कलासक्त ‘सारथी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2021   
Total Views |

manse 2_1  H x
अंगभूत कलेची जोपासना करून थेट बड्या म्युझिक कंपनीला दखल घ्यायला लावणारे ठाण्यातील एका राजकीय नेत्याचे कलासक्त सारथी राजू नामदेव केंगार यांच्याविषयी...
नववीपर्यंत शिकलेला ठाण्यात राहणारा राजू नामदेव केंगार हा पेशाने चालक असून ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या खासगी वाहनाचे सारथ्य करतो. नेते मंडळींचे वाहन चालक म्हटले की, नेत्यासाठी तासन्तास राबणे ओघाने आलेच! त्यामुळे चालक तसे नेहमीच ताणतणावात असतात. रस्त्यावरील कोंडीचा सामना करीत निर्धारित वेळेत खुष्कीच्या मार्गाने का होईना, आपल्या नेत्याला गंतव्य स्थानावर सुरक्षितरीत्या पोहोचवणे एवढेच चालकाचे काम. मात्र, राजू उत्तम सारथी तर आहेच! पण, लोककलेचाही उपासक असल्याने त्याच्या लेखणीतून काव्य आणि गानसमृद्धी बहरत आहे.बालपणी वडिलांच्या भजन-गायनाने त्याच्यातील कलाकार जागा झाला आणि त्यानेही एकीकडे सारथ्याची जबाबदारी पार पाडून आपली कवी, गीतकार व गायन कला जोपासली आहे. राजूचे काव्य आणि गानसमृद्धी फारशी प्रचलित व नावाजलेली नसली, तरी त्यांच्या लोकगीतांची दखल एका बड्या म्युझिक कंपनीने घेतल्याने राजूची कला म्हणजे लोकसंस्कृतीचा परिपाठ ठरली आहे. राजूने रचलेली काही प्रचार गीते निवडणुकीत नशीब आजमावणार्‍या अनेक उमेदवारांसाठी उपयुक्त ठरल्याचे तो आवर्जून सांगतो.

सांगली जिल्ह्यातील, आटपाडी तालुक्यातील दिघनची या गावी दि. ४ जून, १९८८ रोजी जन्मलेल्या राजूचे बालपण सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील जांभुळणी गावी तसे हलाखीतच गेले. गावी जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवल्यानंतर माध्यमिक शिक्षणाची कास धरली. पण, गरीब परिस्थितीमुळे जेमतेम नवव्या इयत्तेपर्यंत कशीबशी मजल मारून पोटाची खळगी भरण्यासाठी राजूने मुंबई, ठाण्याची वाट धरली. ठाणे शहरात वागळे इस्टेट भागात एका परिचिताकडे आश्रय घेतला. वय लहान असल्याने कुणी नोकरीही देत नव्हते. कसे बसे ओळखीने एका इलेक्ट्रिक कंपनीत १,४०० रुपये मासिक वेतनावर रुजू झाला. ही मिळकत तशी तुटपुंजीच असल्याने फावल्या वेळात राजू रिक्षा चालवून गुजराण करू लागला. कालांतराने तीनचाकीवरून चारचाकी चालवण्यास शिकल्यानंतर त्याचे दिवस पालटले. दोनाचे चार हात झाले.सध्या ठाण्यातच भाड्याची खोली घेऊन आई, पत्नी व दोन मुलांसह राहतो. राजूने आपल्या सुरुवातीच्या दिवसांतील धडपडीचा पट उलगडला. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर राजूवर कुटुंबाची जबाबदारी पडली. वडिलांना भजनात गाण्याची आवड होती. एवढाच काय तो राजूला लाभलेला कलेचा वारसा.तशी गाण्याची आवड ही बालपणापासूनच असल्याने, तसेच सर्वच कला पारंपरिक लोकजीवनाचा अविभाज्य भाग असल्याने त्याच्याही मनात कलात्मकतेची बीजे रोवली गेली. पण, पोटाची खळगी भरण्याची चिंता आणि कुटुंबाचा रहाटगाडगा हाकण्याची भ्रांत, अशा व्यापामुळे कलाक्षेत्रात झोकून देणे जमले नाही. किंबहुना, तशी संधीदेखील मिळत नव्हती. ठाण्यातील भाजपचे आमदार संजय केळकर यांच्याकडे वाहनचालक म्हणून रुजू झाल्यानंतर राजूला हळूहळू विविध क्षेत्रातील ‘माणसं’ भेटत गेली.


