चिनी चाळे आणि आपला ईशान्य कोपरा

    28-Aug-2021
Total Views | 178

map_1  H x W: 0

इतकेच नाही तर प्रत्येक घर-कुटुंबाने टेहळणी बुरुजाप्रमाणे कारवाई करावी, अशी अपेक्षा कम्युनिस्ट पार्टीने या रहिवाशांकडे व्यक्त केली आहे. म्हणजे इथले रहिवासी गणवेश न घातलेलेही सीमेवर पेट्रोलिंग करणारे सैनिक असावेत, असे प्रयोग चीन करीत आहे. या गावकर्‍यांनी सैन्याच्या विविध कवायती, उपक्रम आणि कामांमध्येही सहभागी व्हावे, कोणी तिबेटी नागरिक भारतात पळून जात असेल तर त्याला पकडून द्यावे, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. आपल्या सीमांचे रक्षण करणे, किती निकडीचे आणि कठीण काम आहे, हे या माहितीवरून आपल्या लक्षात येईल.


चीनमध्ये अमर्याद सत्ता अंदाधुंदपणे चालवणारी आणि चिनी जनतेला, तिबेट, हाँगकाँग इत्यादी स्वतंत्र भूभागांना आपल्या ताब्यात घेऊन त्यावर वेटोळे घालून बसलेली ‘चायनीज कम्युनिस्ट पार्टी’ कशाप्रकारे विस्तारवादी दृष्टिकोनातून आपल्या आकाराने आणि हेतूने राक्षसी असणार्‍या योजना जगभरात राबवित असते हे आता मोठ्या प्रमाणात भारतीय समाजासमोर येऊ लागले आहेच.भारतालाही चीनच्या विस्तारवादी धोरणाचे आव्हान येत्या काळात मोठ्या हिकमतीने परतवावे लागणार आहे. भारत आणि चीनने कब्जा केलेला तिबेट यांची जवळजवळ ८५० किमी इतकी लांबच लांब सीमा एकमेकांना मिळते. ब्रिटिशांनी तिबेटसोबत केलेल्या ‘मॅकमॅहॉन’ करारानुसार ही सीमा ठरलेली आहे. पुढे सिक्कीम करारानुसार त्यात बदल झाले. त्यामुळे नेपाळ आणि भूतान सोडता बाकी सर्व भूभागात आपली सामायिक सीमारेषा आहे.
गेल्या वर्षी लडाखमधील पँगॉन्ग त्सो जलाशयावर झालेला दुर्दैवी भारत-चिनी सैनिकांचा आमनासामना असो, त्याआधी झालेला सिक्कीममधील डोकलाम येथील स्टॅण्ड ऑफ असो किंवा १९६२ साली अरुणाचल, आसाममध्ये चिनी सैन्याने घुसून केलेले युद्ध असो, चीन सतत आपल्या सीमांना आव्हान देत आला आहे. अरुणाचलमधल्या गावांना चिनी भाषेतली नवे देणे, अरुणाचली, नागा जनजाती मूळच्या चिनी जनजाती आहेत, असे सतत उगाळत राहणे, भारतीय नेता, सैन्य अधिकार्‍याच्या या भूभागातील भेटींचा निषेध व्यक्त करीत राहणे, असले आचरट प्रकार बीजिंग नेहमीच करीत असते.
तिबेट परिसरात भारताच्या सीमारेषेला लागून चीन मोठमोठे प्रकल्प राबवत आहे अशा बातम्या आपल्या कानावर गेल्या काही वर्षांपासून येत आहेत. भूतान-तिबेट सीमेवरील काही गावे, नेपाळ-तिबेट सीमेवरील काही प्रदेश, गावे चीनने आपल्या ताब्यात घेऊन गिळंकृत केलेलीच आहेत. या सगळ्याची सुरुवात ९० च्या दशकात झाली. त्यासाठी त्यांनी तिबेटियन धनगरांना भूतानी कुरणांत आपले पशुधन चरावयास नेण्यासाठी उद्युक्त केले. पारंपरिक भूतानी धनगर निषेध नोंदवू लागल्यावर तिबेट-भूतान राज्यांमध्ये कित्येक शतकांपूर्वी कुरणांसंदर्भात काही करार झाले होते, काही जुन्या पावत्या होत्या, ती कागदपत्रे दाखवून ते त्या जमिनीवर हक्क सांगू लागले. सैन्य बळाचा वापर करून ते ती माळराने वापरू लागले. सुरुवातीच्या काळात याच तिबेटी धनगरांना सीमाभागांत जायला चायनीज कम्युनिस्ट पार्टीने खूप विरोध केला होता. वर ज्या धनगरांना मुद्दामून इथे आणून वसवले आहे, त्यांना सीमावर्ती भागाचे एजंट असल्याप्रमाणे काम करावे लागते. जाणकारांच्या मते अशाप्रकारे ढापलेला भूभाग भूतानला परत देऊन त्याच्या बदल्यात सिक्कीमजवळचा मोक्याचा प्रदेश आपल्या ताब्यात घेण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे.असो.तर अशीच चोरगिरी नेपाळच्या बाबतीतही त्यांनी केली. नेपाळच्या सरकारलाच चीनच्या कनवटीस बांधल्यावर विरोध करणार तरी कोण? भारताचा लडाखमधला अक्साई चीनचा प्रांतही चीनने चुपचाप घशात घातला आहे. त्यांची नजर सिक्कीम, चिकन नेक म्हणून प्रसिद्ध असणारा सिलिगुडी पट्टा यावर तर गेली कित्येक दशके आहे. ईशान्य भारतात अस्थिरता निर्माण करून तिथे आपले झेंडे रोवण्याचा प्रयत्नही गेली कित्येक दशके चालू आहेच.
प्रचंड लोकसंख्येमुळे मनुष्यबळाची कमतरता चीनला नाही. याचाच गैरफायदा घेत चीन आता तिबेट सीमेत विविध बांधकामे करून तिथे आपल्या वसाहती निर्माण करत आहे. गेल्या आठवड्यात तिबेटमध्ये ‘शांततापूर्ण स्वातंत्र्ययुद्धाचा सत्तरावा स्मरणदिन’ साजरा करण्यात आला. त्यासाठी ज्या ‘सीसीपी’ने तिबेटला पारतंत्र्यात ढकलले आहे, त्याच पार्टीचे अध्यक्ष शी जिनपिंग या कार्यक्रमासाठी म्हणून दक्षिण तिबेटच्या दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी तिबेट सीमेचे चीनला फार महत्त्व आहे; वगैरे बोलून तिबेटी लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला. त्याचसोबत इथली ठाणी अजून मजबूत कशी करता येतील, त्याची पाहणी केली. तिथे चालू असलेल्या कामांचा आढावा घेतला. त्यानी अरुणाचलच्या उत्तरेला असणार्‍या ‘न्यिन्गची’ या शहराचाही दौरा केला. हे शहर आता चिनी शहरांशी महामार्गाने जोडले गेले आहे. याच वर्षी त्या महामार्गाचे काम पुरे झाले आहे. या रस्त्याच्या बांधकामामुळे अरुणाचल सीमेपर्यंत पोहोचणे चिनी सैन्य आणि युद्धसामग्रीसाठी आता फारच सुलभ झाले आहे. तिबेट सीमेवर चिनी सैन्याची २१ मुख्य ठाणी आहेत. त्यासाठी त्यांनी प्रचंड पैसा ओतला आहे. यावरूनच बीजिंग कोणत्या प्रकारची तयारी करतो आहे, याचा अंदाज सामान्य माणसालाही येऊ शकेल.
गेल्या काही काळात तिबेटी सीमेवरची लोकसंख्या दहा टक्क्यांनी वाढल्याचे लक्षात आलेले आहे. चीन या सगळ्या भागांत कायमस्वरूपी गावे वसवित आहे. तिबेटी समाजाला आपल्या सोयीप्रमाणे इथे आणून बसवत आहे. इथे प्रचंड प्रमाणात रस्तेबांधणी चालू आहे. वीजप्रकल्प, पार्टीची प्रचंड अशी व्यवस्थापन कार्यालये, आपत्कालीन व्यवस्थापन गोदामे, मिलिटरी ठाणी, सॅटेलाईट स्टेशन अशी अनेक बांधकामे अरुणाचलच्याच नाही तर सगळ्याच सीमेवर चीन करत आहे. २०१७ पासून जवळजवळ ६०० गावांची निर्मिती चीनने केली आहेत अशी माहिती समोर येऊ लागली आहे. इतकेच नाही तर प्रत्येक घर-कुटुंबाने टेहळणी बुरुजाप्रमाणे कारवाई करावी, अशी अपेक्षा कम्युनिस्ट पार्टीने या रहिवाशांकडे व्यक्त केली आहे. म्हणजे इथले रहिवासी गणवेश न घातलेलेही सीमेवर पेट्रोलिंग करणारे सैनिक असावेत, असे प्रयोग चीन करीत आहे. या गावकर्‍यांनी सैन्याच्या विविध कवायती, उपक्रम आणि कामांमध्येही सहभागी व्हावे, कोणी तिबेटी नागरिक भारतात पळून जात असेल तर त्याला पकडून द्यावे, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. आपल्या सीमांचे रक्षण करणे, किती निकडीचे आणि कठीण काम आहे, हे या माहितीवरून आपल्या लक्षात येईल.
 
