वैदिक परंपरा आणि साधना (भाग-८)

    26-Aug-2021
Total Views |

kundalini 2_1  
 
‘कुंडलिनी’ जागृतीसाठी पद्मासनाशिवाय उपयुक्त अशी अजून दोन आसने आहेत.
महामुद्रा
उजवा पाय थोडा तिरपा करून समोर ठेवावा. डाव पाय उजव्या जांघेवर अंतर्भागावर अशा प्रकारे ठेवावा की, टाच मूलाधारावर जोराने दाबली जाईल व पाऊल उजव्या जांघेवर चिकटून राहील. दोन्ही हात समांतर उचलावेत आणि दोन्ही हातांची बोटे उजव्या पायाच्या अंगठ्याला भिडवावीत. यात प्रगती झाल्यावर साधकाने हळूहळू आपले मस्तक उजव्या गुडघ्यावर टेकवून श्वास मंदगती करून त्याच अवस्थेमध्ये अधिकाधिक वेळ बसावे. त्याचप्रमाणे डाव्या पायावरही महामुद्रा करावी. महामुद्रेचा याप्रमाणे अभ्यास केल्यास पद्मासनाहून कमी वेळेत ‘कुंडलिनी’ जागृत होते.
सिद्धासन
हे आसन सर्वात कठीण असून सामान्य साधकाला जमणे कठीण आहे. प्रथम डाव्या पायाची मांडी अशा प्रकारे घालावी की, टाच बरोबर मूलाधाराच्या खाली येईल. म्हणजेच डाव्या टाचेच्या टोकावर (घोट्यावर) संपूर्ण शरीराचा तोल राहील. नंतर उजव्या पायाची मांडी घालून उजवी टाच नाभीवर व बोटे डाव्या जांघेत राहतील, अशी ठेवावीत. छाती आणि मेरुपृष्ठ सरळ ठेवावे. दोन्ही खांदे वर ओढून घ्यावेत व हनुवटी छातीकडे दाबण्याचा प्रयत्न करावा. उजवा हात डाव्या हातावर घेऊन मांडीवर ठेवावा. हे सिद्धासन असून यात सर्व शरीर डाव्या टाचेच्या टोकावर तोलले जाते. दृष्टी नासिकाग्रावर स्थिर करावी व त्याचबरोबर गुद वर व पोट आतल्या बाजूस ओढावे. गुदाच्या वर ओढण्याला ‘मूलबंध’ आणि पोटाच्या ओढण्याच्या क्रियेला ‘उड्डीयानबंध’ असे म्हणतात. अशा प्रकारे सिद्धासन दररोज प्रात:समयी सहा महिन्यांपर्यंत केल्यास मूलाधारस्थित ‘कुंडलिनी’ आपले स्थान सोडून उर्ध्वगामी होते आणि वरच्या सहा योग योगचक्रातून आपला मार्ग आक्रमण करून शेवटी सहास्त्रारात प्रवेश करून स्थिर होते. कुंडलिनीचे सहस्त्रारात स्थिर होणे हीच समाधी अवस्था आहे. या आसनाकरिता योग्य गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक आहे.
कुंडलिनी जागृतीचे अनुभव
कुंडलिनी जागृत झाल्याबरोबर काही विशिष्ट प्रकारचे अनुभव येतात. प्रथम चित्त एकाग्र होऊन मन शांत बनते. आहार, निद्रा, भय, मैथुनादी वासनांची तीव्रता कमी होते. शरीर हलकेफुलके होते व त्याची जाणीवही होते. कानात एक प्रकारचा निनाद गुंजतो आणि डोळ्यात विशिष्ट प्रकारचे तेज येते. मधून-मधून डोळ्यासमोर काजव्यासारखा किंवा बॅटरीच्या झोतासारखा प्रकाश चमकतो व लगेच नाहीसा होतो. काही वेळा चांगला सुगंध जाणवतो. परंतु, त्याचा उगम कुठेच आढळून येत नाही. काही दिवसांनंतर शरीरात उष्णतेचा असह्य भडका जाणवतो, पण उष्णता मापकाने तपासल्यास तापमानात वाढ झालेली दिसून येत नाही. ही उष्णता किंवा दाह असा होतो आणि कोणत्याही प्रकारच्या औषधाने कमी होत नाही. संत मीराबाईने या दाहाचे वर्णन केले आहे. ‘राणाने भेजा विषका प्याला। पीबत मीरा हासी रे ॥’ रामकृष्ण परमहंस दाह सहन न होऊन अनेक तास नदीत जाऊन बसत असत. शरीर रुक्ष व शुष्क बनते. इतके की, संपूर्ण कृश होऊन त्वचेवर कोरड्या मृत पेशींचा थर बनतो. उष्णता किंवा दाह असह्य होतो. जीवाची फार घाबरट अवस्था होते. असे वाटते की, कोणत्याही क्षणी प्राण निघून जाईल. ओकारीची भावना होते. परंतु, उलटी किंवा शौचास होत नाही. अशी असह्य अवस्था प्राप्त होणे हे ‘कुंडलिनी’ जागृत होण्याचा समय जवळ येण्याचे लक्षण आहे, हे लक्षात ठेवावे. या जीवघेण्या अवस्थेतही साधकाने घाबरून जाता नये, तर आपल्या साधनेवर दृढ राहावे. म्हणजे एके दिवशी कुंडलिनी वेटोळे सोडून ऊर्ध्वगामी बनेल व षट्चक्रांचे भेदन करेल.

