बिर्याणीचा बादशाह : ‘एचआरके फूड्स’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2021   
Total Views |

hrk foods_1  H
कोरोना काळात कडक ‘लॉकडाऊन’ चालू होता. लोकांना तर भाज्या, अन्नधान्य मिळणेदेखील दुरापास्त होते. सय्यदभाईंनी लोकांची होणारी ही परवड पाहिली. दरम्यान, शासनाने अन्नधान्य, भाज्या, फळे यासंबंधी नियम शिथिल केले. त्यामुळे सर्वसामान्य जनतेस अन्नधान्य मिळावे, यासाठी सय्यदभाईंनी मित्राच्या प्रस्तावास मान्यता दिली आणि ‘एचआरके फूड्स’चा जन्म झाला.
विक्री करताना नकार पचवणे अत्यंत त्रासदायक असते. मात्र, महत्त्वाचे असते ते म्हणजे नकार पचवून पुन्हा उभे राहणे. त्या तरुणाने तेच केले. त्याने १५ दिवस नकार पचवले. मात्र, तो अजिबात मागे हटला नाही. धैर्याने उभा राहिला आणि अखेर त्यास यशाचा राजमार्ग सापडला. स्वत:च्या कंपनीचे शीतपेटीत संवर्धित केलेल्या पालेभाज्या, मासे, चिकन, मांस तो पंचताराकित हॉटेल्स, उपाहारगृहे, ‘फूडचेन्स’ यांना पुरवू लागला. पुढे त्यास संकल्पना सुचली आणि त्यातून त्याने बिर्याणीचा व्यवसाय सुरू केला. त्यातून एक उपाहारगृह आकारास आले. कल्पकता, मेहनत, संधीचे सोने करण्याची अक्कलहुशारी असल्यास माणूस किती प्रगती करू शकतो, तेदेखील कोरोना काळात, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ‘एचआरके फूड्स.’

 
कोरोना काळात सर्वच उद्योगधंदे ठप्प झाले होते. काहींना तर आपला गाशा गुंडाळावा लागला. सय्यदभाईंच्या एका मित्राबाबतीतसुद्धा असाच काहीसा दुर्दैवी प्रसंग ओढवला. शेकडो कामगार कार्यरत असणारी कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर होती. त्या मित्राने सय्यदभाईंना हा व्यवसाय करण्यासाठी विचारणा केली. खाद्यपदार्थ शीतपेटीत संवर्धित करून ते पुरवणारी कंपनी होती. कोरोना काळात कडक ‘लॉकडाऊन’ चालू होता. लोकांना तर भाज्या, अन्नधान्य मिळणेदेखील दुरापास्त होते. सय्यदभाईंनी लोकांची होणारी ही परवड पाहिली. दरम्यान, शासनाने अन्नधान्य, भाज्या, फळे यासंबंधी नियम शिथिल केले. त्यामुळे सर्वसामान्य जनतेस अन्नधान्य मिळावे, यासाठी सय्यदभाईंनी मित्राच्या प्रस्तावास मान्यता दिली आणि ‘एचआरके फूड्स’चा जन्म झाला.
 
 
खरंतर सय्यद घौस यांचा ’रिअल इस्टेट’चा व्यवसाय होता. या व्यवसायाची त्यांना कसलीच कल्पना नव्हती. एखादी वस्तू विकण्यासाठी काय लागते, तर आत्मविश्वास. हा आत्मविश्वास येतो तो ज्ञानातून. सय्यदभाईंनी ते ज्ञान आत्मसात केले. ते स्वत: विक्रीसाठी विविध पंचतारांकित हॉटल्स, त्रितारांकित हॉटेल्स, ‘फूडचेन्स’ यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटू लागले. सलग १५ दिवस कित्येक अधिकार्‍यांना भेटूनसुद्धा एकदेखील वस्तू खरेदी केली गेली नाही. मात्र, सय्यदभाईंवर स्वत:वर आणि आपल्या उत्पादनावर विश्वास होता. आपण १०० टक्के नंबरी वस्तू विकत आहोत, हे त्यांना माहीत होते. त्यांना एका मोठ्या हॉटेलमधून बोलावणे आले. त्यांनी ‘एचआरके’च्या काही वस्तू घेतल्या. त्यानंतर खर्‍या अर्थाने ‘एचआरके’चा प्रवास सुरू झाला.दूध, दही, मासे, अंडी, चिकन, मटन, शीतपेये, भाज्या, आईस्क्रिम अशा वस्तूंची विक्री होऊ लागली. अंधेरी आणि परिसरांतील पंचतारांकित, त्रितारांकित उपहारगृहे, ‘फूडचेन्स’ यांना या वस्तू पुरविण्यात येऊ लागल्या. ‘लॉकडाऊन’च्या काळात ५०० किलो चिकन, ५०० किलो मिश्रभाज्या, १०० किलो वाटाणा यांची आठवड्याला विक्री होऊ लागली. या प्रकारच्या क्षेत्रात अल्पावधीत ‘एचआरके फूड्स’ने स्वत:चा ठसा उमटविला.
 
