
भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी या वर्षीचा राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष म्हणावा लागेल. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिवस दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी ‘टोकयो ऑलिम्पिक’मधल्या भारताच्या उल्लेखनीय कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
भारताच्या पुरुष हॉकी संघाने ‘ऑलिम्पिक’ स्पर्धांमध्ये तब्बल ४१ वर्षांनी केलेली पदकाची कमाई आणि महिला हॉकी संघाने केलेली अतिशय अभिमानास्पद कामगिरी हे मेजर ध्यानचंद यांना त्यांच्या जन्मदिनी सार्थ अभिवादन ठरणार आहे. तर इतर खेळांमध्ये भारताने केलेली आगेकूच आणि ‘अॅथलेटिक्स’मध्ये नीरज चोप्राने घडवलेला सोनेरी इतिहास यामुळे तर या दिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भारतीय क्रीडाक्षेत्रातल्या घडामोडींकडे लक्ष वेधले जाणार आहे.भारताने यंदा ‘ऑलिम्पिक’मध्ये आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा केली आणि पदक संख्येत वाढ केली. एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदके अशी कामगिरी भारतीय क्रीडाप्रेमींना सुखावणारी असली, तरी भारताच्या क्षमतेचा विचार करता ती समाधानकारक नसल्याचा काहींचा आक्षेपही विचारात घेतला पाहिजे. भारताच्या ‘ऑलिम्पिक’मधल्या सहभागाला तब्बल १०० वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे आणि या काळात भारताची एकूण पदकसंख्या केवळ ३५ वर पोहोचली आहे. त्यामुळे याबाबतही काही वर्गात नाराजीचा सूर उमटत असतो. पण, यावर्षी ‘ऑलिम्पिक’मध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवलेल्या पदकांचा विचार करतानाच, इतर खेळांमध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत दिसून आलेला आश्वासक बदल आणि त्यामागची कारणे यांचाही विचार आवश्यक आहे.
या ‘ऑलिम्पिक’ स्पर्धांमध्ये भारोत्तोलन, मुष्टीयुद्ध, कुस्ती, बॅडमिंटन, हॉकी, भालाफेक या क्रीडाप्रकारात पदकांची कमाई केली. त्यापैकी भालाफेक म्हणजे ‘ट्रॅक अॅण्ड फिल्ड’ या क्रीडाप्रकारांचा भाग असलेल्या प्रकारात भारताने थेट सोनेरी पदार्पण केलं. तर इतर क्रीडा प्रकारात भारताने यापूर्वी खातं उघडलं होतच. पण, असे अनेक क्रीडा प्रकार आहेत, ज्यामध्ये भारताने पदकांची कमाई केली नसली तरी त्यामध्ये भारतीय खेळाडूंनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटवून यापुढच्या काळातल्या आश्वासक वाटचालींचे संकेत दिले आहेत. काही क्रीडा प्रकारात तर कोणतीही अपेक्षा नसताना भारतीय खेळाडूंनी आश्चर्यकारक कामगिरी केली आणि त्यांचं ‘ऑलिम्पिक’ पदक अगदी थोडक्यात हुकलं. ‘गोल्फ’मध्ये अदिती अशोक, महिला हॉकी संघ, कुस्तिपटू दीपक पुनिया यांच्यासह इतर काही प्रकारातही खेळाडूंनी केलेली कामगिरी आश्चर्यकारक होती. यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे भारतामध्ये क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात होत असलेला बदल आणि त्यामध्ये गेल्या काही वर्षांत होत असलेल्या सुधारणा.