आ. केळकर हेदेखील राजकीय तसेच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्राशी निगडित असल्यामुळे थोडं बळ मिळाल्याने राजूची प्रतिभा तावून-सुलाखून निघाली. एकप्रकारे राजूचे अनोखे पैलू जगासमोर आले. राजूच्या लेखणीला पुन्हा बहर आला. काही दिवसांनी ‘तुझ्यासारखी सून माझ्या आईला मिळावी’ हे लोकगीत लिहिलं. गीत रेकॉर्डिंगही केलं व ते ‘सुमित म्युझिक’ या कंपनीने लॉन्च केल्यानंतर थोडीशी प्रसिद्धी मिळाली. असे करता करता जवळजवळ १२ ते १३ गाणी लिहून व रेकॉर्ड करून ती युट्यूब चॅनेलद्वारे लॉन्च केली. आजवर आठ ते दहा लोकगीतेही लिहिली आहेत. ज्यात दोन त्याच्या कुलदेवतेची गीते असल्याचे राजू अभिमानाने सांगतो. पण, “हवी तशी प्रसिद्धी काही मिळाली नाही. आमदार केळकर साहेबांचा भक्कम पाठिंबा होता, माझ्या प्रत्येक गाण्याला, त्यांच्याकडून पाठीवर थाप मिळत असे,” राजू सांगत होता. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत आपल्या नेत्याच्या प्रचारात आपलाही खारीचा वाटा असावा, म्हणून राजूने मनाने ‘दिलदार... नेता हा दमदार... नाही झुकणार कुणाच्या पुढं... आमचे संजय केळकर जिंकून आणणार ठाण्याचा गड’ हे प्रचार गीत लिहिले. या प्रचारगीताने राजूची सर्वत्र चर्चा होऊ लागली. वाहनचालकाची नोकरी संभाळून राजूने आजवर अनेक गीते लिहिली असून काही गीते गाईलीदेखील आहेत. राजूचा आवाज तार सप्तकात पोहोचत असल्याने त्याच्या गायकीत एकप्रकारची धार जाणवते. २०१९ मध्ये आ. केळकर यांच्यासाठी तयार केलेल्या प्रचार गीताला प्रख्यात गायक आणण्याऐवजी नाशिकच्या एका नवागत होतकरू गायकाद्वारे प्रचार गीत साकारल्याची आठवण राजू जागवतो. एका चालकाने आपल्या नेत्याच्या विजयासाठी चक्क प्रचारगीत लिहून आपल्या नेत्याप्रति व्यक्त केलेली असीम निष्ठा ही बाब वाखाणण्याजोगी ठरली होती.“साहेबांसोबत राहून त्यांची कार्यपद्धत व राहणीमान, जे इतर राजकीय नेत्यांपेक्षा खूप वेगळं आहे. हे आम्हीही अंगीकारलं आहे. साहेब जसे गोरगरीब जनतेसाठी तळमळीने काम करतात, तसंच आपणही साहेबांसाठी काय तरी करावं, म्हणून आजही साहेबांसोबत समाजकार्यात हातभार लावत आहे,” असे राजू सांगतो. वाहनचालकाची ड्युटी बजावत असताना आपल्यातील अंगभूत कलागुणांचीही जोपासना करणार्‍या राजूला सिनेनाट्यसृष्टीत धडक मारण्याची इच्छा आहे. त्याच्या या महत्त्वाकांक्षेला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मन:पूर्वक शुभेच्छा!


 
 
@@AUTHORINFO_V1@@