभवी ज्येष्ठ आमचे नाशिकचे मंत्रीसाहेब आहेत. तुरुंगात गेले. तिथून छातीत कळ घेऊन बाहेर आले ते आता मंत्री बनून बाहेरच आहेत. त्यांना विचारून ठेवले पाहिजे, ‘ईडी’ काय असते, त्यांचे काम कसे असते? म्हणजे तयारी करून ठेवायला बरे. नारायण राणे तर आता पलीकडे त्यांच्यासोबत. गेल्या आठवड्यात आम्ही इंगाच दाखवणार होतो, तर त्यांनी कायद्याच्या गोष्टी केल्या. आम्ही तर त्याही करू शकत नाही. कारण ‘ईडी’चा फेरा असा तसा येत नाही, हे महाराष्ट्रातल्या कानाकोपर्‍यातल्या लहान पोराला माहिती आहे. काय करावे? आला आला फेरा, साहेब, ‘ईडी’चा फेरा...

काय होणार महाराष्ट्राचे?

नुकतीच बातमी उठवली गेली की, केरळमार्गे तिसरी लाट येणार. आता महाराष्ट्र, केरळ आणि अनेक राज्ये आहेत. पण, या राज्यांना डावलून कोरोनाची भीती आहे ती केवळ महाराष्ट्राला. का? उत्तर सोप्पे आहे. महाराष्ट्रातला कोरोना हा महाराष्ट्रातल्या राजकीय अस्थिरतेवर विसंबला आहे. राज्य सरकारच्या मंत्र्यांचे घोटाळेबाज कारनामे उघड व्हायला लागले की, महाराष्ट्रात कोरोना वाढला समजा. कधी-कधी वाटते की, महाराष्ट्रातला कोरोना हा महाराष्ट्रातल्या अस्थिर राजकारणाचे अपत्य आहे. लोकांना बांधून ठेवायचे? मग आहेच कोरोनाची भीती. महाराष्ट्रातल्या जनतेची स्थिती काय आहे? कशी आहे? काही सोयरसुतक नाही. ‘लॉकडाऊन’चा बडगा कायम आहे. पहिला डोस आणि दुसरा डोस यातच बिचार्‍या महाराष्ट्रीय माणसाचे जगणे अडकवून ठेवले आहे. ‘कोव्हिशिल्ड’ ८४ दिवस तर ‘कोव्हॅक्सिन’ २८ दिवस हे हिशोब मोजताना सामान्य मुंबईकर हवालदिल झाला आहे. ट्रेनचा पास कसा मिळणार म्हणून चाकरमान्यांच्या डोळ्याची झोप उडून गेली. तर मुंबईच्या आधुनिक उद्योगातील महत्त्वाचे अंग म्हणजे मॉल. त्या मॉलवर हजारो कुटुंबांची गुजराण होते. त्या मॉल, थिएटरबद्दल नियम सातत्याने बदलतेच. त्या मॉलमध्ये काम करणारे ते हजारो अल्पशिक्षित मुले-मुली सध्या काय करत असतील? शाळा आणि मंदिर यांचा प्रश्न तर प्रलंबितच आहे. वनवासी क्षेत्रात शैक्षणिकदृष्ट्या महाराष्ट्र किती योजने मागे गेला याची नोंद कुणी केली का? ‘ईडी’ची भीती वाटते, सत्ता जाईल याची भीती वाटते. पण, ज्या महाराष्ट्राने राज्याच्या सत्ताधार्‍यांना काळजापेक्षाही जास्त जपले होते. त्या महाराष्ट्राचे काळीज आता फाटले आहे. कारण, महाराष्ट्रात येण्यासाठी देशभरातले लोक आतूर असायचे. पण, आता लोक आणि उद्योगधंदे महाराष्ट्रातून जाण्यासाठी आतूर आहेत. महाराष्ट्राच्या या परिस्थितीबाबत नन्नाचे पाढे तरी किती वाचायचे. काय होणार लाडक्या महाराष्ट्राचे? एक मात्र नक्की. कोरोनाच्या लाटेवर लाटा आणा. पण, महाराष्ट्राला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केलात, तरी महाराष्ट्र उद्या तुम्हाला डावलून पुढे जाणारच जाणार.


9594969638
@@AUTHORINFO_V1@@