 
‘कुंडलिनी’ उर्ध्वगामी बनताच शरीराचा दाह, दुर्बलता, शुष्कता नाहीशी व्हायला लागते व साधकाला एक प्रकारच्या दिव्य शांतीचा अनुभव येतो. त्याच्या शरीरावर मांस आणि मुखावर व छातीवर तेजस्वी कांती येते. वाणीत माधुर्य, बुद्धीमध्ये गहन ग्रहणशक्ती येते. या अवस्थेत मूर्खही ज्ञान सांगावयास लागतो, कविता करतो, तसेच वक्ताही बनतो. म्हणूनच सर्व संत उत्तम कवी होतात. हा ‘ओजस् तत्त्वा’चा प्रादुर्भाव व परिणाम आहे. काही साधकांच्या शरीरावर दिव्य सुगंध यायला लागतो. अशा उच्च कोटीच्या साधकाला आता गंधर्व म्हणता येईल. या अवस्थेत कुरूप चेहरेसुद्धा सुरूप होतात आणि मुखकमलावर लाली चढते. आपण पाहतोच की, सर्व संत हे सुस्वरुपच दाखविले जातात.
 
 
सर्पदर्शन
 
 
अशा उन्नत अवस्थेला पोहोचलेल्या साधकाला आणखी एक विलक्षण अनुभव येतो. त्याला स्वप्नात व जागृत अवस्थेमध्ये अनेक वेळा सर्पदर्शन घडते. पण, त्याला साधकाने घाबरून जाऊ नये. कारण, हे सर्पदर्शन म्हणजे साधकाच्या मनाची जागृत ‘कुंडलिनी’मुळे झालेली जागृत अवस्थाच आहे. प्रत्यक्ष घटना किंवा वास्तविक अवस्था नाही. ही एक मध्य अवस्था असल्यामुळे साधकाने भयभीत होऊ नये. ‘कुंडलिनी’ची ऊर्ध्वगती एखाद्या सर्पासारखी असते. साधकाचे मन या दिव्य अवस्थेमध्ये अधिक कार्यशील राहते म्हणून त्याला प्रत्यक्ष ‘सर्पानुभूती’ मिळते. ‘सर्पानुभूती’ हा भ्रम नसून विधायक मनाची (Creative Minds) एक प्रखर अवस्था आहे. याच विधायक अवस्थेतून पुढे गेल्यावर साकार पिंडी साधकाला आपल्या इष्ट देवतेच्या एखाद्या अवयवाचे दर्शन किंवा पूर्ण दर्शन होऊ शकते. साधकाने लक्षात ठेवावे की, सर्पदर्शन ही दर्शनाची सुरुवात आहे.
 
भगवान शिव आणि सर्पदर्शन
सर्पदर्शनानंतर ‘आप तत्त्वा’चे दर्शन होऊ लागते. साधकाला प्रथम आपल्या चारही बाजूंना अत्यंत शुभ्र प्रकाशाच्या ठिणग्या किंवा दाट शुभ्र प्रकाश झोत दिसू लागेल. काही साधक आपल्या मस्तकात चंद्रमा पाहू लागतील. काही साधकांना आजकालच्या काळात ज्यांच्यापासून शीतल शुभ्र प्रकाश मिळतो, असे मर्क्युरी लाईट किंवा ट्यूब लाईट दिसतील. असा शुभ्र शीतल प्रकाश साधकांना दिव्य स्पर्श, दिव्य रुची, दिव्य गंध, दिव्य नाद आणि दिव्य भाषण यासारखे अनुभवसुद्धा देऊ शकेल. हे ‘निराकार पिंडी’ साधकाचे अनुभव असतील. परंतु, ‘साकार पिंडी’ साधकाचे मन अधिक भावनाप्रधान व विधायक असल्यामुळे तो या सजीव शुभ्रतेतून काही आकार निर्माण करून भगवान शिवाचे दिव्यदर्शन करेल. 99 टक्के साधक ‘साकार पिंडी’च असतात. ‘आप तत्त्वा’चा गुण रस असे मानलेले आहे. इथे ‘रस’ या शब्दाचा आशय जिव्हेद्वारे मिळणारे रसग्रहण नाही. ‘तेजस तत्त्वा’मुळे प्रकाशात ज्या लहरी उत्पन्न होतात आणि अशा सतत स्फुरणांचा संस्कार जो वस्तुरूपाने आपण ग्रहण करतो त्याला ‘आप तत्त्वा’चा गुण रस म्हणतात. (क्रमशः)
 
- योगिराज हरकरे