गणपतीत कोकणात जाताय? वाचा काय आहे नियमावली...

राज्याबाहेरून येणाऱ्यांवर निर्बंध कोण घालणार?

    26-Aug-2021
Total Views |

Uddhav Thackerry _1 



ठाणे : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांच्या मार्गात राज्य सरकारने अटींचा अडथळा उभारल्याने गणेशभक्तांच्या मार्गात विघ्न आले आहे. कोरोना ‘आरटीपीसीआर’ चाचणी अहवाल किंवा दोन लस घेतल्याचे प्रमाणपत्र बाळगण्याच्या अटीबद्दल ‘कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघा’कडून बुधवार, दि. २५ ऑगस्ट रोजी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांनी तीन महिन्यांपूर्वी आरक्षण केले असून, त्यावेळी अशा अटी-शर्थी जाहीर केल्या नाहीत आणि ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर अटी घातल्याने चाकरमान्यांच्या मार्गात अडथळा आला आहे. तेव्हा प्रवाशांची धावपळ थांबवण्यासाठी सरकारने अटी शिथिल करण्याची मागणी ‘कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघा’ने बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनाचे सावट असले, तरी गणेशोत्सव म्हणजे कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी विशेष सोहळा असतो. या पार्श्वभूमीवर, कोकणात जाण्यासाठी कोकणवासीय उत्सुक आहेत. गेल्यावर्षी कोरोनामुळे जाता आले नाही. त्यामुळे यंदा दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर अनेकांनी रेल्वेच्या उपलब्ध तिकिटांची आरक्षणे करून प्रवास निश्चित केला. गणेशोत्सवाच्या काळापर्यंत सर्व नियम शिथिल होऊन पुन्हा गावी जाता येणे शक्य होणार असल्याच्या आनंदात असलेल्या कोकणवासीयांना आता अटी-शर्थीनुसार ‘आरटीपीसीआर’ चाचणी प्रमाणपत्र किंवा लसीकरणाचे दोन डोस झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
त्यामुळे कोकणवासीयांच्या आनंदावर पुन्हा विरजण पडले आहे. सध्या बर्‍यापैकी कोरोना नियंत्रणात आहे. तेव्हा, यंदा तरी अटी-नियमांमध्ये शिथिलता देऊन कोकणचा प्रवास सुरळीत करण्याची मागणी ‘कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघा’चे पदाधिकारी राजू कांबळे, सुजित लोंढे आणि दर्शन कासले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यामध्ये ‘आरटीपीसीआर’ आणि दोन लसींची सक्ती वगळण्यात यावी. विलगीकरणाची सक्ती करण्यात येऊ नये, असे निवेदनात म्हटले असून मुख्यमंत्री कार्यालयाने हे निवेदन मदत व पुनर्वसन खात्याकडे पाठवल्याचे प्रत्युत्तर दिले आहे.