‘ऑलिम्पिक’मध्ये पदक मिळवण्याचं स्वप्न जे खेळाडू पाहतात आणि ते पूर्ण करतात त्यांची पदकापर्यंतची वाटचाल म्हणजे एक तपश्चर्या असते. केवळ असामान्य गुणवत्ता असून भागत नाही. त्याच्या जोडीला अनेक वर्षांचं खडतर प्रशिक्षण, तज्ज्ञ प्रशिक्षकांचं मार्गदर्शन, योग्य प्रकारचा आहार, विविध प्रकारच्या कौशल्यांची प्राप्ती, तीव्र स्पर्धेचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेलं मानसिक सामर्थ्य अशा अनेक गोष्टी ‘ऑलिम्पिक’ विजेतेपदाशी संबंधित असतात. या सर्वांचा समन्वय ज्यांना साधता येतो, तेच देश ‘ऑलिम्पिक’विजेते घडवत असतात. ही बाब आपल्या देशात विविध राज्यकर्त्यांनी लक्षात घेतली आणि त्यासाठी प्रयत्नदेखील केले. पण, त्यामध्ये सातत्य नव्हतं, असं म्हणावं लागेल. पण, हे सातत्य गेल्या काही वर्षांत प्रकर्षानं जाणवत आहे. ‘रियो ऑलिम्पिक’पूर्वीच केंद्र सरकारनं म्हणजे सध्या सत्तेत असलेल्या मोदी सरकारनं आपल्या पहिल्या कार्यकाळात ‘ऑलिम्पिक’मध्ये भारताची कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. टॉप्स म्हणजे ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्किम’ ही योजना २०१४ मध्ये सुरू करण्यात आली. त्यामध्ये गुणवत्ता असलेल्या खेळाडूंची निवड करणे, त्यांना योग्य प्रकारच्या सोयीसुविधा पुरवणे, प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, अशा अनेक बाबींचा समावेश होता. ‘रियो ऑलिम्पिक’मध्ये आणि ‘पॅरालिम्पिक’मध्ये त्याचा परतावादेखील मिळाला. मात्र, पदकसंख्येत वाढ होऊ शकली नव्हती. 2018मध्ये या योजनेमध्ये आणखी काही बदल करण्यात आले. एकीकडे या योजनेच्या माध्यमातून खेळाडूंना घडवले जात होते. तर दुसरीकडे देशात क्रीडा संस्कृती निर्माण करण्यासाठी, खेळांची आवड निर्माण करण्यासाठी आणि नवे खेळाडू तयार करण्यासाठी सरकारने गांभीर्याने प्रयत्न सुरू केले. २०१८मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा’ म्हणजे यापुढच्या काळात तयार होणार्या खेळाडूंना घडवणारा एक मंच म्हणावा लागेल. या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून योग्य वयात क्रीडा गुणवत्ता हेरता येणार आहे आणि ‘ऑलिम्पिक’ स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करण्याच्या दृष्टीनं त्यांना घडवणं शक्य होणार आहे.
या स्पर्धांमध्येही त्यांची उपयुक्तता लक्षात घेऊन आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत, तर गेल्या तीन वर्षांत या स्पर्धांमध्ये सहभागी होणार्या खेळाडूंची संख्या सातत्यानं वाढत आहे. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची कामगिरी उत्तम राहिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या स्पर्धांच्या निमित्तानं खेळाडूंना राष्ट्रीय आणि अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वातावरणात आपल्या क्षमतेचं आकलन होत आहे आणि आपल्या गुणवत्तेचं प्रदर्शन करता येऊ लागलं आहे. या स्पर्धांबरोबरच ‘खेलो इंडिया’ केंद्रांची स्थापना देशात करण्यात आली आहे. देशभरातल्या या केंद्रांची संख्या ३६० वरून एक हजारपर्यंत वाढवण्याचं पंतप्रधानांचं उद्दिष्ट आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून देशी खेळांचं पुनरुज्जीवन करण्याचे आणि या खेळांनाही लोकप्रिय करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन आणि केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या प्रयत्नांनी आयोजित होणार्या या क्रीडा स्पर्धा आगामी काळात निश्चितच अपेक्षित परिणाम साध्य करू शकतील.
देशात क्रीडासंस्कृती रुजवण्यासाठी असे प्रयत्न आवश्यक होतेच; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाशी संबंधित इतर क्षेत्रांप्रमाणेच क्रीडा क्षेत्रालाही महत्त्व दिल्यामुळे या प्रयत्नांमध्ये सातत्य दिसू लागलं आहे. खेळ आणि खेळाडू यांच्याविषयी पंतप्रधानांच्या मनात विशेष आपुलकीची भावना आहे. त्यांच्या याच भावनेमुळे मोदी यांनी सत्तेवर येताच क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि त्यात सातत्य राखलं. खेळाडूंना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा मिळत आहेत, विशेष मार्गदर्शनासाठी परदेशी प्रशिक्षकांची सोय, परदेशी वातावरणाचा अनुभव देणार्या उपक्रमांमध्ये सहभाग, क्रीडाविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता याकडे ते सातत्यानं लक्ष ठेवून होते. खेळाडूंना या सुविधा पुरवण्याबरोबरच ‘ऑलिम्पिक’साठी पात्र ठरलेल्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी वेळोवेळी केलं. एकीकडे या खेळाडूंमध्ये ते देशासाठी किती महत्त्वाचे आहेत ही भावना त्यांनी जागृत केली. त्याचवेळी खेळ खेळताना त्यामध्ये संपूर्णपणे झोकून देत असताना, अपेक्षांचे ओझे बाळगू नका, त्याचा दबाव घेऊ नका हेदेखील पंतप्रधानांनी सांगितल्यामुळे आपल्या खेळाडूंचा उत्साह नक्कीच वाढला असेल. ‘ऑलिम्पिक’पूर्वी झालेल्या या संवादाच्या वेळी पंतप्रधानांनी केवळ खेळाडूंशीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांशीही संवाद साधला होता. त्यामुळे एक वेगळंच खेळीमेळीचं वातावरण निर्माण झालं होतं. केवळ खेळाविषयीच नव्हे तर खेळाडूंच्या वैयक्तिक आवडीनिवडीविषयीही पंतप्रधानांनी विचारपूस केल्यामुळे खेळाडूंच्या मनावरील ताण हलका होण्यास मदत झाली.