या संदर्भातील एक घटना आठवते. २०१९ सालच्या ऑक्टोबरमध्ये माझा अरुणाचलचा प्रवास होता. त्यावेळी उत्तर अरुणाचलातील एका शहरातून मला दुसर्‍या शहरात जायचे होते. पावसाळा संपतच आला होता. परंतु, ज्या नदीच्या किनार्‍यावरून माझा प्रवास होता त्या नदीलाच अचानक मोठा पूर आला आणि ते पाणी साधे पाणी नव्हते. तर प्रचंड चिखल गाळ असलेले असे ते पाणी होते. नदीच्या पात्रातून मोठमोठे ओंडके वाहत जाताना दिसत होते. जणूकाही उत्तरेच्या भागात काही मोठा भूकंप किंवा स्फोट होऊन नदीला असे चिखलपाणी येते आहे काय, असे वाटावे अशी परिस्थिती होती. महाडमध्ये यावर्षी आलेल्या पुराच्या वेळी ही घटना मला आठवली. महाड परिसरात मोठ्या प्रमाणात चालू असणार्‍या रस्ता रुंदी प्रकल्पांमुळे या वेळी पूरपाण्याबरोबर चिखलही आला, असे अनेकांचे म्हणणे होते. तसाच प्रकार अरुणाचलात त्या दिवशी झाला असावा, असे मत अनेक जाणकार व्यक्त करत होते. चीन जे प्रकल्प राबवित आहे त्याचे भौगोलिक दुष्परिणाम ईशान्य भारताला भोगावे लागतील, अशी यथार्थ भीती अनेक लोक बोलून दाखवू लागले आहेत.
- अमिता आपटे


 
 
 
 
 
 
 

 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121