ड्रॅगनच्या अणुशक्तीचे बळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2021   
Total Views |

xi jnping_1  H
 
‘द नॅशनल इंटरेस्ट’मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखामध्ये पीटर सुसीउ यांनी असा दावा केला आहे की, १९६४ ते १९९६ या काळात झालेल्या ४५ अणुचाचण्यांदरम्यान चीनमध्ये तब्बल १ लाख, ९४ हजार नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. आता या नवीन लेखामुळे कोरोनाचे माहेरघर ठरलेल्या चीनचा आणखीन एक क्रूर चेहरा जगासमोर आला आहे.
“भारत हा अण्वस्त्रांशिवायही राहू शकतो. ते आमचं स्वप्न आहे, पण हेच खरं तर अमेरिकेचंही स्वप्न असायला हवं,” हे जगप्रसिद्ध विचार आहेत भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे. कलाम यांचे विचार वरकरणी आदर्शवत, जागतिक शांततेसाठी अनुकरणीय वगैरे वाटत असले तरी शत्रुराष्ट्रांनी वेढलेल्या भारतासाठी अण्वस्त्रहीनता हा शापच ठरला असता. म्हणूनच १९७४ आणि १९९८ साली पोखरणमध्ये भारताने यशस्वी अणुचाचणी करून ‘हम किसीसे कम नही’ म्हणत आपली जागतिक ताकद दाखवून दिली. अण्वस्त्रांबरोबरच भारताने आण्विक ऊर्जेसाठीही या तंत्रज्ञानाचा सर्व जागतिक नियमांचे पालन करुनच वापर केला. आजघडीला भारतात एकूण सात अणुऊर्जा प्रकल्प कार्यान्वित असून एकूण वीजनिर्मितीमध्ये अणुऊर्जेचे प्रमाण हे ३.२ टक्के इतके असल्याचे २०१९च्या आकडेवारीवरून समजते. तसेच अण्वस्त्रांच्या संख्येच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, भारताच्या भात्यात सध्या दीडशेच्या आसपास अण्वस्त्रांचाही साठा आहे. परंतु, अण्वस्त्रांची अथवा अणुऊर्जेची निर्मिती असो, भारतातही छोटे-मोठे अपघात जरुर घडले, वित्तहानीही झाली, पण सुदैवाने कोणतीही मोठी आण्विक आपत्ती भारतात ओढवली नाही. कारण, अगदी प्रारंभीपासूनच अणुऊर्जेच्या एकूणच वापराबाबत भारताने प्रचंड सतर्कता बाळगली आणि आपला अणुऊर्जेतून राष्ट्रविकासाचा उद्देशही साध्य केला. परंतु, महासत्तेची महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍या चीनला मात्र अणुऊर्जेची फार मोठी किंमत चुकवावी लागली. नुकत्याच ‘द नॅशनल इंटरेस्ट’मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखामध्ये पीटर सुसीउ यांनी असा दावा केला आहे की, १९६४ ते १९९६ या काळात झालेल्या ४५ अणुचाचण्यांदरम्यान चीनमध्ये तब्बल १ लाख, ९४ हजार नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. आता या नवीन लेखामुळे कोरोनाचे माहेरघर ठरलेल्या चीनचा आणखीन एक क्रूर चेहरा जगासमोर आला आहे.
कोरोना महामारीच्या काळातही चीनमध्ये नेमके किती मृत्यू झाले, याची खरी आकडेवारी चीनने कधीही जगासमोर आणली नाहीच. त्याच पार्श्वभूमीवर ड्रॅगनच्या अणुशक्तीचे नेमके किती बळी गेले असतील, त्याची संख्या आजही निश्चित नाहीच. पण, पीटर यांनी केलेल्या संशोधनातून जवळपास दोन दशकांनंतर ही धक्कादायक माहिती समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातही ही माहिती केवळ १९६४ ते १९९६ याच काळातली आहे. म्हणजे १९९६ नंतर झालेल्या अशा कुठल्याही आण्विक अपघातांचा या आकडेवारीत समावेशही नाही. यावरुन केवळ कल्पना यावी की, चीनमध्ये मानवी जीवाचे किती मोल असावे...
पीटर यांच्या या लेखामध्ये केवळ अणुचाचणीमुळे मृत पावलेल्या चिनी नागरिकांचीच संख्या नाही, तर आण्विक किरणोत्सर्गामुळे विविध आजारांना बळी पडलेल्या, जायबंदी झालेल्या नागरिकांचाही आकडा १२ लाख इतका असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे किरणोत्सर्गाला बळी पडलेल्या या चिनी नागरिकांना ल्युकेमिया, कर्करोगासारख्या घातक आजारांनी ग्रासले असल्याचेही या लेखात पीटर यांनी विशेषत्वाने नमूद केले आहे.

इतकेच नाही तर पीटर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने १९६७ साली पहिली अणुचाचणी केल्यानंतर ३२ महिन्यांनी ‘थर्मोन्युक्लिअर’ चाचणीही केली. या चाचणीमुळे ३.३ मेगाटन इतकी प्रचंड ऊर्जा निर्माण झाली. ही ऊर्जा हिरोशिमा-नागासाकीवर अमेरिकेने टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षाही २०० पट अधिक असल्याची स्फोेटक माहितीही पीटर यांनी आपल्या लेखात नमूद केली आहे. त्याचबरोबर शिनजियांग प्रांतात चीनच्या या विनाशकारी प्रयोगांमुळे लोकसंख्येच्या प्रमाणातही मोठी घट नोंदवल्याचे पीटर या लेखात सांगतात. हे जमिनीवरील अणुचाचणीच्या जीवितहानीचे जीवघेणे आकडे असून चीनने अशाच प्रकारे जवळपास दोन डझनभर अणुचाचण्या वातावरणातही केल्याचे निष्पन्न झाले आहे. पण, त्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नसून त्याचे मानवी आरोग्यावर झालेले दुष्परिणामही तितकेच विघातक असतील, यात शंका नाही.

नुकतेच चीनमधील एका अणुप्रकल्पाला त्वरित बंद करण्याचा सल्लादेखील त्या प्रकल्पाचे सहनिर्माता असलेल्या फ्रान्सच्य एका कंपनीने दिला होता. पण, चीनने त्याकडेही कानाडोळाच केला. एकूणच काय तर चीनच्या या आण्विक प्रयोगांची मोठी किंमत चीनला मोजावी लागली आहे. पण, हे आण्विक अपघात असो अथवा कोरोनाची जैवहत्यार म्हणून जगभर संसर्गित केलेली महामारी, चीनने केवळ चिनी नागरिकांचाच नाही, अख्ख्या जगाचा जीव धोक्यात घालून मानवी विनाशालाच वेळोवेळी आमंत्रण दिले आहे, हे मात्र नक्की!







 

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@