मल्लिकार्जुन खर्गेंवर संतापले
नवी दिल्ली, : कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळातील चार मंत्री आणि जवळपास २१ आमदारांनी त्यांच्या नेतृत्वाविषयी अविश्वास दर्शविला असून त्यांच्या राजिनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हे पुन्हा कॅप्टनविरोधात सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पंजाब सरकारचे कॅबिनेट मंत्री तृप्त राजिंदर सिंह बाजवा यांच्या निवासस्थानी चार कॅबिनेट मंत्री, २१ आमदार आणि जवळपास अर्धा डझन माजी आमदारांनी एकत्र येत बैठक घेतली. बैठकीनंतर कॅबिनेट मंत्री चरणजीत चन्नी म्हणाले, कॅप्टन अमरिंदर यांच्या नेतृत्वावर आता आमचा विश्वास उरलेला नाही. ते मनमानी पद्धतीने कारभार करीत असून त्यांच्यामुळे पक्षामध्ये उभी फूट पडली आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्यात यावे, अशी आमची पक्षनेतृत्वाकडे आग्रहाची मागणी आहे. कारण, कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्रीपदी कायम राहिल्यास काँग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकणे अशक्य आहे, असेही ते म्हणाले.
बंडखोरांच्या या बैठकीस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हजर नव्हते. मात्र, सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात यावे अशी आग्रही मागणी काँग्रेस नेतृत्वाकडे करणारेच आमदार या बैठकीमध्ये होते. त्याचप्रमाणे सिद्धू यांनी चार बंडखोर कॅबिनेट मंत्र्यांना आपल्या घरी बोलावून चर्चादेखील केली आहे. त्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हटविण्याची मोहिम सिद्धू आता आपल्या समर्थकांकडून पुढे चालवित असल्याचे स्पष्ट झाले आहे.