नवी दिल्ली : देशात जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवार, दि. २३ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.यावेळी पंतप्रधानांनी आमचा मुद्दा सविस्तरपणे ऐकून घेतल्याची माहिती नितीशकुमार यांनी भेटीनंतर दिली. देशात जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, ही मागणी पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १२७ व्या घटनादुरुस्ती विधेयकावर चर्चा करताना जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी केली होती.
त्यानंतर आता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी करणार्या पक्षांचे नेतृत्व स्वीकारले असल्याचे चित्र आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बिहारमधील विविधपक्षीय शिष्टमंडळाने सोमवारी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली.भेटीनंतर नितीशकुमार म्हणाले की, “सर्व पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधानांसोबत चर्चा केली आहे. भेटीदरम्यान आम्ही मागासवर्गीय, ‘ओबीसी’, ‘ईबीसी’ आदी सर्व समुदायांविषयी आमचे मुद्दे मांडले आहेत.
जातिनिहाय जनगणना झाली, तर प्रत्येक जातीची नेमकी आकडेवारी समजेल आणि त्यानुसार त्यांच्या उत्थानासाठी योजनाबद्ध काम करणे शक्य होणार आहे. सर्व पक्षांनी जातिनिहाय जनगणनेविषयी अनुकूल मत मांडले असून, पंतप्रधानांनी ते सविस्तरपणे ऐकून घेतले आहे. पंतप्रधानांनी अद्याप कोणताही निर्णय सांगितलेला नाही,” असेही नितीशकुमार यांनी स्पष्ट केले.दरम्यान, शिष्टमंडळामध्ये राज्य मंत्रिमंडळातील सदस्य आणि भाजपचे जनकराम, राजदचे तेजस्वी यादव, विजय चौधरी, हम पार्टीचे जितनराम मांझी, ‘व्हीआयपी’चे मुकेश साहनी, काँग्रेसचे अजित शर्मा, ‘एआयएमआयएम’चे अख्तरुल इमाम, माकप-‘एमएल’चे महबूब अली यांच्यासह सूर्यकांत पासवान आणि अजय कुमार यांचा समावेश होता.