अनुवांशिकता आणि खेळांतील यश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2021
Total Views |

india_1  H x W:
गेल्या दोन दशकांत खेळातील कामगिरी अधिकाधिक कशी उंचावेल, यावर खूप अभ्यास होत आहे. अशाच काही संशोधनांच्या साहाय्याने आपण असे बोलू शकतो की, क्रीडाक्षेत्रातील यश हे बर्‍याच गोष्टींवर अवलंबून असते. खेळाच्या सर्वांबरोबर अनुवांशिकता, संस्कृती, मानसिकता, शारीरिक सामर्थ्य या सर्व गोष्टी उत्तम कामगिरीसाठी महत्त्वाच्या असतात.

अनुवांशिकतेचे म्हटले तर बरेच लेख असे सांगतात की, ‘एसीई’ आणि-CTN3 ‘एसीटीएन3’ नावाची जनुके वेग, क्षमता, सहनशक्ती यांसारख्या गुणांसाठी कारणीभूत असतात. या तिन्ही गोष्टी खेळात उत्तम कामगिरी करण्यासाठी फार महत्त्वाच्या असतात. त्यामुळे हे सर्वश्रेष्ठ खेळाला पूरकच आहेत. या विषयातील रुची हळूहळू वाढत आहे. जरी अनुवांशिकतेचा अभ्यास अजूनही बाल्यावस्थेत असला तरी या क्षेत्राने जगभरातील बर्‍याच खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे आणि क्रीडा संशोधकांचे लक्ष वेधले आहे.
आपण नेहमी एखाद्या दिग्गज खेळाडूकडे बघून असे बोलतो की, यात अधिक काहीतरी आहे. तो थोडा अधिक भाग जो सर्वश्रेष्ठ खेळाडू बनवतो तो हा अनुवांशिकतेचा असावा. युसेन बोल्ट आणि मायकेल फेल्प्स यांना काय फक्त उत्तम प्रशिक्षक आणि उत्तम सुविधा मिळाल्या म्हणून ते दिग्गज झाले की, त्यांच्यात काही उपजत गुण होते?पण, खेळात सर्व श्रेय अनुवांशिकतेला देणे म्हणजे मेहनत, सराव, जिद्द, चिकाटी या सर्वांना डावलल्यासारखे होते आणि तसे करणे योग्यदेखील ठरणार नाही.
भारतात प्रदेश बदलला की, क्रीडा प्रकार बदलतो. हॉकी म्हटले की, बहुतांशी खेळाडू हे पंजाबचे दिसून येतात. रेसलिंग म्हटले की, हरयाणाचे खेळाडू जास्त दिसतात. त्या त्या प्रदेशात खेळाची ती एक संस्कृतीच बनली आहे. त्यामुळे घरातील पाठबळापासून ते सुविधांपर्यंत सर्वच उपलब्ध होते. एखाद्या प्रदेशातील हवामान, जीवनशैली आणि मनोरंजनाचे साधन यानुसार तेथील लोकांच्या अनुवांशिकतेवर परिणाम होतो आणि अनुवांशिक योजना घडली जाते. अशा जीवन प्रणालीमुळे जनुकांचे संक्रमण प्रत्येक पिढीत होते आणि मग एखाद्या खेळावर त्या प्रदेशाचे वर्चस्व दिसून येते. उदाहरणार्थ, हॉकीच्या संघात पंजाबचे खेळाडू जास्त दिसतात. पंजाबचे वातावरण, तेथील आहार हा हॉकीसारख्या जास्त शारीरिक हालचाल करणार्‍या खेळासाठी पूरक आहे. खेळात लागणारी आक्रमकतादेखील त्यांच्या स्वभावात दिसून येते. त्यामुळे तो प्रदेश हॉकीचे केंद्र बनला.
असेदेखील जाणवून येते की, सध्या ग्रामीण भागातील खेळाडू जास्त छान प्रदर्शन करत आहेत. यामागेदेखील अनुवांशिकता, संस्कृती आणि मानसिकता याचा वाटा आहे. त्यांना लहानपणापासूनच मेहनत करणे उपजत आलेले असते. ग्रामीण भागातून पुढे येऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यामागे इतर अनेक करणे आहेत, जसे की, ग्रामीण भागात व्यवसायाच्या फार संधी उपलब्ध नसल्यामुळे सर्व लक्ष खेळावर केंद्रित केले जाते. सरकारच्या विविध योजनांमुळे नोकरीच्या संधीही उपलब्ध होतात. या कारणांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना सुविधा कमी मिळाल्या तरीही ते स्वजिद्दीच्या बळावर उत्तम कामगिरी करून दाखवतात.शेवटी अनुवांशिकता, राहण्याचे ठिकाण, सरकारच्या योजना हे सारे साहाय्यक आहे. या सर्वाचा योग्य वापर करून मेहनत आणि चिकाटी जो करेल, तोच सर्वश्रेष्ठ बनू शकेल.
 
- विदुला डेबर आणि डॉ. जानकी राजापुरकर देवळे


 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@