‘ऑलिम्पिक’मध्ये पदक मिळवताना खेळाडूची गुणवत्ता, त्याने घेतलेले खडतर प्रशिक्षण, त्याला मिळणारे विशेष मार्गदर्शन, सोयीसुविधा यांचं योगदान तर असतंच; पण त्याचबरोबर ‘ऑलिम्पिक’ पदक म्हणजे एक ध्येय, एक उद्दिष्ट मानून, हे पदक मिळवून आपल्या देशाचा सन्मान उंचावण्याची एक जिद्द ज्या खेळाडूंमध्ये असते, त्याच खेळाडूंना हे पदक प्राप्त होत असतं. पदक जिंकण्यासाठी ते ज्या प्रकारे खेळतात ती भावना त्यांच्यात निर्माण झाल्यावर ‘ऑलिम्पिक’ क्रीडांगणामध्ये त्यांचा प्रतिस्पर्धी खेळाडू किंवा संघाची जागतिक क्रमवारी, त्यांचा पूर्वीचा इतिहास गौण ठरतो आणि आपल्या देशाचा सन्मान वाढवण्याची भावना त्या खेळाडूंना वेगळी ऊर्जा देते. टेनिस खेळाडू लिएंडर पेसने ‘अटलांटा ऑलिम्पिक’मध्ये त्याच्या मनगटाला झालेली दुखापत विसरून याच भावनेने खेळ करून कांस्य पदक पटकावलं होतं. ती आठवण सांगताना अजूनही त्याचे डोळे पाणावतात. भारतीय खेळाडूंमध्ये ही भावना निर्माण करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असल्याचं दिसत आहे. खेळाडूंविषयीची त्यांची आपुलकी आणि त्यांना दिलं जाणारं महत्त्व याबद्दल महान भारतीय क्रिकेटपटूंपैकी एक असलेले कपिल देव यांनीदेखील अलीकडेच पंतप्रधानांचे आभार मानले होते.
पंतप्रधानांच्या अपेक्षेनुसार क्रीडा क्षेत्रामध्ये बदल घडवून आणण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने केलेले प्रयत्नदेखील महत्त्वाचे आहेत. किरेन रिजिजू यांनी २०१९ मध्ये क्रीडा मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यावर या प्रयत्नांना आणखी गती दिली. वेळोवेळी विविध प्रकारच्या उपक्रमांचा आणि खेळाडूंच्या तयारीचा आढावा घेण्याचे काम रिजिजू यांनी केले. विशेष कामगिरी करणार्या खेळाडूंना विशेष पुरस्कार विशेषतः रोख रकमेच्या स्वरूपात पुरस्कार देऊन आणि पुरस्कारांच्या रकमांमध्ये वाढ करून खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. ‘फिट इंडिया’ हा उपक्रम लोकप्रिय करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.
या सर्वांमध्ये आणखी एक बाब लक्षात घ्यावी लागेल आणि ती म्हणजे संपूर्ण जगामध्ये ‘कोविड’सारख्या आपत्तीचा फैलाव झाला असताना, आपल्या खेळाडूंच्या सरावावर, त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती असताना, या परिस्थितीतही भारताच्या क्रीडा मंत्रालयाने तातडीने पावले उचलून खेळाडूंच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होणार नाही, त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध होईल, त्या वातावरणात त्यांना सराव करता येईल याची पुरेपूर काळजी घेतली. परदेशात ‘कोविड’ प्रतिबंधक लसी उपलब्ध झाल्यावर तिथे प्रशिक्षण घेत असलेल्या भारतीय खेळाडूंना लसी उपलब्ध व्हाव्यात, यासाठीदेखील प्रयत्न करण्यात आले. काही देशांमध्ये तर फक्त त्यांच्याच नागरिकांना लसी देण्याचा नियम असूनही केवळ भारताच्या विनंतीवरून आपल्या खेळाडूंसाठी नियम शिथिल करून लस देण्यात आली. जगाच्या नकाशावर जे देश प्रगत आहेत त्यांची क्रीडाक्षेत्रातली प्रगतीदेखील इतर क्षेत्रांमधील प्रगतीशी सुसंगत आहे. विविध क्षेत्रांमध्ये भारताची आगेकूच सुरू असताना क्रीडाक्षेत्रामध्येही मोठी झेप घेण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू झाली आहे. जागतिक महासत्ता बनण्याचं स्वप्न साकार करताना भारतानं क्रीडाक्षेत्रातही महासत्ता बनावं, असं अनेकांना वाटत असेल. अर्थात, त्यासाठी खूप मोठी मजल मारावी लागेल. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांना एक योग्य दिशा मिळाली आहे आणि क्रीडाक्षेत्राकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल झाला आहे. या पोषक वातावरणामुळे या पुढच्या काळात क्रीडाक्षेत्रदेखील आपली कारकिर्द घडवण्याचे क्षेत्र ठरू शकते आणि निरोगी आणि बलशाली देश घडवण्यामध्ये क्रीडाक्षेत्र मोठं योगदान देऊ शकते ही भावना वाढीला लागेल, अशी अपेक्षा आहे.
- शैलेश पाटील