 
हे ‘फ्रोझन फूड’ विकत असताना एक बाब सय्यदभाईंच्या लक्षात आली की, मासे, भाज्या, हे सारे नाशवंत आहे. ते खराब होऊन वाया जाण्यापेक्षा त्याचा उपयोग होणे महत्त्वाचे आहे. याच संकल्पनेतून आकारास आली ती म्हणजे बिर्याणी. चिकन दम बिर्याणी त्यांनी तयार केली. सुरुवातीलाच त्यांना २२ ग्राहक मिळाले. ‘एचआरके फूड्स’चा उत्साह दुणावला. सभोवताली मराठी भाषिक बहुसंख्येने राहत असल्याने त्यांनी ‘आमची बिर्याणी’ नावाने अजून एक बिर्याणी बाजारात आणली. बिर्याणी तयार करण्यासाठी पहाटे ३ ते ७ वाजेपर्यंत स्वयंपाकी राबतात. सकाळी बरोबर ७ वाजता बिर्याणी तयार असते. ‘ब्रेकफास्ट बिर्याणी’ ही अनोखी शक्कल ‘एचआरके’ने राबवली. सुरुवातीपासूनच या संकल्पनेचे लोकांनी स्वागत केले. लोक आता न्याहारीला बिर्याणी ‘ऑर्डर’ करू लागले.
 
ही बिर्याणी करताना उत्पादनाबाबतीत कुठेच तडजोड केली जात नाही. तांदूळदेखील पॅकबंद पिशवीतील ‘ब्रॅण्डेड’ कंपनीचे वापरले जाते. बिर्याणी तयार करताना स्वच्छतेची आणि आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेतली जाते. बिर्याणीमध्ये पडणार्‍या इतर घटकांचादेखील तितकाच विचार केला जातो. दर्जा आणि गुणवत्ता याबाबतीत कसलीच तडजोड केली जात नाही. अंधेरी परिसरांत या बिर्याणीची चर्चा होऊ लागली. त्यानंतर ‘एचआरके फूड्स’ने बिर्याणीमध्ये आणखी वैविध्य आणले. ‘सेलिब्रेटी बिर्याणी’, ‘आमची बिर्याणी’, ‘चिकन दम बिर्याणी’सारखे बिर्याणीचे पर्याय त्यांनी ग्राहकांना उपलब्ध करुन दिले. ‘सेलिब्रेटी बिर्याणी’मध्ये बिर्याणी सोबत कोशिंबीर, कबाब आणि एखादा गोड पदार्थ दिला जातो, तेदेखील अवघ्या १५० रुपयांत.
 
‘आमची बिर्याणी’ आणि कोशिंबीर यांची किंमत आहे निव्वळ ९९ रुपये.
 
‘कॉर्पोरेट बुकिंग’मध्ये ८९९ रुपयांत दहा पॅकेट्स उपलब्ध आहे. दिवसाला सध्या १०० बिर्याणीच्या पाकिटांची विक्री होते. एवढ्या कमी किमतीत दर्जेदार बिर्याणी कशी देता, याविषयी विचारले तर सय्यदभाई सांगतात की, “मुंबईमध्ये ‘ऑथेन्टिक’ चवीची म्हणता येईल अशी बिर्याणी कमी ठिकाणी मिळते. त्यामुळे आमचा हाच प्रयत्न आहे की, सर्वसामान्य माणसाला त्याच्या कुटुंबासह उच्चदर्जाच्या उत्तम चवीच्या बिर्याणीचा आनंद त्याला परवडेल, अशा दरांत मिळावा या हेतूनेच आम्ही पूर्णपणे बिर्याणीवर लक्ष केंद्रित केले आहे.”
 
 
‘एचआरके फूड्स’ने काही दिवसांपूर्वी स्वत:चे उपाहारगृह सुरू केले. या उपाहारगृहाची क्षमता आठ आसनी आहे. बिर्याणी, कबाब, पाया सूप हे या उपाहारगृहाचे खर्‍या अर्थाने वैशिष्ट्य. विशेषत: ‘बंगळुरू कबाब’ खूपच स्वादिष्ट मानले जाते. खाद्यपदार्थांच्या विविध संकेतस्थळावरून या उपाहारगृहाला ग्राहक नावाजतात. कोरोना काळात सामाजिक जबाबदारीची भावना जोपासत २४ तास आपल्यासाठी कर्तव्यावर असणार्‍या पोलीस बांधवांसाठी खाद्यपदार्थांची सोय ‘एचआरके फूड्स’ने केली होती. त्याचप्रमाणे ‘लॉकडाऊन’च्या काळात अनेक कुटुंबांची उपासमारी होत होती. या कुटुंबासदेखील ‘एचआरके’ने भोजनसाह्य केले होते. ‘एचआरके फूड्स’ उद्योग समूहामुळे दहा जणांना रोजगार मिळतो.

 
भविष्यात व्यवसाय वाढविणे आणि त्यातून सामाजिक जबाबदारी सांभाळत समाजोपयोगी उपक्रम राबविणे हे ‘एचआरके फूड्स’ समूहाचे उद्दिष्ट आहे.कोरोना हा मानवी इतिहासातील एक वाईट काळ आहे. मात्र, काही व्यक्तींसाठी हा काळ संधीसुद्धा घेऊन आला. ‘एचआरके फूड्स’ उद्योगसमूहाने या संधीचे सोने केले आणि स्वत:चा उद्योग प्रस्थापित केला. नकारात्मक परिस्थितीला शरण न जाता त्याला सकारात्मकतेत रुपांतरित करतो, तोच खरा व्यावसायिक. ‘एचआरके’ उद्योगसमूहाने ते सिद्ध केले आहे.
 

 
@@AUTHORINFO_V1@@