‘अल जझिरा’चा कावा फसला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2021   
Total Views |


al zazeera_1  H
‘अल जझिरा’ या वृत्तवाहिनीचे धोरण भारतस्नेही अजिबात नाही. भारतात होणार्‍या घटनांचा विपर्यास करणे, भारत सरकारला मुस्लीमविरोधी ठरविणे, भारत सरकारच्या धोरणांविरोधी प्रचार करणे, अशा सर्व कारवायांमध्ये या वृत्तवाहिनीचा विशेष रस असतो. ज्याप्रमाणे अनेक परदेशी प्रसारमाध्यमे भारतविरोधी अजेंडा राबवित असतात, त्याचप्रमाणे ‘अल जझिरा’ देखील तशाचप्रकारचे वार्तांकन करीत असते.

हिंदी महासागर क्षेत्रातील लहान देशांमध्येही आता या वृत्तवाहिनीने आपला भारतविरोधी अजेंडा राबविण्यास प्रारंभ केला आहे. त्यासाठी या वृत्तवाहिनीने आपले लक्ष्य बनविले ते मॉरिशस आणि मालदीव या बेटांना. या बेटांना खरेतर भारत सर्वतोपरी मदत करीत असतो. या मदतीमागे चीनप्रमाणे कोणताही स्वार्थ नसल्याने तेथील नागरिकदेखील सहसा भारतविरोधी भूमिका घेत नाहीत. मात्र, भारतविरोधात कृत्रिम भीती निर्माण करून या क्षेत्रामध्ये असलेले भारताचे संबंध खराब करण्याचा ‘अल जझिरा’चा प्रयत्न नुकताच फसला आहे.

 
‘अल जझिरा’ने नुकतेच एक वृत्त प्रसारित केले. त्यानुसार २५० अमेरिकी दशलक्ष डॉलर खर्च करून मॉरिशस येथील अगालेगा येथे बांधली जात असलेली धावपट्टी आणि जेट्टी भारतीय नौसेनेच्या तळासाठी असल्याचा दावा त्यांच्या ‘इन्व्हेस्टिकेटिव्ह युनिट’ने केला. उपग्रहाद्वारे काढलेले फोटो, ‘फायनान्शियल डाटा’, ‘ऑन-द-स्पॉट’ जमा केलेली माहिती या सगळ्यांच्या आधारावर हा दावा करण्यात येत असल्याचे ‘अल जझिरा’ने सांगितले. पश्चिमी आफ्रिकेपर्यंत प्रभाव वाढविण्यासाठी हा नाविक तळ उभारला जात असल्याचे सांगण्यात आले. सगळ्या प्रदेशांमध्ये ‘सुरक्षा आणि विकास’ हे ध्येय गाठण्यासाठी भारताच्या ‘सागर’ मोहिमेअंतर्गत हे काम सुरू असल्याचा दावाही करण्यात आला. याद्वारे भारत मॉरिशसच्या भूमीचा वापर करून सैनिकी बळ वाढवित असून भारताचे पुढील लक्ष्य मालदिव असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 
अर्थात, भारत नौसेना तळ उभारत असल्याच्या वृत्ताचा अलीकडेच म्हणजे मे २०२१ मध्ये मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद जगन्नाथ यांनी स्पष्टपणे इन्कार केला होता. भारत आणि मॉरिशसमध्ये अगालेगा इथे नाविक तळ उभारण्यासाठी कुठलाही करार झालेला नाही, असे जगन्नाथ यांनी संसदेतच जाहीर केले होते. पंतप्रधान जगन्नाथ यांचे जवळचे सहकारी केन एरियन यांनीदेखील कुठलाही करार झालेला नाही, असे केन एरियन यांनी म्हटल्याचे अन्य एका परदेशी वृत्तसंस्थेनेही दिले. त्यामुळे खरेतर ‘अल जझिरा’ने आपले हसे यानिमित्ताने करून घेतले आहे.मात्र, ‘अल जझिरा’ने हे वृत्त का दाखविले, हे समजून घेणे गरजेचे आहे. मालदीवमध्ये अगदी अल्पकाळासाठी ‘इंडिया आऊट’ ही मोहीम सुरू झाली होती. मात्र, या मोहिमेला मालदीवच्या नागरिकांना सपशेल नाकारले. त्यामुळे लवकरच घसरणीला लागलेल्या या मोहिमेला पुन्हा बळ मिळावे, या हेतूने ‘अल जझिरा’ने असे वृत्त दाखविण्याचा खोडसाळपणा केला. वृत्ताचा एक परिणाम असा झाला की, अगदीच अल्प जनाधार असलेला भारतविरोधी एक गट समाजमाध्यमांवर सक्रिय झाला. यामुळे मालदीवच्या सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष ‘अल जझिरा’च्या बातमीकडे वेधले गेले. मात्र, बातमीचे खंडन अधिकृतपणे मालदीवच्या सरकारने दोनदा केले आहे, हेही त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे ‘अल जझिरा’च्या या प्रचाराचा कोणताही उपयोग झाला नाही.
 
 
संकटकाळात मदतीसाठी धावत जाता येईल, असा विश्वासार्ह उदार मित्र म्हणजे भारत अशी सर्वसामान्य मालदीवच्या नागरिकांची भावना आहे. सर्वच राजकीय गटांना- मग ते इस्लामी राष्ट्रवाद मानणारे असोत, भारतविरोधी असोत, मूलतत्त्ववादी असोत की, ‘यामिन गटा’चे- सगळ्यांनाच भारताने दशकभरापासून उदारपणे केलेल्या मदतीचा वैयक्तिकरित्या फायदाच झाला आहे. दूरवरच्या बेटांवर राहणार्‍या लोकांना भारतीय विमान उड्डाणांनी आणीबाणीच्या संकटप्रसंगी, समुद्र खवळला असताना वेळोवेळी मदत पोहोचवली. भारतीय वायुदल, त्यासंबंधीचा कर्मचारीवर्ग यांच्या वावराबद्दल एक सकारात्मक वातावरण त्यामुळे तयार झाले. त्यामुळेच स्थानिकांनी खास करून दक्षिण मालदीवमधील स्थानिकांनी भारतविरोधी मोहिमेला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ‘अल जझिरा’ला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे यापुढे भारतविरोधी भूमिका घेताना या वाहिनीस नक्कीच विचार करावा लागणार आहे.
 

 

 
 

 


 

@@AUTHORINFO_V1@@